मसूदच्या भाच्यासह 3 दहशतवादी ठार, 1 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

या वर्षामध्ये लख्वी आणि मसूद या दोन प्रमुख दहशतवाद्यांच्या निकटवर्तीयांना मारण्यात यश आले आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. दरम्यान, भारतीय सैन्याने तीन दहशतवाद्यांना ठार केले. यामध्ये जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर याचा भाचा ताल्हा रशीद हादेखील ठार झाला.

पुलवामा जिल्ह्यात भारतीय सुरक्षा फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये काल (सोमवार) रात्री चकमक सुरू झाली. यामध्ये तीन दहशतवाद्यांना मारण्यात आले असून, सकाळपर्यंत ही चकमक सुरूच होती. यामध्ये एक नागरिकही जखमी झाला आहे. 

जैश-ए-मोहंमदचे उच्चस्तरीय व्यक्तींवर हल्ला करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवाद्यांना घुसखोरी करून पाठवले होते. काही दहशतवादी पुलवामा जिल्ह्यातील अगलार परिसरातील कांदी पट्ट्यात आले असल्याची माहिती मिळताच सैन्याने या भागाला वेढा देऊन शोध मोहीम सुरू केली. या कारवाईमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांकडील अमेरिकन बनावटीची एम-16 बंदुक फौजांनी ताब्यात घेतली. मारण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी दोघेजण पाकिस्तानी नागरिक असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

या वर्षामध्ये लख्वी आणि मसूद या दोन प्रमुख दहशतवाद्यांच्या निकटवर्तीयांना मारण्यात आले आहे. यापूर्वी लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मुसैब याला काश्मीरमधील बंदीपूर भागात हाजिन येथे पोलिसांनी ठार केले होते. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकी-उर-रेहमान लख्वी याचा मुसैब हा पुतण्या होता. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :