'चासकमान'च्या गाळपेरात उन्हाळी पिके जोमात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

चास : चासकमान धरणाच्या गाळपेर क्षेत्रात शेतकऱ्यांनी घेतलेली पिके जोमात आली आहेत. या पिकांकडून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा बळिराजा बाळगून आहे. 

खेड तालुक्‍याचा पश्‍चिम पट्टा हा गेल्या अनेक वर्षांपासून भाताचे आगार म्हणूनच ओळखला जातो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने खरीप हंगामात भाताचे उत्पादन घेतल्यावर जमिनीतील ओलाव्यावर मसूर, हरभरा, वाटाणा अशी पिके घेतली जातात.

मात्र, चासकमान धरणानंतर या भागातील आदिवासींचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली. खरीप हंगामातील भाताच्या पिकानंतर रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, बटाटा यासह अन्य पिके धरणाच्या पाण्यावर घेतली जाऊ लागली. याशिवाय धरणाच्या गाळपेर भागात गेल्या काही वर्षांत उन्हाळी पिकेही शेतकरी घेत आहेत. उन्हाळी बाजरी, मका, कोथिंबीर, मेथी आणि भाजीपालावर्गीय पिके गाळपेर जमिनीत घेण्यात आली आहेत. उपलब्ध पाणी आणि स्वच्छ हवामान यामुळे पिके जोमात आली आहेत. या पिकापासून चांगल्या उत्पन्नाची आशा शेतकरी बाळगून आहेत. 

सध्या चासकमान धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू असून, नदीपात्रातूनही पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे गाळपेर क्षेत्रातील पिकांचा कालावधी पाहता शेवटच्या टप्प्यात या पिकांना पाण्याची कमतरता भासण्याची शक्‍यता आहे.