फळबाग सल्ला 

फळबाग सल्ला 

सध्या आंबा काढणीचा हंगाम ऐन मध्यावर आहे, तर काजूची बहुतांश ठिकाणी काढणी संपलेली आहे. कोकम, करवंद, जांभूळ व फणस या फळांचा हंगाम सुरू असून, येत्या दीड महिन्यामध्ये तो बहुतांश संपेल. या फळपिकांच्या काढणीनंतरचे बागेचे व्यवस्थापन उत्पादकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारे हे व्यवस्थापन न केल्यास बागेच्या उत्पादकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. 
व्यवस्थापनाच्या बाबी :
आंबा :
फळे काढल्यानंतर झाडाच्या आतल्या व बाहेरच्या बाजूच्या मेलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. झाडाच्या मधल्या मुख्य फांदीची छाटणी करावी. जर मधल्या मुख्य फांदीची छाटणी यापूर्वीच केली असेल तर अशा ठिकाणची पाहणी करून पुन्हा जर फांद्या वाढल्या असतील तर त्यांची छाटणी आवश्यक आहे. जेणेकरून झाडांमध्ये सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील. कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. ज्या फांद्यांवर फळे धरली होती, अशा फांद्या सुमारे ३० ते ४५ सें.मी. अंतरापर्यंत पाठीमागे कापाव्यात. जर झाडावरती फांद्या घन झाल्या असतील तर अशा फांद्यांची विरळणी करावी. 

काजू :
फळ काढणी झाल्यानंतर झाडावरील मेलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. बऱ्याचदा अशा फांद्या झाडाच्या आतील बाजूस आढळतात. अशा प्रकारच्या फांद्या काढल्यामुळे फळ उत्पादक फांद्या वाढण्यास मदत होते. 

जांभूळ :
फळ काढणी झाल्यानंतर झाडाची उंची नियंत्रित ठेवण्यासाठी झाडाच्या वरच्या शेंड्याची छाटणी करावी. ही छाटणी केल्यामुळे जांभळाच्या उत्पादक फांद्यांमध्ये वाढ होते. परिणामी उत्पादन वाढते. काढणी योग्य प्रकारे करण्यासाठी तसेच झाडाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने झाडांची उंची १० ते १२ फुटांपर्यंत ठेवणे आवश्यक आहे. काढणीनंतर झाडावरील मेलेल्या फांद्यांची छाटणी करावी. मुख्य खोड तसेच मुख्य फांद्यावर असलेल्या सरळ वाढणाऱ्या अनुत्पादक फांद्या काढून टाकाव्यात. 

फणस :
फळे काढून झाल्यानंतर झाडाचे मुख्य खोड, मुख्य फांद्यांवर असलेल्या सरळ वाढणाऱ्या अनुत्पादक फांद्या काढून टाकाव्यात. 

करवंद :
लागवड कलमाद्वारे केली असल्यास सरळ वाढणाऱ्या फांद्यांचे प्रमाण जास्त असते. वेळोवेळी या सरळ वाढणाऱ्या फांद्या काढणे आवश्यक आहे. ज्यामुळे फुले आणि फळधारणा होणाऱ्या फांद्यांना जोर भेटतो. उत्पादनामध्ये वाढ होते. 
 
कोकम :
कोकमची झाडे सरळ वाढत असतात. कालांतराने ती एवढी मोठी होतात, की झाडावर चढून फळे काढणे कठीण होते. जांभळाप्रमाणे कोकमच्या झाडांची उंची मर्यादित ठेवणे फायदेशीर ठरते. 

नवीन लागवडीची पूर्वतयारी :
१) नवीन फळबाग करताना काटेकोर नियोजन आवश्यक आहे. हे नियोजन करताना योग्य जागी योग्य झाड या तत्त्वाचा अवलंब करावा. 
२) कोकणामध्ये आंब्याची लागवड ही समुद्र किंवा खाडीच्या नजीकच्या डोंगर उतारावरील जमिनीवर करणे फायदेशीर ठरते. ज्या ठिकाणी भारशेतीसाठी जागा उपलब्ध आहे, अशा खाचरात लागवड करू नये. ज्या डोंगर उतारावर सावलीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणीदेखील आंब्याची लागवड करू नये. 
३) समुद्रापासून दूर असलेल्या डोंगर उताराच्या जमिनीवर काजू लागवड करणे फायदेशीर ठरते. मात्र कातळावर काजूची लागवड करू नये. 
४) उत्तम जातीची दर्जेदार कलमे किंवा रोपे लावून फळबाग लागवड करावी. यासाठी खात्रीशीर रोपवाटिका निवडाव्यात. 
५) अलीकडील काळात पारंपरिक लागवडीपेक्षा घन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल जास्त आहे. घन लागवड केल्यानंतर झाडाची वाढ योग्यप्रकारे नियंत्रित करणे अत्यावश्यक आहे. शिफारस केलेल्या योग्य अंतरावर लागवड करावी. आंब्याची पारंपारीक लागवड १० x १० मी. अंतरावर केली जाते, तर घन लागवडीसाठी ५ x ५ मी. अंतराची शिफारस आहे. काजूची लागवड ७.५ मी. बाय ७.५ मी. अंतरावर, नारळाची लागवड ७.५ मी. बाय ७.५ मी. अंतरावर करावी. कोकम, जांभूळ, फणस आदींची लागवड ६ मी. x ६ मी. अंतरावर करावी. जांभळाची उंची नियंत्रित ठेवून ६ मी. x ४ मी. अंतरावर घन पद्धतीने लागवड करावी. 
६) ज्या ठिकाणी फळबागेचे नियोजन आहे, त्या ठिकाणी आखणी करून घ्यावी. फळबागांची लागवड करताना ती शक्यतो पावसाळ्याच्या सुरवातीला पण पाऊस स्थिरावल्यावर करावी. अती पावसाच्या काळात (जुलै, ऑगस्टमध्ये) लागवड करू नये. 

संपर्क : डॉ. पी. एम. हळदणकर, ९४२१८०९७२१ 
(उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com