अवघे शेंडेवाडी शिवार झाले जलयुक्त!

गणेश फुंदे
बुधवार, 5 एप्रिल 2017

पूर्वी टॅंकरवर अवलंबून असलेल्या शेंडेवाडी (जि. नगर) गावची जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलस्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. झालेल्या कामांतून गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या अाहेत. त्यामुळे विविध पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरिपावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके, तर डाळिंब, सीताफळ या फळपिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले आहे.

पूर्वी टॅंकरवर अवलंबून असलेल्या शेंडेवाडी (जि. नगर) गावची जलयुक्‍त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलस्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू आहे. झालेल्या कामांतून गावशिवारातील विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या अाहेत. त्यामुळे विविध पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खरिपावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभरा ही पिके, तर डाळिंब, सीताफळ या फळपिकांसह भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले आहे. 

नगर जिल्ह्यात संगमनेर तालुका मुख्यालयापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेले दोन हजारांवर लोकसंख्येचे शेंडेवाडी गाव. गावच्या १६९३ हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे ७७५ हेक्‍टर क्षेत्रावर शेती केली जाते. गावची अर्थव्यवस्थाच मुळात शेतीवर अवलंबून आहे. शेंडेवाडीत सरासरी ४५० मिलिमीटरपर्यंतच पाऊस पडतो. पडलेल्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी गाव परिसरात कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे पाणी वाहून जात होते. त्यामुळे सतत पाणीटंचाई निर्माण व्हायची. गावात पाण्याचा कुठलाही सक्षम स्रोत नव्हता. त्यामुळे शेंडेवाडी बारमाही जिरायती गाव म्हणून ओळखले जायचे. 

बाजरी, मठ, हुलगा ही शेंडेवाडीतील खरिपाची मुुख्य पिकं. मात्र सिंचनाशिवाय शेती नाही हे गावकऱ्यांना पुरेपूर उमगलेलं. गावाचा पाणीटंचाईचा प्रश्‍न सोडवायचा असेल, तर जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविल्याशिवाय पर्याय नाही हे ग्रामस्थांच्या लक्षात आले. सरपंच उर्मिलाताई काळे, उपसरपंच बाळासाहेब डोळझाके यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन जलसंधारणाची कामे हाती घेतली. या सर्व कामांमध्ये कृषी विभागाचे सर्व अधिकारी, ग्रामसेवक प्रभाकर पोटफोडे यांचे जलसंधारणाच्या कामातील मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. 

भौगोलिक अभ्यासानंतर वाढविला लोकसहभाग
जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत जानेवारी २०१५ मध्ये थेट शिवारात कामांना सुरवात झाली. प्रथम गावाचा भौगोलिक अभ्यास झाला. लोकसहभाग वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले. जसजशी कामे होऊ लागली, तसतसे त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले. पीकपद्धतीत बदल घडू लागला. 

माळरानावर दिसू लागले पाणी 
झालेल्या कामांमुळे उजाड माळरान, कुसळे दिसणाऱ्या शिवारात पाणी दिसू लागले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहू लागला. पहिल्यांदाच खरिपाविना अन्य हंगामांत दुसरे पीक घेऊ न शकणारे शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळाले. शेंडेवाडीत साकारलेल्या कामांमुळे सुमारे दीडशे एकर शेती नव्याने सिंचनाखाली येईल असा अंदाजही पहिल्या टप्प्यात कृषी विभागाकडून बांधण्यात आला आहे. या क्षेत्रात हरभरा, गहू, कांदा, उन्हाळी भुईमूग, मका व चारा पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. 

गव्हाचे वाढले उत्पादन 
झालेल्या कामांतून माझ्या विहिरीला पाणी वाढले. शेततळ्यातील पाण्यामुळे कांदा लागवड करणे शक्‍य झाले. पाण्याची सोय झाल्याने डाळिंब लागवड केली आहे. गव्हाचे एकरी २१ क्विंटल उत्पादन झाले, असे गावातील शेतकरी बाळासाहेब वामन सांगतात. शेतीतील उत्पन्नातून शेतात टुमदार बंगला बांधणे त्यांना शक्य झाले आहे. जलयुक्‍त शिवार योजनेमुळे कांदा, गव्हाच्या उत्पादनासोबतच उन्हाळी भुईमूग घेणेही शक्‍य होणार असल्याचे वामन सांगतात. 

पाणीबचतीसाठी मल्चिंग 
शेंडेवाडी गाव पाणीदार होत असले तरी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने सुरू आहे. बाष्पीभवन रोखण्यासोबतच तणनियंत्रणात मल्चिंग फायदेशीर ठरत असल्याने या तंत्राचा वापर शेतकऱ्यांनी वाढविला आहे. वामन यांनी मल्चिंग तंत्राचा आधार घेतच डाळिंब लागवड केली. नव नव्या पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. 

उन्‍हाळी टोमॅटो व ठिबकचा वापर वाढला 
शेंडेवाडी गावात यंदा पाणी उपलब्‍ध असल्‍यामुळे गावातील सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांनी उन्‍हाळी टोमॅटोची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांनी हिरवी मिरची, टरबूज (कलिंगड) घेतले आहे. उन्‍हाळी हंगामात पाण्‍याचा पुरेपूर वापर करून शेतकऱ्यांना उन्‍हाळी हंगामाचे नियोजन करणे शक्य झाले आहे. गावात पूर्वी सुमारे १५ ते २० एकरांवर ठिबकचे क्षेत्र होते. त्यात वाढ झाली असून, ४५ एकरांपर्यंत ठिबकखालील क्षेत्र पोचले आहे. 

शेंडेवाडीत झालेली ठळक कामे 

 • महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानातून ५, तर लोकसहभागातून ३ अशी नाला खोली-रुंदीकरणाची एकूण ८ कामे झाली. यातून अंदाजे ३५ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. 
 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ३ विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. त्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली. 
 • संरक्षित शेती व फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढले असून, गावातील पीक पद्धतीत बदल होत आहे. 
 • ग्रामपंचायत माध्यमातून पाझर तलावातून सुमारे १५ हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला. यातून सुमारे १५ टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण होण्यास मदत झाली. 
 • लोकसहभागातून तीन नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले, यातून सुमारे १५ टीसीएम एवढी पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली आहे. 
 • लोकसहभागातून २०१४- १५ व २०१५-१६ या कालावधीत सुमारे १० वनराई बंधारे बांधण्यात आले. 
 • गावातील जुन्या कामांची दुरूस्ती व नवीन कामांमुळे अंदाजे १५० टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला. 

झालेल्या कामांची फलनिष्पत्ती 

 • गावातील शेतकरी भाजीपाला पिकांकडे वळला आहे. शेततळ्यांचाही भाजीपाला शेतीसाठी चांगला फायदा झाला आहे. 
 • विहिरींना पाणी वाढल्याने खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत पिके घेता येणे शक्‍य झाले. 
 • गावात पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसांत टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. आज मात्र टॅंकरची गरज भासणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. 
 • शेतीला पुरेसे पाणी मिळू लागल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. त्यातून शेतकरी व गावची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. 

गावात गेल्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. यंदा मात्र गावातील विहिरींना पाणी टिकून आहे. गावातील शेतकऱ्यांना भाजीपाला पिके घेणे, तसेच दोन हंगामांत पिके घेणे शक्य झाले आहे. टोमॅटोचे क्षेत्रही वाढू लागले आहे ही समाधानाची बाब आहे.
- उर्मिला भागा काळे, सरपंच, शेंडेवाडी 

माझ्‍याकडे सव्‍वादोन एकर शेती आहे. पूर्वी बाजरी, हरभरा ही पिके घेत होतो. आता कांदा, गहू, चारा घेत आहे. पूर्वी पाच ते सात हजार रुपयांपर्यंत उत्‍पन्न मिळायचे. यंदा हेच उत्‍पन्न पन्नास हजारांच्या आसपास पोचले आहे. गावात झालेली कामे आणि पाणी यातून गणित फायद्याचं झालं आहे.
नाना सीताराम उगले, शेंडेवाडी 
८८०५५७०४२२ 

संपर्क :
भागा काळे- ९८२२५२६१५० 
बाळासाहेब वामन : ९९२१७३८०४० 
विठ्ठल वामन- ९६२३१७५२८५ 

(लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, उपमाहिती कार्यालय, शिर्डी येथे कार्यरत आहेत.)

Web Title: CM Devendra Fadnavis's Jalayukta Shivar showing success in Shendewadi