फळबागेसह एकात्मिक शेतीचे जगताप यांचे आदर्श मॉडेल

फळबागेसह एकात्मिक शेतीचे जगताप यांचे आदर्श मॉडेल

बुलडाणा जिल्ह्यातील वळती येथील तेजराव जगताप व त्यांची मुले मोहन व घनश्याम यांनी सुमारे साडेचार एकरांवर फळपिकांचे विविध प्रयोग आकारास आणले आहेत. कोरडवाहू शेतीत नव्या तंत्राची जोड देत देशी गायींचे संगोपन, रोपवाटिका अशा उपक्रमांतून निसर्गपूरक व नफ्याच्या शेतीचे उत्कृष्ट मॉडेल तयार केले अाहे.  ‘जादू’ अर्थात जगताप ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट युनिट असे फार्मचे नामकरण केले आहे. 

बुलडाणा जिल्ह्यात चिखली तालुका फळबागांसाठी दिवसेंदिवस प्रसिद्ध होत अाहे. तालुक्यातील वळती येथील सेवानिवृत्त शिक्षक तेजराव जगताप पारंपरिक शेतीला नवतंत्राची जोड देत व नव्या प्रयोगांची कास धरीत नोकरीइतकीच अार्थिक मिळकत शेतीतून करीत आहेत. त्यांची मुले माेहन व घनश्याम सध्या शेतीची जबाबदारी सांभाळत आहेत. मोहन एमएपर्यंत तर घनश्याम बीएससीपर्यंत शिकले अाहेत. या जगताप बंधूंनी अापल्या फार्मचे नाव ‘जादू’ (जगताप ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट युनिट) असे ठेवले अाहे. 

रोपवाटिका
जगताप यांच्या प्रयोगांची ख्याती सर्वत्र पसरली अाहे. शेतकरी त्यांच्या शेताला भेटी देत असतात. त्यावेळी ते रोपांचीही मागणी करायचे. ही गरज अोळखून रोपवाटिका सुरू केली. त्यात फळझाडे, फूलझाडे, भाजीपालावर्गीय पिकांची रोपे बनवून त्यांची माफक दराने विक्री होते. शेतकऱ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खास काळजी घेतात. दहा गुंठ्यातील शेडनेटमध्ये फळबागांची रोपे तयार केली जातात. 

देशी गोपालन 
शेतीला फायदेशीर म्हणून गीर, लाल कंधारी अशा पाच गायी व तीन वासरे अाहेत. शेण बायोगॅस तसेच शेतीसाठी वापरले जाते. वर्षभर सकस व हिरवा चारा उपलब्ध व्हावा या हेतूने १५ गुंठ्यात संपूर्णा व गुणवंत यांची लागवड केली अाहे. या जनावरांची गरज पूर्ण झाल्यानंतर उर्वरित चारा बेणे अत्यंत माफक दराने विकला जातो. 

बायोगॅस निर्मिती- जगताप यांचे कुटुंब गावाशेजारीच असलेल्या शेतात राहते. या ठिकाणी बायोगॅस युनिटची उभारणी केली. त्यातून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाची गरज भागवली जाते. त्यातून महिन्याचा मोठा खर्च कमी झाला आहे. शिवाय शेणस्लरीचा उपयोग फळबागांसाठी होतो. 

बायोडायनॅमिक खतनिर्मिती- पीक अवशेष, पशुखाद्यातील भूस, शेणकाला या घटकांपासून जमिनीवर बेड तयार करून त्यामध्ये बायोडायनॅमिक मदर कल्चर टाकून कमी कालावधीमध्ये खत तयार केले जाते. 

शेण, गोमूत्रापासून उत्पादननिर्मिती- देशी गायींचे शेण व मूत्र यांचे महत्त्व वाढले आहे हे अोळखून मोहन यांनी त्यावर आधारीत उत्पादनांचे प्रशिक्षण घेतले. त्याअाधारे ते साबण, दंतमंजन, फेसपॅक, धूपबत्ती, तेल आदी उत्पादने बनवणार अाहेत.

‘जादू’मधील विविध प्रयोग"
जगताप यांची एकूण नऊ एकर शेती आहे. त्यात सुमारे साडेचार एकरांवर फळबाग आहे. लागवडीपूर्वी मोहन यांनी राज्यातील विविध भागातील प्रयोगशील शेतांना भेटी दिल्या. अापण वेगळे काही तरी करावे यातून धाडसी पाऊल टाकत सघन लागवड पद्धतीने फळबागा उभ्या केल्या.  

त्यातील ठळक बाबी अशा. 
प्रायोगिक लागवड  
कागदी लिंबू- प्रायोगिक तत्त्वावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विविध जातींच्या कागदी लिंबांची गेल्या हंगामात लागवड  ॲपल बोर व ड्रॅगन फ्रूट- मागील जुलैमध्ये प्रत्येकी पाच गुंठ्यात ॲपल बोर व ड्रॅगन फ्रूटची लागवड केली अाहे. 

शेवगा- गावरान शेवग्याच्या शेंगांना बाजारात चांगली मागणी राहात असल्याने १० गुंठ्यात जाणीवपूर्वक या वाणाला प्राधान्य दिले अाहे. सध्या प्रति झाड २२ किलोपर्यंत उत्पादन देत आहे.  

कोरडवाहू शेतीत प्रयोगशीलता 
एकदा अात्मविश्वास मिळाला की माणूस नव्या ऊर्जेेने कामाला लागतो. जगताप कुटुंबानेही सकारात्मक ऊर्जा घेत नवनवीन प्रयोग करण्याचा विडाच उचलला. 

सोयाबीन- फळबागांतील प्रयोगांप्रमाणे कोरडवाहू पिकांमध्येही ही वृत्ती जोपासली अाहे. 

दरवर्षी साधारणतः अडीच एकरात सोयाबीन असते. मागील हंगामात दीड एकरांत १८ क्विंटल म्हणजे एकरी १२ क्विंटल उतारा घेतला. 

तूर- मागील हंगामात दोन अोळीत अडीच फूट अंतर ठेऊन सलग पद्धतीने लागवड केली. पांढरी तूर चांगली झाली. एकरी साडे १० क्विंटल उत्पादन मिळाले. सध्या डाळनिर्मिती केली आहे. 

किलोला ११० रुपये दराने तिची विक्री करण्याचे नियोजन आहे. 

हरभरा- यंदा लाल हरभऱ्याची ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. तर काबुली हरभरा टोकण पद्धतीने घेतला. सव्वा एकरात तो साडेचौदा क्विंटल झाला. 

अन्य उपक्रम
शेततळे- शेतीत सर्वात मोठी अडचण पाण्याची येते. एक विहीर व बोअर घेऊनही पुरेशे पाणी मिळत नाही. उन्हाळ्यात केवळ अर्धा तास पाणी मिळते. ही गरज अोळखून २००९ मध्ये सुमारे वीस लाख लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. त्यात पॉलिथिनचे अस्तरीकरण केले अाहे. बाष्पीभवनानंतर सुमारे १० ते १२ लाख लिटर पाणी वापरण्यासाठी मिळते.     

दरवर्षी शिवार फेरी 
शासकीय यंत्रणा, कृषी विद्यापीठे दरवर्षी शिवार फेरी राबवितात. परंतु स्वतः पुढाकार घेऊन दरवर्षी शिवार फेरीचे अायोजन जगताप कुटुंबाने सुरू केले. 

डिसेंबरमध्ये अाजोबांच्या पुण्यस्मरणानिमित्त 
तीन दिवसांची शिवार फेरी ठेवली जाते. यावेळी येणाऱ्या शेतकऱ्यांची राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था मोफत केली जाते. मागील चार वर्षांपासून शेताला भेट देणाऱ्यांच्या नोंदी ठेवणे सुरू केले आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण साडेचार हजार शेतकऱ्यांनी भेट दिल्याची नोंद उपलब्ध अाहे.

ॲग्रोवनचा सिंहाचा वाटा
जगताप कुटुंब ॲग्रोवनचे नियमित वाचक अाहेत. त्यांच्याकडे विविध लेखांची अनेक वर्षांपासूनची कात्रणे संग्रहित अाहेत. हा लाखमोलाचा ठेवा म्हणून अापण जपत असल्याचे तेजराव यांनी सांगितले. नवीन शेती करणारे तसेच अनुभवी, तज्ज्ञ शेतकरी अशा सर्वांसाठी ॲग्रोवन ऊर्जास्त्रोत बनल्याचे ते म्हणाले.         

कृषी अभंगातून जनजागृती 
तेजराव शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले असून त्यांनीच डोळस शेती करण्यासाठी मुलांना पाठबळ दिले. त्यांना वाचन व अभंग निर्मितीची अावड अाहे. त्यांनी कृषी अभंग तयार केले आहेत. त्याची एक झलक  

शेती गोविले चित्त । म्हणोनि राहिलों निश्चिंत ।।
अाहे अवघेचि गोमटे । येरां व्यवसायी जे न भेटे ।।
जाली सकळही प्राप्ती । मान सन्मान सांगो किती ।।
भूमिदास म्हणे भाग्य । मिळें निरायम अारोग्य ।।
अाजच्या तरुण पिढीला ते खास करून विनंती करतात...
शेती उद्योगाची कास । धरा युवकांनो ध्यास ।।
मिळे पैसा अाणि मान । येरां व्यवसाया समान ।।
मन, डोके अाणि हात । लावा शेती उद्योगात ।।
लौकिक मिळवा विशेष । भूमिदास हेचि अास ।।

मोहन जगताप,  ९८२३२७२५४१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com