आवडत्या फुलांना सोन्याचा भाव

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

ठाणे - पावसामुळे गणेशोत्सवासाठी तयार होणाऱ्या फुलांना मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या बाजारात येणाऱ्या फुलांची आवक घटल्याने फुलांचे भाव वाढले आहेत. ऐन गणेशोत्सवात फुलांचे भाव वाढल्याने नागरिकांना प्रत्येक फुलासाठी दहा ते वीस रुपये अधिक मोजावे लागत आहेत. जास्वंदीच्या फुलांची आवक फार कमी असून जास्वंदीच्या एका फुलासाठी नागरिकांना ५० रुपये मोजावे लागत आहेत.

गणेशोत्सवाच्या सजावटीपासून पूजेपर्यंत सर्व ठिकाणी फुलांची मोठी आवश्‍यकता असल्याने ग्राहकांनी गुरुवारी सकाळीच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूलबाजारात गर्दी केली होती. पावसाचा परिणाम मालावर झाला असून फुले भिजल्याने ही फुले लवकर खराब होत आहेत; त्यामुळे फुलांचे दर तेजीत असल्याचे फूलबाजार मार्केट व्यापारी मंडळाचे अध्यक्ष बजरंग हुळवले यांनी सांगितले. गोंड्याच्या फुलांची आवक जास्त असून ५० ते ७० रुपये किलो गोंड्याचा भाव आहे. 

मोगरा २०० रुपये किलो, गुलाब पाच ते दहा रुपये प्रति नग, जास्वंद ५० ते १०० रुपये पुडी या दराने विक्री केली जात आहे; तर किरकोळ बाजारात जास्वंदाचे एक फूल  ५० रुपयांना मिळत आहे. झेंडू ४०० आणि शेवंतीही ४०० रुपये किलोने विकली जात आहे. पावसामुळे माल खराब होत असून बाजारात माल कमी असल्याने फुलांचे दर दुपटीने वाढले असल्याचे किरकोळ विक्रेते अर्जुन नखाते यांनी सांगितले.

पावसाच्या तडाख्यामुळे उत्पादन घटले
वसई आणि विरार तालुक्‍यातून जास्वंदीची फुले मुंबई, ठाणे आणि कल्याण परिसरात विक्रीसाठी येतात. जास्वंदीच्या फुलांची आयुर्मर्यादा ही एकच दिवस असते. पावसाच्या तडाख्यामुळे फुले झाडावरच कुजत असल्याने फुलांचे उत्पादन घटले आहे. जास्वंद सगळ्यात महाग फूल ठरले असून बाप्पाच्या आवडत्या फुलासाठी गणेशभक्तांना ५० रुपये मोजावे लागत आहेत.