आमच्या घरी ‘इकाे फ्रेन्डली बाप्पा’; 'सकाळ'च्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

योगेश फरपट
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

शहरातील राजकीय, वैद्यकीय, शैक्षणीक, सांस्कृतीक अशा विविध स्तरावरील मान्यवरांनी सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. 

अकाेला : पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या घरी इकाे फ्रेन्डली गणेश मूर्तीची स्थापना करण्याचे आवाहन ‘सकाळ’च्या वतीने करण्यात आले हाेते. या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी (ता.२५) शहरासह ग्रामिण भागात अनेकांनी शाडू मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सुद्धा आपल्या शासकीय निवासस्थानी इकाे फ्रेन्डली गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मोहिमेत सहभाग दर्शवत नागरिकांना शाडू मातीची गणपती मूर्ती घेण्याचे आवाहन केले. 

शहरातील राजकीय, वैद्यकीय, शैक्षणीक, सांस्कृतीक अशा विविध स्तरावरील मान्यवरांनी सुद्धा पर्यावरण रक्षणासाठी शाडू मातीपासून बनवलेल्या गणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला. 

जिल्हाधिकारी पर्यावरण रक्षणासाठी आग्रही
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुद्धा शाडू मातीपासून मूर्ती बनविणाची कार्यशाळा  जिल्हाधिकारी  आस्त‍िक कुमार पाण्डेय  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात  घेण्यात  आली. जिल्हाधिकारी यांनी  स्वत: शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. मूर्ती तयार करतांना  एकाग्र होवून जिल्हाधिकारी   हे  मूर्ती तयार करण्यात रमले व त्यांच्या हाताने  मातीतून सुबक गणेशाची प्रतिमा निर्माण झाली होती. देवाला मनोरंजनाचा विषय न करता  श्रध्दा, विश्वास व उपासनेचा विषय करावा. माझी मूर्ती मोठी  किंवा तुझी छोटी हा वादाचा विषय  न करता, श्रध्दाभाव ठेवून गणेश स्थापना करावी व गणेशोत्सवात शांतता व राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांण्डेय यांनी केले आहे.