गोडवा चिंचेच्या कॅंडी, जेलीचा.. रेडेकर दांपत्याच्या कष्टाचा..

राजकुमार चौगुले 
बुधवार, 28 डिसेंबर 2016

सध्याच्या युगात केवळ शेतीवर अवलंबून न राहता प्रक्रिया उद्योगाची वाट धरून अर्थकारणात भर घालणे गरजेचे झाले आहे. सुळे (जि. कोल्हापूर) येथील रेडेकर दांपत्याने गेल्या दहा वर्षांच्या अनुभवातून चिंचेची कॅंडी व जेलीनिर्मिती उद्योगात अोळख तयार केली आहे. त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना पंचक्रोशीत सातत्याने चांगली मागणी तयार झाली आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज व आजरा तालुक्‍याच्या सीमेवरच सुळे (ता. आजरा) हे सुमारे दोन हजार लोकसंख्येचे बहुतांशी जिरायती शेती असलेलं गाव आहे. येथील काशिनाथ रावजी रेडेकर यांची अडीच ते तीन एकर शेती आहे. पूर्वी ते आजरा जनता बॅंकेत नोकरीस होते. त्या वेळी पत्नी सौ. विजयमाला यांच्या सहकार्याने शेतीला पूरक असा प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा विचार आला. त्यांच्या मित्राची जेली उत्पादनाची एजन्सी होती. त्यातूनच चिंचेपासून जेली व कॅंडीचे उत्पादन करण्याचा विचार पुढे आला. महाबळेश्‍वर परिसरात हा व्यवसाय जास्त प्रमाणात केला जातो. तेथील पाहुण्यांकडे जाऊन विजयमाला यांनी पायाभूत माहिती घेतली. त्यानंतर आवश्यक रक्कम जमा करून व्यवसायास सुरुवात केली. बॉयलर, पल्पर, मिक्‍सर, ड्रायर आदी ‘मशिनरी’ खरेदी केली. 

स्थानिक चिंचेचा माल ठरला उपयोगी 
जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा परिसर चिंचेच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे चिंचेच्या बागा नसल्या तरी अनेक शेतकऱ्यांकडे बांधावर चिंचेची झाडे आहेत. शेतकरी हे उत्पादन व्यापाऱ्यांना विकतात. गडहिंग्लज परिसरातील महागाव व आजरा तालुक्‍यातील काही बाजारपेठांमध्ये म्हणूनच सतत चिंचा उपलब्ध असतात. रेडेकर कुटुंबीय महागाव परिसरातील व्यापाऱ्यांकडून तसेच गरजेनुसार शेतकऱ्यांकडून चिंचेची खरेदी करते. आठवडी बाजाराचा त्यासाठी उपयोग होतो. मार्च ते मेच्या दरम्यान उपलब्धता पाहून चिंचेची खरेदी होते. 

वर्षाला अडीच टन चिंचेवर प्रकिया 
चिंच एकाच वेळी विकत घेतल्यानंतर ती फोडून, निवडली जाते. चिंचोके बाजूला काढले जातात. वेगळा केलेला प्लॅस्टिकच्या हवाबंद पोत्यात भरुन ठेवला जाते. त्यानंतर लागेल तशी चिंच बाहेर काढली जाते. विकत घेतलेल्या चिंचेतून ४० टक्के गर तर ६० टक्के चिंचोके मिळतात. चिंचोके व्यापाऱ्यांना १० ते १४ रुपये प्रतिकिलो दराने विकले जातात. 

अशी बनते चिंच जेली 
जेली तयार करण्यासाठी चिंचेतील अर्क काढण्यात येतो. तो ‘फिल्टर’ करून यंत्राद्वारे शिजवला जातो. आटवून त्याचा रस काढला जातो. त्यात पेक्‍टीन पावडर, फळांची पावडर, साखर, सायट्रीक ॲसिड आदि साहित्य ठराविक प्रमाणात घातले जाते. ठराविक तापमानाला मिश्रण तयार होते. त्यानंतर ते ट्रेमध्ये ओतला जातो. तयार झालेली जेली सुकवून, काप करून फूड ग्रेड पेपरमध्ये पॅक केली जाते. एका जारमध्ये सरासरी ऐंशी तुकडे जेली बसते. 

चिंचेपासून कॅंडी 
कॅंडी बनवताना चिंच स्वच्छ करून पल्परचा वापर करून पेस्ट तयार केली जाते. त्यात गरजेनुसार साखर व अन्य घटक मिसळले जातात. साच्यात तयार झालेली कॅंडी प्लॅस्टिक आवरणात पॅक केली जाते. पॅकिंग करताना मनुष्यबळाचाच वापर केला जातो. 

कष्टाने उभे केले मार्केट 
सुळे परिसरातील भाग मार्केटच्या दृष्टीने फारसा जागृत नाही. दहा वर्षांपूर्वी ज्या वेळी रेडेकर दांपत्याने व्यवसाय सुरू केला त्या वेळी दुचाकीवरून आजरा, गडहिंग्लज परिसरातील प्रत्येक दुकानात जाऊन आपल्या उत्पादनांचे महत्त्व व गुणवत्ता या बाबी पटवून दिल्या. ग्राहक व्यापाऱ्यांना त्याबाबत खात्री पटू लागल्यानंतर मागणी वाढू लागली. आज गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरीपासून बेळगावपर्यंत 
तालुकानिहाय सहा विक्रेत्यांची नेमणूक केली आहे. दररोज सुमारे पन्नास किलोपर्यंत उत्पादनाची निर्मिती होते. मागणीनुसार त्यात बदल होतो. विजयमाला यांच्यासहित सहा महिला मजूर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत येथे राबतात. 

दर्जेदार मालाची हमी 
महाबळेश्‍वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी जेली, कँडीचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. परंतु आजऱ्यासारख्या उष्ण तापमानाच्या क्षेत्रातही ही उत्पादने तेवढ्याच तोडीची बनविण्यात रेडेकर कुटुंब यशस्वी झाले आहे. अनुभवानुसार प्रक्रिया पद्धतीत काही बदल करीत त्यांनी जेली, कँडीचा गोडवा वाढविला. शेंगदाणा चिक्कीचेही उत्पादन जोडीला मर्यादित स्वरूपात घेतले जाते. 

गुंतवणूक व अर्थशास्त्र 
या व्यवसायात वर्षाला सुमारे अडीच टन चिंच तर तीन टन साखर लागते. पाचशे किलो पॅकिंगचा कागद लागतो. तीस हजार प्लॅस्टिकचे जार लागतात. मजुरीचा खर्च दीड लाख रुपयांपर्यंत येतो. खर्च वजा जाता वर्षाला तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत नफा राहत असल्याचे रेडेकर यांनी सांगितले. १२० रुपये प्रतिकिलो दराने जेली, कँडी उत्पादने ‘ओम जेली कृषी उद्योग’ या नावाने विकली जातात. या उद्योगासाठी जागेव्यतिरिक्त शेड, छोट्या स्वरूपातील यंत्रे व अन्य कारणांसाठी सुरवातीला किमान १० लाख रुपयांचे किमान भांडवल असणे गरजेचे आहे. यंत्रांची व्याप्ती वाढवली, तर खर्च अजून वाढतो असे रेडेकर म्हणाले. 

आव्हाने झेलत टिकविला व्यवसाय 
सध्या पॅकिंगचे काम मनुष्यबळाद्वारे केले जाते. मागणी भरपूर आहे. मात्र पुरेसा कच्चा माल, मजूरबळ यांच्याअभावी तेवढा पुरवठा करता येत नसल्याची खंत रेडेकर यांनी व्यक्त केली. स्वयंचलित पॅकिंग यंत्र खरेदी करायचे असून आर्थिक तरतूद सुरू अाहे. सुरवातीची काही वर्षे हा व्यवसाय करताना त्रास झाला. अनेकदा अडचणी आल्या. पण जिद्दीने व्यवसाय सुरू ठेवला. दर्जा चांगला ठेवल्याने वर्षभर उत्पादन सुरू ठेवणे शक्य झाल्याचे काम सुरु असते असे त्यांनी सांगितले. 

काशिनाथ रेडेकर- ९५४५२४४५३० 
- राजकुमार चौगुले 

Web Title: tamarind jelly candy business