बाप्पांचे दर्शनही यंदा "ऑनलाइन' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

पुणे - अतिस्वस्त दरात मिळालेले "इंटरनेट डेटा प्लॅन' आणि प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन यामुळे यंदाचा गणेशोत्सव खऱ्याअर्थाने "ऑनलाइन' येणार आहे. "फेसबूक लाइव्ह' या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रक्षेपणाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे अनेक मंडळांनी नियोजन केले आहे. त्यामुळे घरबसल्या मानाच्या तसेच अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपतीचे दर्शन नागरिकांना मोबाईलवरच घेता येणार आहे. 

पुणे - अतिस्वस्त दरात मिळालेले "इंटरनेट डेटा प्लॅन' आणि प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोन यामुळे यंदाचा गणेशोत्सव खऱ्याअर्थाने "ऑनलाइन' येणार आहे. "फेसबूक लाइव्ह' या सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ प्रक्षेपणाच्या सुविधेचा लाभ घेण्याचे अनेक मंडळांनी नियोजन केले आहे. त्यामुळे घरबसल्या मानाच्या तसेच अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपतीचे दर्शन नागरिकांना मोबाईलवरच घेता येणार आहे. 

अनेक मोबाईल कंपन्यांनी "इंटरनेट डेटा प्लॅन'च्या दरात कपात केली आहे. तसेच, त्याच दरामध्ये ग्राहकांना वापरायला मिळणाऱ्या "डेटा'च्या प्रमाणातही वाढ केली. यात वेगवेगळ्या कंपन्यांमधील "दर युद्धा'चा फायदा सामान्य नागरिकांना झाला आहे. या घडामोडींनंतरचा पहिलाच गणेशोत्सव आता काही तासांवर आला आहे. त्यामुळे मंडळातर्फे मंडपामध्ये करण्यात येणाऱ्या सजावटीकडे जेवढे लक्ष दिले जात आहे, तेवढेच मोबाईलवरून व्हिडिओ चित्रीकरण व प्रक्षेपणाचेही नियोजन करण्यात येत आहे. 

मानाचा पहिला असलेल्या कसबा गणपतीसह दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई, शनिपार मंडळ, राजाराम मंडळ आदींचे फेसबूक पेज तयार करण्यात आले आहे. गणपती आरतीचे व्हिडिओ या पेजवर अपलोड करण्यात येत असते. त्यामुळे अनेक भाविकांना गणपतीचे दर्शन घरबसल्या घेता येते. अशाप्रकारे सोशल मीडियाद्वारे भाविकांची सोय करण्याच्या उद्देशाने आणखी अनेक मंडळांतर्फे नियोजन सुरू आहे. 

गणेशोत्सवातील गर्दी शिस्तबद्ध असते. अनेकांना प्रत्यक्ष बाप्पाचे दर्शन घेण्याची इच्छा असते. मात्र, वृद्ध व दिव्यांग व्यक्तींसाठी तसेच अन्य काही कारणांमुळे दर्शनासाठी येऊ न शकणाऱ्या भाविकांना मोबाईलद्वारे दर्शन घेण्याची सोय चांगली आहे. त्यासाठी संकेतस्थळ व फेसबूक पेज तयार केले आहे. 
- श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 

जे भाविक प्रत्यक्ष दर्शनासाठी येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी संकेतस्थळ आणि फेसबूक पेज तयार केले आहे. या व्यतिरिक्त आमचे मोबाईल ऍपसुद्धा उपलब्ध असून, त्याद्वारे नागरिक 24 तास बाप्पांचे दर्शन घेऊ शकतात. 
- महेश सूर्यवंशी, कोशाध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट 

मंडळांचे देखावे आणि विशेषतः अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीमध्ये केलेली रोषणाई व सजावट पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि केळकर रस्ता परिसरात खूप फिरावे लागते. तसेच, मिरवणुकीमध्ये दोन मंडळांमध्ये अंतर पडल्यास ताटकळत उभे राहावे लागते. अशी मंडळे मोबाईलवर लाइव्ह पाहायला मिळाल्यास वेळ वाचेल आणि थकवाही येणार नाही. 
- रजनी कदम, कोथरूड 

गणेश मंडळांनी केलेली सजावट, देखावे, गणपतीची मूर्ती प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद वेगळाच असतो, पण मोबाईलवर "लाइव्ह' प्रक्षेपणाची सोय झाल्यामुळे 10 ते 20 टक्के गर्दी कमी होईल असे वाटते. रात्री उशिरा होणारी गर्दी टाळून "बाप्पा'चे दर्शन घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांची या तंत्रज्ञानामुळे चांगली सोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या दृष्टीनेही त्याचा फायदा होईल, असे वाटते. तसेच गर्दी कमी झाल्यास पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण थोडाफार हलका होईल. 
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा