तूर उत्पादकांना ‘मेसेज’ची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

२० लाख क्विंटल तुरीला अपेक्षा हमीभावाची

पुणे - नोंदणी असलेली तूर १० जूनपर्यंत घेण्याचे निर्देश असताना असंख्य केंद्रांवर पाच-सहा जूनलाच मोजमाप बंद करण्यात अाले. कुठे ठेवायला जागा नसल्याचे, तर कुठे पावसाचे कारण सांगितले गेले. शासनाच्या अावाहनानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन नोंदणी केली. नोंदणी करताना तुम्हाला मोबाईलद्वारे मेसेज येईल, तुम्ही त्यानंतरच तूर घेऊन या, असे सांगितले गेले अाहे. मोजमापच बंद केल्याने शेतकरी आता फक्त कधी मेसेज येईल याचीच प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे. 

२० लाख क्विंटल तुरीला अपेक्षा हमीभावाची

पुणे - नोंदणी असलेली तूर १० जूनपर्यंत घेण्याचे निर्देश असताना असंख्य केंद्रांवर पाच-सहा जूनलाच मोजमाप बंद करण्यात अाले. कुठे ठेवायला जागा नसल्याचे, तर कुठे पावसाचे कारण सांगितले गेले. शासनाच्या अावाहनानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन नोंदणी केली. नोंदणी करताना तुम्हाला मोबाईलद्वारे मेसेज येईल, तुम्ही त्यानंतरच तूर घेऊन या, असे सांगितले गेले अाहे. मोजमापच बंद केल्याने शेतकरी आता फक्त कधी मेसेज येईल याचीच प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र आहे. 

राज्यात यंदा तुरीचे भरघोस उत्पादन झाले. त्यामुळे घसरलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर दोन तीन वेळा हमीभावाने तूर खरेदीची मुदत वाढविण्यात आली. या विषयी शेतकऱ्यांनी राज्यभर आंदोलनेही केली. परिणामी तुरीचा शेवटचा दाणासुद्धा खरेदी केल्या जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत शेतकऱ्यांचा रोष शमविण्याचा प्रयत्न केला. खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी टोकण पद्धती अवलंबिण्यात आली होती.

वऱ्हाडात अाठ लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर अद्यापही शिल्लक

अकोला - तूर खरेदीची प्रक्रिया बंद झाल्याने वऱ्हाडातील हजारो शेतकरी चिंतातुर झाले आहेत. तूर खरेदी पूर्ववत करण्याबाबत शासनाचे कुठलेही अादेश नसल्याने यंत्रणा हातावर हात देऊन बसली अाहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला, बुलडाणा अाणि वाशीम या तीन जिल्ह्यांमध्ये अाठ लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर विक्री व्हायची शिल्लक असल्याचा अंदाज अाहे.

या संपूर्ण हंगामात तूरविक्रीने शेतकऱ्यांनी परीक्षा घेतली अाहे. खुल्या बाजारातील किमती घसरल्याने शासनाने हमीभावाने खरेदी सुरू केली. एप्रिल महिन्यात ही खरेदी बंद केली. राज्याने पुन्हा केंद्राकडून एक लाख टन खरेदीची परवानगी अाणत नाफेडमार्फत खरेदी सुरू केली. अाता ही खरेदीसुद्धा बंद झाली अाहे. नोंदणी असलेली तूर १० जूनपर्यंत घेण्याचे निर्देश असताना असंख्य केंद्रांवर पाच-सहा जूनलाच मोजमाप बंद करण्यात अाले. कुठे ठेवायला जागा नसल्याचे, तर कुठे पावसाचे कारण सांगितले गेले. अाता तर पुढील खरेदीचे अादेशच नसल्याचे नाफेडचे अधिकारी सांगत अाहेत. शासनाच्या अावाहनानुसार शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांवर जाऊन नोंदणी केली.

नोंदणी करताना तुम्हाला मोबाईलद्वारे मेसेज येईल, तुम्ही त्यानंतरच तूर घेऊन या, असे सांगितले गेले अाहे. अाता मोजमापच बंद केल्याने शेतकरी मेसेज येण्याची प्रतीक्षा करीत अाहेत. अकोला जिल्ह्यात किमान तीन लाख, बुलडाण्यात साडेतीन लाख, तर वाशीममध्ये दीड लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर शिल्लक अाहे. जवळपास १५ दिवसांपासून मोजमाप बंद केल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पैशांची गरज म्हणून कमी दराने तूर खुल्या बाजारात विकली अाहे, तर काहींनी हातउसनवारी करून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा सुरू ठेवली अाहे.      

वाशीम जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना ‘घुगऱ्या’
तुरीचा प्रश्न बिकट झाला असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशीम येथून मुख्यमंत्र्यांना शिजवलेल्या तुरीच्या ‘घुगऱ्या’ पाठविण्यात अाल्या अाहेत. या ठिकाणी दीड लाख क्विंटल तूर नाफेडने खरेदी करण्यास नकार दिला अाहे. 

चार लाख क्‍विंटल तूर घरात पडून

अमरावती जिल्ह्यात १८ हजारांवर शेतकऱ्यांसमोर चिंता

अमरावती - जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले असून, त्यांची ४ लाख क्‍विंटल तूर विकायची शिल्लक आहे. राज्यकर्त्यांनी मध्यातच तुरीचा बाजार गुंडाळल्याने शेतकऱ्यांसमोर नवे आर्थिक संकट उभे ठाकले आहे

जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांमध्ये तूर खरेदीचे शासकीय केंद्र सुरू होते. १० जूनपर्यंत १० हजार ४६० शेतकऱ्यांची १ लाख ९६ हजार ४०६ क्‍विंटल तूर खरेदी केली गेली. प्रत्यक्षात १९ हजार ७९५ शेतकऱ्यांची ४ लाख ३९ हजार ७७८ क्‍विंटल तूर खरेदी करावयाची आहे. बाजार समितीने शासकीय केंद्रावरून १८ हजार ६४५ टोकन दिले असून, त्यानुसार लाख १६ हजार ७९ क्‍विंटल तुरीची मोजणी शिल्लक आहे. ही तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असताना खरेदी बंदचे आदेश बाजार समितीत धडकले. साधारणतः १५ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या तूर खरेदीस अधिक उत्पादनामुळे २५ एप्रिल व नंतर ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली; परंतु कधी ग्रेडर नाही, कधी बारदाना नाही, तर कधी साठवणुकीसाठी गोदाम नाही, अशा कारणांमुळे ती रखडत राहिली. ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश ८ मे रोजी काढण्यात आल्यावर १९ मे पासून प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली. 

केंद्रनिहाय शिल्लक तूर चौकटीत टोकन 
अचलपूर - ३७,१५२ क्‍विंटल (१७९५) 
अमरावती - १,०२,६६९ क्‍विंटल (३६५०) 
अंजनगाव - ३५,६०७ क्‍विंटल (२१४९)
चांदूरबाजार - २३,५११ क्‍विंटल (१२३३) 
चांदूररेल्वे - ३३,९७२ क्‍विंटल (१७६९) 
दर्यापूर - ७४,०५६ क्‍विंटल (२७३८) 
धामणगाव - ११,५७३ क्‍विंटल (३३३) 
धारणी - ११६४ क्‍विंटल (८४) 
मोर्शी - ३८,९३१ क्‍विंटल (१९१५) 
नांदगाव - ३४,३४४ क्‍विंटल (१७९२) 
तिवसा - २१,१५३ क्‍विंटल (९२३) 
वरुड - २१४४ क्‍विंटल (२६४) 

शिल्लक तूर, चुकारे
 वऱ्हाड - ८ लाख क्विंटलपेक्षा जास्त
 अमरावती विभाग - ४ लाख क्‍विंटल 
 लातूर - २ लाख क्विंटलपेक्षा जास्त (४५ कोटींचे चुकारे बाकी)
 नांदेड - १६ ते १७ हजार क्विंटल (१५ कोटींपर्यंत चुकारे बाकी)
 औरंगाबाद - २ ते ३ कोटींचे चुकारे बाकी