माली पारगावच्या चार शेतकऱ्यांना झेंडू फूलशेतीचा आधार

कमलेश जाब्रास
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे. 

माजलगाव, जि. बीड  - तालुक्‍यातील माली पारगाव येथे चार तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन झेंडू फुलाची गटशेती केली. या शेतीतून त्यांना आजवर तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. या झेंडू फुलांची विक्री मुंबई, कल्याणच्या बाजारात होत असून प्रतिकिलो ६० रुपयांचा दर मिळत आहे. 

गणेशोत्सवापाठोपाठा जेष्ठा कनिष्ठा गौरींचा सण झाला. नवरात्र उत्सवामुळे मुंबईच्या बाजारात फुलांना मागणी पुन्हा वाढली आहे. माजलगाव तालुक्‍यातील मालीपारगाव येथील नाथा मांडवगणे, अंगद सोजे, सुग्रीव बागवाले, प्रल्हाद मांडवगणे या चार शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक-एक एकर झेंडू फुलशेती करण्यासाठी आळेफाटा येथून २३ जूनला तीन रुपयाला एक रोप या प्रमाणे तीस हजार रोपे आणली. चार फूट अंतरावर एक बाय एक अंतरावर ठिबक सिंचनावर या रोपांची लागवड केली. परंतु मागील दीड महिना पावसाने हुलकावणी दिल्याने विहिरीतील पाणी साठा खालावत गेला. मात्र पैठणच्या धरणातील पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आल्यामुळे ही फूलशेती बहरली. 

मागील साठ दिवसांमध्ये खतांची व औषधांची मात्रा वेळोवेळी देण्यात आली. यंदा उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई असल्याने फुलांची लागवड कमी झाली आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने या शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली ती मागणीच्या तुलनेत अपुरी पडत आहे. या चार युवा शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कल्याण, ठाणे येथील व्यापाऱ्यांनी झेंडू फुले ६० रुपये किलो दराने खरेदी केली आहेत. आठ दिवसांत प्रत्येकाकडे एक टन झेंडू फुले निघत आहेत. यातून त्यांना आतापर्यंत तीन लाख रुपयांचे उत्पादन मिळाले असून प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपयांचा खर्च आलेला आहे.

दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे नियोजन व गटशेती केल्याने चांगले उत्पन्न मिळत असल्याचे या चार शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच दसरा व दिवाळीत किमान चार लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.