अवर्षणात उसाला पेरुचा हुकमी पर्याय

सुदर्शन सुतार 
बुधवार, 4 जानेवारी 2017

सोलापूर जिल्ह्यातील वाकाव (ता. माढा) हे उसासाठी प्रसिद्ध गाव. मात्र अलीकडील काळात पाण्याअभावी हे पीक तोट्यात आले आहे. त्यातूनच कमी पाणी, कमी खर्च व देखभाल लागणारे पीक म्हणून येथील सुधीर व रमेश या कोकाटे बंधूंनी काही वर्षांपूर्वी पेरूची निवड केली. क्षेत्र टप्पाटप्प्याने १० एकरांपर्यंत वाढवले. वर्षाला एकरी किमान एक ते दीड लाख रुपये व त्यात ४० टक्के नफा घेताना ऊस किंवा अन्य फळपिकापेक्षा हेच पीक अधिक फायदेशीर असल्याचे सिद्ध केले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात सीना नदीच्या काठावर माढा तालुक्‍यातील वाकाव, उंदरगाव, केवड ही गावे म्हणजे उसाचा पट्टाच मानली जातात. अलीकडील काळात पाऊस व पर्यायाने नदीला कमी झालेले पाणी यामुळे हे पीक तोट्यात आले आहे. वाकाव हे गाव माढा-वैराग रस्त्यावर उंदरगावपासून आत सुमारे सात-आठ किलोमीटरवर आहे. गावाच्या कडेलाच सुधीर व रमेश कोकाटे या बंधूंची १२ एकर शेती आहे. पैकी १० एकर पेरुच आहे. उर्वरित क्षेत्रावर गहू, तूर, ज्वारी आहे. शेताच्या मधूनच नदी वाहते. शेती दोन्ही बाजूला विभागली आहे. त्यामुळे पेरुच्या हंगामात या काठावरून त्या काठावर अक्षरक्षः बोटीने वाहतूक करावी लागते. 

शेती व अन्य व्यवसायाची कसरत 
कोकाटे बंधूंचे वडील सदाशिव पूर्वीपासूनच पेरुची शेती करायचे. त्यांचाच वारसा या बंधूंनी पुढे चालवला. मात्र आजच्या शेती व्यवस्थापनामध्ये कालानुरूप बदल केला आहे. त्यामुळेच उत्पादनात आघाडी घेतली आहे. दोघे बंधू शेतीतील मोटर व्यवसायात सक्रिय आहेत. हा व्यवसाय सतत सुरू असतो. त्यासाठी बाहेर जावे लागते. मात्र शेती व व्यवसाय अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागते. 

पेरूच वाटला फायदेशीर 
पेरू शेतीत सुमारे दहा वर्षांचा दीर्घ अनुभव सुधीर आणि रमेश यांच्यात तयार झाला आहे. पूर्वी त्यांचे वडील देशी वाणाच्या पेरुची लागवड करायचे. मात्र कोकाटे बंधूंनी पेरुबरोबरच सुरवातीला एक-दोन एकर ऊसही करून पाहिला. मात्र उसाला वर्षभर लागणारे पाणी, खते व अन्य निविष्ठांचा खर्च आणि मिळणारा दर यांचा ताळमेळ बसत नव्हता. आजही तीच अवस्था असल्याचे ते सांगतात. 

त्यामुळे पुन्हा त्यांनी पेरुकडेच वाट वळवली. पण वाणात बदल केला. सन २००५ मध्ये स्वतःच्या व्यवस्थानाखाली पेरुची पाच एकरांवर लागवड केली. सरदार (लखनौ ४९) हे वाण निवडले. बियांचे कमी प्रमाण, गोडीला चांगला, गुणवत्ताही उत्तम आणि आकाराने मध्यम अशी या पेरुची वैशिष्ट्ये आहेत. दोन ओळी आणि रोपातील अंतर प्रत्येकी १५ फूट ठेवले. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने उत्पादन व उत्पन्नाचा अंदाज घेत ही शेती अन्य पिकांच्या तुलनेत फायदेशीर ठरते आहे असे वाटल्यानंतर ती आज १० एकरांवर विस्तारली आहे. त्यात जुनी ४०० ते ५०० तर नवी ३०० झाडे आहेत. 

व्यवस्थापनातील बाबी 
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बागेची स्वच्छता केली जाते. शेंडे मारणे, छाटणी यासारखी कामे केली जातात. गावखत आणि शेणखत प्रत्येक झाडाला अर्धा किलो याप्रमाणे दिले जाते. त्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या पंधरवड्यात दोनदा दोन दिवस सलगपणे पाणी दिले जाते. त्यानंतर जून-जुलैपर्यंत याच पद्धतीने बाग स्वच्छ करणे आणि दर पंधरा दिवसांनी सलग दोन दिवस पाणी दिले जाते. जून-जुलैमध्ये बाग फुलोऱ्यात येते. बहार धरायच्या अाधी गावखत आणि शेणखत तर बहार धरल्यानंतर वाढीच्या अवस्थेनुसार १८-४६-०, १५-१५-१५, १०-२६-२६ आदींचा वापर केला जातो. हवामानानुसार किडी-रोगांचे नियंत्रण दिसल्यावर कीडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. 

एकरी मिळणारे उत्पन्न 
ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत पेरुचा काढणी हंगाम सुरू होतो. प्रत्येकी तीन एकरचे एकापाठोपाठ एक असे बहार नियोजन केले आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये हे कुटूंब फळकाढणीत व्यस्त दिसते. दरवर्षी एकरी सात ते आठ टन उत्पादन मिळते. यंदाही तेवढेच मिळेल अशी अपेक्षा आहे. सध्या प्रति किलो १५ रुपयांचा दर मिळतो आहे. तसा अलीकडील वर्षांत किलोला सरासरी दर ८ ते १० रुपये राहिला आहे. एकरी साधारण एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न दरानुसार मिळते. त्यातून ६० टक्के खर्च होऊन ४० टक्के नफा पदरात पडतो. 

सोलापूर मार्केटला उठाव 
पेरू विक्रीचा हंगाम सुरू झाल्यानंतर मार्केटचा अंदाज घेतला जातो. मुंबई, पुणे या मार्केटलाही दरानुसार पेरू पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहतुकीचे अंतर, मिळणारा दर, आणि चांगला उठाव या बाबी पाहाता सोलापूर बाजार समितीचे मार्केटच अधिक फायदेशीर ठरत असल्याचा कोकाटे बंधूंचा 
अनुभव आहे. 

एकत्रित कुटुंब ही ताकद 
आज शेतीत मजुरांची समस्या मोठी आहे. मात्र एकत्रित कुटूंब हीच कोकाटे यांची शेतीतील मोठी ताकद आहे. आई-वडील, दोघे भाऊ, दोघांच्या पत्नी, मुले ही सगळीच मंडळी शेतात खुरपणीपासून ते काढणीपर्यंत जमेल ती कामे आणि झेपेल ती जबाबदारी पार पाडतात. त्यामुळेच बारा एकर क्षेत्रावरील शेती सांभाळणे कुटुंबाला शक्य झाले आहे. पेरू पिकाने तर त्यांचे कुटुंब एकत्रित बांधले गेले आहे. उसाच्या पट्ट्यात पेरुतील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची अोळख झाली आहे. अनेक शेतकरी त्यांची बाग पाहण्यासाठी आवर्जून येथे येतात. 
 

छोट्या बोटीची खरेदी 
कोकाटे यांच्या शेताची विभागणी नदीमुळे झाली आहे. चांगला पाऊस झाला आणि पाणी टिकून राहिले तर अलीकडच्या शेतातून पलिकडील शेतात पेरुची वाहतूक करणे कठीण काम होते. त्यासाठी वेळप्रसंगी घरच्या माणसांची साखळी करून प्रत्येकजण पेरुचे क्रेट डोक्यावरून वाहून नदीच्या किनाऱ्यापर्यंत आणतो. अलीकडील वर्षांत पाऊस कमी झाल्याने ट्रॅक्‍टरद्वारे वाहतूक केली जाते आहे. मात्र दूरदृष्टी ठेऊन कोकाटे यांनी छोटी बोट खरेदी केली आहे. 

संपर्क - 
सुधीर कोकाटे - ९९७०७६७१०९ 
रमेश कोकोटे - ९९६०२२६८५५ 

Web Title: guava farming in maharashtra