पन्नास हजार क्विंटल तूर पडून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

तीन दिवसांपासून तुरीचा सौदाच निघू शकला नाही. खरेदी केंद्र बंद व सौदा नाही यात शेतकरी मात्र भरडला जात आहे

लातूर - शासकीय खरेदी केंद्रावर तुरीची आवक घेण्यास आलेले प्रतिबंध व बाजार समितीने हमीभावानेच खरेदी करावी याचे बंधन घातल्याने गेल्या तीन दिवसांपासून येथील अडत बाजारात तुरीचा सौदा निघू शकला नाही. त्यामुळे पन्नास हजार क्विंटलपेक्षा जास्त तूर बाजारात पडून आहे. ऐन लग्नसराईत शेतकरी मात्र अडचणीत आले आहेत. अडत बाजारात सौदा कधी निघणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून शासनाच्या वतीने खरेदी केंद्र सुरू करून हमीभावाप्रमाणे शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात होती, पण दोन दिवसांपूर्वी केंद्रावर असलेली तुरीचे मोजमाप झाल्याशिवाय तुरीची आवक घेऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे या केंद्रावर तूर घेणे बंद करण्यात आले आहे. तर लातूर बाजार समितीने हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी केली तर कारवाईचा इशारा दिला आहे. 

या सर्व प्रकारात तीन दिवसांपासून तुरीचा सौदाच निघू शकला नाही. खरेदी केंद्र बंद व सौदा नाही यात शेतकरी मात्र भरडला जात आहे. पन्नास हजार क्विंटलपेक्षा जास्त तूर बाजारात पडून आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणलेली नाही. हंगामातील २५ टक्के तूर आणखी शेतकऱ्यांच्याच जवळ आहे. यात बाजारात हा प्रकार सुरू आहे. एप्रिल मे हे लग्नसराईचे दिवस आहेत. शेतमालाची विक्री करून शेतकरी आपल्या मुलामुलींचे लग्न लावत असतात. खरेदी केंद्र बंद व सौदा निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता सौदा कधी निघणार याकडे लक्ष लागले आहे.