वयाच्या पासष्टीतही आरोग्यदायी सेंद्रिय अन्न पिकवण्याची जिद्द  

संतोष मुंढे
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद जिल्ह्यातील घोडेगाव येथील सांडू पाटील जाधव वयाच्या पासष्टीतही तरुणाच्या उत्साहाने नऊ एकरांत आरोग्यदायी अन्न पिकवीत आहेत. नऊ वर्षांपूर्वीच रासायनिक शेती शंभर टक्के बंद करून केवळ सेंद्रिय घटकांच्या जोरावर बहुविध पिके चांगल्या उत्पादनक्षमतेसह घेत आहेत. शेतीतला खर्चही अत्यंत कमी झाला आहे. शिवाय मिळणारे उत्पादनही अत्यंत दर्जेदार असल्याचे ते सांगतात.

सुमारे दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले घोडेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्‍यात येते. साठ-सत्तरच्या दशकात या गावातील ऊस आणि गुऱ्हाळाची भुरळ साऱ्यांनाच पडलेली होती. त्या वेळी तयार होणाऱ्या रसायनमुक्‍त गुळाची चवच न्यारी होती, असे जुन्या पिढीचे शेतकरी सांगतात. याच गावातील सांडू पुंजाजी जाधव हे वयाच्या पासष्टीतील शेतकरी. पण शेतीत युवकांनाही लाजवतील असा कामाचा आवाका. एकत्र कुटुंबात सुमारे चाळीस एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतीचा सांभाळ करणारे सांडू पाटील हे कुटुंब विभक्‍त झाल्यानंतर रसायनमुक्‍त शेतीकडे वळले ते कायमचेच.

रासायनिक शेतीला सोडचिठ्ठी 
विभक्‍त झाल्यानंतर सांडू पाटील जाधव यांच्या वाट्याला आली ती नऊ एकर शेती. रासायनिक शेती करताना खर्चाचं मोजमापच नसायचं. एकदा नगर जिल्ह्यात आयोजित सेंद्रिय शेतीच्या कार्यक्रमाला सांडू पाटील उपस्थित राहिले. त्यानंतर त्यांच्या शेती पद्धतीचं रूपच बदलून गेलं. शेतीच्या पहिल्या वर्षी बियाण्याव्यतिरिक्‍त बाहेरचं काहीच विकत आणलं नाही. आज नऊ वर्षांनंतरही हीच परिस्थिती कायम आहे. सुरवातीची काही वर्षे उत्पादनाच्या अनुषंगाने फार काही आश्वासक घडलं नाही. पण जिद्द सोडली नाही. सातत्य ठेवल्यानं सेंद्रिय शेती खर्चाच्या तुलनेत समाधान देणारं उत्पादन देऊ लागली आहे. 

पीकपद्धती 
बाजरी, कपाशी, तूर, अाले, ऊस, गहू, हरभरा, ज्वारी  
पूर्वी पाटील ऊस करायचे. अलीकडील काळात दुष्काळात त्याचे नियोजन करणे अशक्य झाले आहे. यंदा मात्र ऊस बरा असल्याने पुन्हा गुऱ्हाळ सुरू करता येईल याची चाचपणी ते करताहेत. 
लसणाचे जवळपास २० ते ३० गुंठ्यांत कायम पीक. गावरान लसूण कायम असतो. विक्रीव्यवस्था मात्र पाटील यांच्या अर्धांगिनी आसराबाई यांच्याकडे असते. त्याचा हिशेब त्याच ठेवतात.  
जो आंबा चवीला चांगला वाटेल त्याच्या कोयी आणून लावल्या. बांधावर सुमारे १६ वाणांची आंब्याची झाडे हळहळू आकार घेत आहेत.  
सेंद्रिय पद्धतीत सुरवातीला उत्पादन कमी मिळायचे. आता रासायनिक शेतीच्या तुलनेत प्रत्येक पिकाचे चांगले उत्पादन मिळते. उदा. कपाशीचे एकरी १५ क्विंटल, गव्हाचे १७ ते २० क्विंटल, सोयाबीन १० ते १२ क्विंटल, हलक्या मातीतील हरभऱ्याचे सहा क्विंटल. मुख्य म्हणजे रासायनिक खते, कीडनाशके व काही प्रमाणात बियाण्यांवरील खर्च पूर्ण थांबला आहे. 

गव्हाची हातोहात विक्री 
गेल्या वर्षी गव्हाच्या एकूण उत्पादित ९० क्‍विंटल मालापैकी सुमारे ४० क्‍विंटल मालाची आजवर विक्री केली. सेंद्रिय गव्हाला कृषी विभाग व आत्मा यांच्या सहकार्यातून थेट ग्राहकांपर्यंत पोचवणे शक्य झाले. त्यास २५०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला.  

पूरक दुग्ध व्यवसाय 
कुटुंब विभक्‍त झाले त्या वेळी पाटील यांच्या वाट्याला चार म्हशी आणि एक देशी गाय आली. गाईंची संख्या आज आठवर नेली आहे. दररोज दहा ते पंधरा लिटर दूध कुटुंबासाठी उपयोगात येऊन उर्वरित विक्रीला जातं. महिन्याला त्यातून सुमारे २५ ते ३० हजार रुपये मिळतात. जमिनीला शेणखताचा बोनस मिळतो. यंदा तीन म्हशींची वाढ केली आहे. 

सांडू पाटील यांच्या सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये 
पाच म्हशी, आठ गावरान गाई व बैल यांचे मलमूत्र मोठ्या खड्ड्यात साठवले जाते. मोटरच्या साह्याने ही स्लरी पिकांना ठिबकद्वारे दिली जाते. 
स्लरीमुळे ठिबक यंत्रणा ‘चोकअप’ व्हायची. मग एकेठिकाणी पाइपला कापड लावून स्लरी गाळण करण्याची सोय केली. तेथून स्लरी लिफ्ट करून फिल्टर व त्यानंतर ठिबकच्या पाइपांना जोडण्याची सोय केली. 
गांडूळ खतनिर्मितीसाठी चार छोटे हौद. पीकअवशेष व शेणखत यांचा वापर करून उत्तम प्रकारची गांडूळ खत निर्मिती. शेतकरी गांडुळांची खरेदी करतात. यंदा त्यापासून जवळपास पंधरा हजारांचे अर्थार्जन.  
अाले पिकाला आठ दिवसांआड चार महिने जनावरांच्या मलमुत्राची स्लरी ठिबकद्वारे 
कपाशीलाही आठ दिवस ते पंधरवड्याने बोंडे लागेपर्यंत स्लरी. प्रसंगी पाटानेही सोडली जाते.  
किडी- रोगांच्या प्रतिबंधासाठी दशपर्णी अर्काचा वापर.

सांडू पाटील जाधव, ७५०७५५५२८६