कांदा खरेदीस मुदतवाढ द्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात २०१६-१७ मध्ये कांद्याचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे दर घसरून शेतकरी आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागले होते. यंदाही ३२ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. राज्यात अद्याप मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्याच्या खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे केली आहे.

मध्य प्रदेशात डाळी, कडधान्य आणि कांद्याचे दर आधारभूत किमतीच्या खाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अन्नमंत्री रामविलास पासवान आणि कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली. पावसाळ्यापूर्वी डाळी, कांदा आणि कडधान्य खरेदीची गरज असून कांदा खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी चौहान यांनी केली. सध्या येथे ३० जूनपर्यंत कांदा खरेदीला मुदत दिलेली आहे. शेतीमालास रास्त दर मिळावेत, शेतकऱ्यांनी कर्जमाफी आणि हमीभाव आदी मागण्यांसाठी येथे नुकतेच तीव्र शेतकरी आंदोलन झाले होते. आंदोलनात मंदसौर जिल्ह्यात ६ जूनला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाले होते. कर्जबाजारीपणा, आर्थिक अडचणीमुळे मागील पंधरा दिवसांत राज्यातील २२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. या पार्श्वभूमीवर शिवराज यांनी कृषिमंत्री सिंह आणि अन्नमंत्री पासवान यांना भेटून परिस्थिती समजावून सांगितली आहे. यावर केंद्रामार्फत राज्य सरकारला शक्य तेवढे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन सिंह आणि पासवान यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.