भात लागवडीची पूर्वतयारी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

यंदा पाच एकरांवर भात लागवड करण्याचे नियोजन आहे. सध्या शेतात रोटर मारणे, बेड तयार करणे, बियाणे खरेदी करणे आदि कामांवर भर दिला जात आहे. भाताची रोपे उपलब्ध होण्यासाठी सुमारे वीस ते पंचवीस गुंठ्यांवर रोपवाटिका करणार आहे. 
- नीलेश शिंदे, शेतकरी, पिंपळोली, ता. मुळशी, जि. पुणे

पुणे : आगामी खरीप हंगामात भात पीक घेण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात जमीन मशागती, बेड तयार करणे, रोटर मारणे, जमीन भिजवणे आदी कामांना सुरवात झाली आहे. काही ठिकाणी भात रोपवाटिकांमध्ये बियाणे टाकण्यास सुरवात झाली आहे. 

पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर हे तालुके भात पिकांचे तालुके म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यात भाताचे सुमारे ६४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी शेतकरी दरवर्षी सुमारे ६० ते ६५ हजार हेक्टरवर भात लागवड करतात. भात पट्ट्यात प्रामुख्याने दरवर्षी पाऊस झाल्यानंतर म्हणजेच जून - जुलै महिन्यांत भात लागवड केली जाते. एका एकर भात लागवडीसाठी शेतकरी अर्ध्या गुंठ्यापासून ते पाच गुंठ्यांपर्यंत रोपवाटिका तयार करतात. साधारणपणे एक ते सव्वा महिन्याची रोपे झाल्यानंतर त्यांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते. सध्या जमिनीची नांगरट करणे, शेणखत टाकणे आदि कामे करण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याचे मुळशी तालुक्यातील पिंपळोली येथील शेतकरी नीलेश शिंदे यांनी सांगितले. 

यंदा भात रोपवाटिका क्षेत्रात वाढ 
यंदा वेळेवर पाऊस होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर भात रोपे उपलब्ध व्हावीत यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी सुमारे सात हजार हेक्टरवर भात रोपवाटिका करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले बियाणेही वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. चालू वर्षी खरिपात सुमारे १३ हजार ४७८ क्विंटल भात बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे.