गणेशोत्सवात वाहतुकीत बदल 

गणेशोत्सवात वाहतुकीत बदल 

पुणे - यंदाच्या गणेशोत्सवात शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक शाखेकडून नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत चार टप्प्यांत आवश्‍यकतेनुसार बदल करण्यात येणार असून, या बदलांबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येणार आहे. 

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात चार हजार 623 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता आणि टिळक रस्ता या चार प्रमुख मार्गांवर 612 गणेश मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. तसेच, गणेश मंडळांकडून रोषणाई आणि देखावे तयार केले जातात. बाप्पांच्या दर्शनासोबतच देखावे पाहण्यासाठी नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे वाहतूक सुरळीत राखण्यासाठी आजपासून येत्या सहा सप्टेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. 25 ऑगस्ट, 26 ते 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर तसेच 

5 ते 6 सप्टेंबर अशा चार टप्प्यांत हा बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली. या पत्रकार  परिषदेस सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, महादेव गायकवाड, देविदास पाटील आणि जयश्री गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. 

अथर्वशीर्ष पठणानिमित्त वाहतुकीत बदल 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळासमोर शनिवारी (ता. 26) पहाटे पाच वाजता अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात हजारो महिला भाविक सहभागी होतात. त्या वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्या दिवशी पहाटे पाचपासून शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. शिवाजी रस्त्यावर जिजामाता चौक ते रामेश्‍वर मंदिर चौकापर्यंत सर्व वाहनांना बंदी राहील. 

पर्यायी मार्ग - गाडगीळ पुतळा, जिजामाता चौकातून डावीकडे वळून गणेश रस्त्याने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेबाबा चौक, गोटीराम भय्या चौक तेथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाता येईल. 

- अप्पा बळवंत चौकातून डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने फुटका बुरूजमार्गे गाडगीळ पुतळा चौक. तसेच, लक्ष्मी रस्त्यावर विजय मारुती चौकातून आवश्‍यकतेनुसार वाहतूक वळविण्यात येईल. 

- महापालिकेच्या एलईडी स्क्रीनवर वाहतूक नियम आणि वाहतुकीच्या बदलांबाबत माहिती 
- गणेश मंडळांच्या परिसरात साडेपाचशे फ्लेक्‍सद्वारे जनजागृती 
- पार्किंगची ठिकाणे, बॅरिकेड्‌सचा वापर 
- 225 स्वयंसेवकांची मदत 
- अनंत चतुदर्शीच्या दिवशी रिंगरोड योजना 


वाहतुकीत करण्यात येणारा बदल 
गणेशमूर्ती प्रतिष्ठापना आणि खरेदीसाठी सारसबाग, कुंभारवेस, डेंगळे पूल, शनिवारवाडा परिसरात गर्दी होते. त्यामुळे या परिसरात शुक्रवारी वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात येणार आहे. 

पार्किंग व्यवस्था- 
मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा कॅनॉल पुलापर्यंत 
जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस 
नीलायम पूल ते सिंहगड रस्ता जंक्‍शन 
कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान रस्त्यावरील न्यायालयाच्या बाजूस 
टिळक पूल ते भिडे पुलादरम्यान नदीपात्रातील रस्त्यावर 
मंडई येथील मिनर्व्हा आणि आर्यन पार्किंग तळ 
पोलिस चौकी ते राष्ट्रभूषण चौकादरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूस 

बंद रस्त्यांना पर्यायी मार्ग 
- शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने डेक्कन, टिळक रस्तामार्गे जावे. 
- झाशीची राणी चौकातून कॉंग्रेस भवनसमोरून स्वारगेटकडे जाता येईल. 
- पुणे स्टेशनकडून महापालिका भवन परिसरात येणाऱ्या वाहनांनी शाहीर अमर शेख चौकातून कुंभारवेस चौकाकडे न जाता, आरटीओ चौक, सीओईपी उड्डाण पुलावरून जंगली महाराज रस्ता मार्गे जावे. 
- पुणे स्टेशन परिसरातून फरासखाना, बेलबाग चौक, अप्पा बळवंत चौक परिसरात येण्यासाठी वाहनचालकांनी कुंभारवेस चौकातून डावीकडे वळून पवळे चौकमार्गे गणेश रस्त्यावर यावे. 

एकेरी वाहतूक (जड वाहनांना बंदी) 
फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज 
अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक 
सोन्या मारुती चौक ते बेलबाग चौक ते सेवासदन चौक 
मंगला टॉकिजसमोरील प्रिमिअर गॅरेज लेनमधून शिवाजी रस्ता ते खुडे चौक 

पीएमपीएमएल बसचे मार्ग 
- शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस शिवाजी पुलावरून जाण्याऐवजी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता-टिळक रस्ता मार्गे जातील. 
- महापालिका भवन येथून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस झाशीची राणी चौकमार्गे जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्याने जातील. 
- महापालिका भवन येथून पुणे स्टेशनला जाणाऱ्या बस कामगार पुतळामार्गे न जाता, संचेती हॉस्पिटल भुयारी मार्ग, आरटीओमार्गे जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com