भक्तांचा उत्साह शिगेला  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पिंपरी - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे अविभाज्य अंग बनलेल्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी शहरातील सर्व बाजारपेठा गणेशमय झाल्या. बारा दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी औद्योगिक नगरी सज्ज झाली. लाडक्‍या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसून आली. गणेशमूर्ती, मखरे, सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदीतील भक्तांचा उत्साह शिगेला पोचला होता. 

पिंपरी - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे अविभाज्य अंग बनलेल्या गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी शहरातील सर्व बाजारपेठा गणेशमय झाल्या. बारा दिवसांचा हा उत्सव साजरा करण्यासाठी औद्योगिक नगरी सज्ज झाली. लाडक्‍या गणरायाचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसून आली. गणेशमूर्ती, मखरे, सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदीतील भक्तांचा उत्साह शिगेला पोचला होता. 

गणेशोत्सवाला औद्योगिक सुटीची जोड मिळाल्याने यंदा बाजारपेठेने मोठी गर्दी अनुभवली. नोकरदारांनी सायंकाळनंतर खरेदीसाठी गर्दी केल्याने गर्दी केल्याने त्यात अधिकच भर पडली. गणराय वास्तव्यास येणार म्हटल्यावर त्याच्या स्वागताच्या तयारीत संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब रंगल्याचे चित्र घरोघरी पाहावयास मिळाले. आरतीच्या पुस्तकापासून, झांज, चिपळ्यांची शोधाशोध करणारे गणेशभक्त दिसून आले. महिला वर्गाची प्रसादासाठीच्या पदार्थांचे नियोजन करण्यासाठी धावपळ उडाली. ठेवणीतील टोप्या, लाईटिंगच्या माळा, कृत्रिम फुले, हार, कारंजे आदी साहित्यातून घरातील गणपतीही कसा आकर्षक पद्धतीने दिसेल यासाठी प्रयत्नशील होता. 

मागील दोन दिवसात झालेला मुसळधार पाऊस, आणि आज (गुरुवार) सकाळच्या पावसाच्या भुरभुरीमुळे भक्तांमध्ये काहीशी चिंता होती. मात्र, त्यानंतर पावसाने चांगलीच उघडीप दिल्‍याने वातावरण अल्हाददायक झाल्याने ग्राहकांचा खरेदीचा उत्साह दुणावला. 

अनेक भक्तांनी सायंकाळनंतर गणेशाला वाजतगाजत घरी आणले. रात्री उशिरापर्यंत गणेशाचे आगमन सुरू होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. अनेक तरुण मंडळांनी गुरुवारीच मूर्ती आणल्या. शुक्रवारच्या गणेश प्रतिष्ठापना, मिरवणुकीचे नियोजन, ढोलजाशांची व्यवस्था, पूजेसाठीचे पाहुणे, त्याची निमंत्रणाच्या पूर्ततेमध्ये कार्यकर्ते गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने बाजारपेठ परिसरात वाहतूक कोंडी झाली. मात्र, त्यावर मात करीत भक्तांनी खरेदी केली.

विद्यार्थ्यांनी केली गणेशाची प्रतिकृती
पिंपरीतील हिंदूस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) स्कूलच्या वतीने खास ‘सकाळ’च्या वाचकांसाठी गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाचशे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गणेशाची मानवी प्रतिकृती तयार करण्यात आली. शाळेचे कलाशिक्षक रमेश गाढवे यांनी मोठ्या कल्पकतेने त्याचे नियोजन केले. मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांचे त्यासाठी मार्गदर्शन लाभले. उपमुख्यध्यापक सुनील शिवले, पर्यवेक्षिका वर्षा भोपाळे, वंदना गांगुर्डे, शिवराम हाके यांचे त्यासाठी सहकार्य लाभले.