हवामानातील बदलासाठी ढग समजून घेणे आवश्यक

प्रमोद शिंदे, प्रल्हाद जायभाये
गुरुवार, 23 मार्च 2017

जागतिक हवामान संघटना (डब्ल्यू एम ओ) या संस्थेची स्थापना २३ मार्च १९५० रोजी जिनिव्हा येथे झाली. त्यानिमित्त हा दिवस दर वर्षी “जागतिक हवामान दिन” म्हणून साजरा केला जातो. हवामानविषयक सर्व यंत्रसामग्री व तांत्रिक बाबींचे नियमन ही संघटना करते. आज या संस्थेचे भारतासहित सुमारे १९१ देश सदस्य आहेत. या विशेष दिवसासाठी दरवर्षी एक थीम निवडली जाते. या वर्षीची थीम आहे - ढगांना जाणून घ्या... 

हवामानामध्ये तीव्र बदल होत असून, दुष्काळ, गारपीट, अनियमित व अवेळी पाऊस, थंडी, उष्ण तापमान यांची तीव्रता वाढत आहे. महाराष्ट्रात वारंवार झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे हवामानातील बदल व त्याचे कृषी क्षेत्रावरील परिणाम याविषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता वाढत आहे. या वर्षीच्या थीमनुसार ढगांचे विविध प्रकार, त्यांच्या एकूणच जल व सजीव साखळीतील सहभाग याविषयी जागतिक पातळीवर सातत्याने अभ्यास होत आहे. 

हवामान अंदाज मिळविण्यासाठी ढगांची स्थान महत्त्वाचे असून, त्यांच्या नोंदी सातत्याने घेतल्या जातातत. आपल्याला पाणी उपलब्ध करून देणारे मध्यस्तरीय ढग (अल्टोस्ट्रेटस क्लाउड), वर्षास्तरीय ढग (निंबोस्ट्रेटस क्लाउड) आणि कापशी वर्षा ढग (क्युम्युलो निंबस क्लाउड) हे तीन प्रकार आहेत.

  • औद्योगिक क्रांतीनंतर अडीचशे वर्षांमध्ये वातावरणामध्ये कर्बवायू मोठ्या प्रमाणात मिसळला गेला. त्यातूनही ढग व वातावरणामध्ये अनेक बदल झाले आहेत. जागतिक तापमानवाढीसाठी झाडांची तोड, वाढते हरितगृह वायूंचे प्रमाण, प्रदूषण ही कारणे मानली जात असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना कार्यरत आहे. 
  • सध्या इंटरगव्हर्नमेंटक पॅनेल ऑफ क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ही संघटना कार्यरत आहे. त्यात १३० पेक्षा अधिक देशांतील सुमारे २५०० संशोधक अभ्यास करून आपला अहवाल देतात. त्यानुसार पुढील शतकामध्ये जागतिक तापमानामध्ये १.१ ते ६.४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कर्बवायूचे प्रमाण पूर्व औद्योगिक पातळीच्या दुप्पट झाल्यास जागतिक सरासरी तापमान २ ते ४.५ अंशाने वाढेल. परिणामी पर्वतीय हिमनद्या आणि हिम आच्छादनाचा ­हास होईल. अनेक समुद्रकिनारे आणि कमी उंचीची बेटे पाण्याखाली जातील. 

हवामान बदलाचे शेतीवरील दुष्परिणाम

  • तापमान वाढ, किमान व कमाल तापमानातील तफावत, हवेतील आर्द्रता, अनियमित पाऊस, गारपीट, वारंवार घडणा­ऱ्या नैसर्गिक आपत्ती याबरोबरच पिकांवरील कीड, रोगांच्या प्रादुर्भावात मोठी भर पडेल. उदा. १५ मार्च रोजी राज्यात झालेल्या वादळी वारे, पाऊस व गारपीट यांचा फटका ८० ते ८५ हजार हेक्टरवरील पिकांना बसला. 
  • बदलत्या तापमानाचा पाळीव पशुपक्षी यांच्या मृत्यदरामध्ये वाढ होईल. थंडीची किंवा उष्णतेची लाट यांचा मोठा फटका कोंबड्या, मेंढ्या, शेळ्या यासह गाय, म्हैस अशा मोठ्या जनावरांना बसेल. 

उपाययोजना : 

  • स्वतंत्र कृषी हवामान संशोधन केंद्र स्थापन करून कार्यान्वित करणे गरजेचे आहे. 
  • सर्कलनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करून, हवामानाच्या अचूक नोंदी आवश्यक. 
  • कोरडवाहू पिकासाठी व अजैविक ताणांचा अभ्यास करणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवणे. 
  • वातावरण बदलांनुरूप शेती पद्धतीचा अवलंब करणे. हवामानविषयक जागरूकता वाढवणे. हवामानआधारित सल्ला केंद्राची सर्कल किंवा तालुकानिहाय उभारणी करणे. 

     
संपर्क : प्रमोद शिंदे, ७५८८५६६६१५ 
(तांत्रिक अधिकारी, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)