संघर्ष आला फळाला...

  गणेश फुंदे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

सुयोग्य शेतीतून उत्पन्न मिळवित सुमारे १२ एकरांचे क्षेत्र २५ एकरांवर नेले. चार फळपिकांवर आधारित शेती विकसित केली. जमिनीचे ‘लेव्हलिंग’, पाइपलाइन, ठिबक, शेततळे आदींद्वारे शेती बागायती केली. निर्यातक्षम उत्पादन घेतले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठा सेंद्रिय पद्धतीचा वापर केला. बोरबन (जि. नगर) येथील आनंदराव गाडेकर यांची ही शेती दिशादर्शक अशीच आहे. 

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका शेती व दुग्‍धव्‍यवसायामुळे मुख्य पटलावर आला. याच तालुक्‍यात बोरबन या छोट्या गावात आनंदराव गाडेकर (नाना) यांची एकत्रित २५ एकर शेती आहे. छोटा भाऊ तानाजीसह ते शेती कसतात. लहानपणीच वडील गेले. त्यामुळे सारी जबाबदारी मोठे बंधू आनंदराव यांच्यावर येऊन पडली. घरचा चरितार्थ चालवण्याची ही जबाबदारी त्यांनी ताकदीने पेलली. 

सुरवातीचे कष्ट 
पूर्वी १२ एकरांपर्यंत जमीन होती. आनंदरावांनी मात्र कुशलतेने शेती व्यवस्थापन केले. प्रसंगी घरच्या शेतीतील भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत घेऊन ते विकत असत. शेतीतील उत्पन्नातून टप्प्याटप्प्याने २५ एकरांपर्यंत जमीन खरेदी केली. बहुतांश शेती पठारावरची होती. तिचा विकास करणे सोपे नव्हते.  

जमीन सुधारणा 
पठारी भाग असल्याने माती कमी, उताराला पाणी वाहून जात असे. उताराच्या रचनेनुसार जमिनीची लेव्हल करून १०, १५ गुंठे वा त्याहून अधिक असे स्वतंत्र प्लॉट पाडले. त्यामुळे वाहून आलेले पाणी त्यात जिरू लागले. अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी सांडवे तयार केले. मुळा नदी परिसरातून वाहते. या भागात २२ वर्षांपूर्वी आनंदरावांनी पहिली पाइपलाइन केली. शेती बागायती केली. त्यांच्यापासून प्रेरणा घेत मग अनेकांनी पाइपलाइन व शेतीचा विकास करण्यास सुरवात केली. 

आजची शेती 
फळबागा केंद्रीत शेती.
 डाळिंब- १२ एकर, द्राक्षे- पाच एकर, सीताफळ- चार एकर, पपई- दोन एकर
शेतीचे उद्दिष्ट- उत्पादन खर्च कमी करणे 
टंचाई स्थितीतही पाण्याच्या काटेकोर     वापरातून सर्व झाडांचे संगोपन.  
उत्पादन- एकरी- डाळिंब- ८ ते १० टन, द्राक्ष- १० ते १२ टन, सीताफळ- ८ टन 
विक्री- जयपूर, दिल्ली व स्थानिक मार्केटला 
सुमारे ४० ते ६० टक्के उत्पादन- निर्यातीसाठी  

बांधावरील जागेचा विनियोग  
डोंगराळ जागा असल्याने विविध ठिकाणच्या बांंधाची उंची १० ते १५ फुटांपर्यंत आहे. या जागेचा पुरेपूर विनियोग केला आहे. त्यात केशर व हापूस आंब्याची एकूण १०० झाडे. मात्र उत्‍पादनक्षम ५० झाडे आहेत. त्यापासून सुमारे पाचहजार किलो उत्पादन मिळते. किलोला ग्रेडनुसार सरासरी ५० रुपये दर मिळतो. नारळाचीही बांधावर १०० झाडे आहेत. त्यापासून पाच हजार नारळाचे उत्पादन मिळते. छोटे व्‍यापारी शेतावर येऊन १० रुपये प्रतिनारळ दराने खरेदी करतात. बांबू, पेरू, बोर, कडुलिंब, चिकू, चिंच तसेच आंध्र प्रदेशातील करवंदाचीही लागवड आहे. अंदाजे एकूण ४०० झाडे आहेत. 

पीक अवशेषांचा वापर
पंचवीस एकरांतील शेतीत रासायनिक खतांचे प्रमाण अत्‍यंत कमी आहे. वर्षाला शंभर टन क्षमतेचा गांडूळ प्रकल्प अाहे. तण देई धन या उक्तीवर गाडेकर यांचा विश्वास आहे. त्यानुसार तण, पालापाचोळा यांचा बागेत अाच्‍छादन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डाळिंबाच्या प्रतिझाडाला अंदाजे या प्रकारे ३० किलोपर्यंत सेंद्रिय खत मिळते असे गाडेकर म्हणतात. जीवामृत, अमृतपाणी यांचा वापर केला जातो. 

युरोपने चाखली मालाची गोडी
उजाड माळरानावर बहरलेल्या बागेतील डाळिंब आणि द्राक्षांचा गोडवा थेट युरोपमध्‍ये पोचला आहे. निर्यातीसाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करून मुंबई येथील निर्यातदारांच्या मदतीने ही कामगिरी केली आहे. त्याचा आनंद गाडेकर कुटुंबीयांना आहे. 

कृषी विभागाची मदत 
फळबाग लागवड, ठिबक, ट्रॅक्‍टर, शेततळे, गांडूळखत प्रकल्‍प, यांत्रिकीकरण अशा विविध योजनांचा लाभ घेतला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी किशोर आहेर आदींचे मार्गदर्शन मिळाले आहे.

कुटुंबाचा मोठा आधार 
शेती विकसित करताना सुरवातीला खूप अडचणी आल्‍या. आईचे मार्गदर्शन कायम मोलाचे ठरले. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने आत्मविश्‍वास दिला. पत्नी सौ. मंदाकिनी, भाऊ तानाजी, भावाची पत्नी सौ. सुजाता यांनी शेतीत मोठी साथ मिळाली. गाडेकर यांची दोन मुले कृषी पदवीधर आहेत. मुलगी इंजिनियर असून पुणे येथे नोकरी करते. पुतणेही उच्चशिक्षित आहेत.

पुरस्कारांचे मानकरी 
शेतीतील कार्याचा गौरव म्‍हणून राज्‍य शासनाने सन २०१४ चा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्‍कार देऊन गाडेकर यांना सन्‍मानित केले आहे. यापूर्वीही शेतीनिष्ठ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. शेतीतील अभ्‍यास, अनुभव, यश स्वतःपुरते मर्यादित न ठेवता अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शनातून त्यांनी किफायतशीर शेतीचे धडे दिले आहेत.

गाडेकर यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
शेततळ्यात मत्स्यपालन. रोहू, कटला, मृगल आदींचे २५ पेट्या मत्स्यबीज 
सोडले आहे. त्यातून उत्पन्नाची भर अपेक्षित आहे. 
सुमारे एक कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यातून संपूर्ण शेतीला पाणी पुरविण्यात येते. पंचवीस एकराला ठिबकचा वापर केला आहे. काटेकोर नियोजनातून पाणी देण्यात येते.
फळबागांसाठी आवश्‍यक सुविधा असलेले पॅकहाउस आहे.
 यांत्रिकीकरणातून मजूरटंचाईवर मात केली अाहे. फवारणीसाठी ब्‍लोअर, पावडर धुरळणी यंत्र, आंतरमशागतीसाठी विविध अवजारे उपयोगात आणली आहेत.