नथुरामच्या भूमिकेने माझे आयुष्यच बदलले - शरद पोंक्षे

नथुरामच्या भूमिकेने माझे आयुष्यच बदलले - शरद पोंक्षे

रत्नागिरी - बॅरिस्टरमधील शांतू ते नथुराम अशा भूमिकांचा मोठा पट माझ्यामागे आहे. मात्र नथुरामसाठी मी दहा मिनीटांत तयारी केली. दिग्दर्शक विनय आपटे मला म्हणाले, तू चांगले वाचतोस. वाचत होतो पोलिसांच्या भूमिकेसाठी, पण आपटे यांनी नथुराम वाचून दाखवायला सांगितला. तो वाचल्यावर त्यांनी माझी भूमिका मनात पक्की केली आणि या नथुरामने आयुष्यच बदलले, असे मत शरद पाेंक्षे यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय आणि चतुरंगतर्फे स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित मुक्तसंध्या मुलाखतीत ते बोलत होते. सहअभिनेते विवेक जोशी यांनी त्यांना बोलते केले. शरद पोंक्षे यांनी मुखवट्यामागचे मन मोकळे केले. या वेळी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या जागेचा पालिकेने 99 वर्षांचा करार करून दिल्याबद्दल नगराध्यक्ष राहुल पंडित आणि आमदार उदय सामंत यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केला. चतुरंगचे विद्याधर निमकर उपस्थित होते.

पोंक्षे म्हणाले, "नथुराम'चे नाटक जीर्ण झालेले पाहायचे नाही. 1998 पासून आजवर याचे 1000 प्रयोग यशस्वी झाले. अनेकदा संघर्ष झाला तरी एकही प्रयोग रद्द केला नाही. कणकवली, चंद्रपूर येथील प्रयोगात प्रचंड अडथळे आणूनही नाटक पूर्ण केले. आजही प्रयोग हाऊसफुल्ल होत असतानाच थांबलेले बरे. 11 मार्चला "मी नथुराम गोडसे बोलतोय'चा शेवटचा प्रयोग होणार आहे. मी लहानपणासून असाच आक्रमक आहे, कोणाचे ऐकत नाही, जे योग्य आहे तेच करतो, असेही ते म्हणाले.

पोंक्षे म्हणाले की, मुलुंडला कालिदास नाट्यगृहात 11 मार्चला शेवटचा प्रयोग आहे. त्यानंतर शिवसेनेतर्फे महोत्सवी प्रयोग होईल. "नथुराम' नाटक ज्यांना करायचे आहे ते करू शकतात. त्यांना योग्य मार्गदर्शनही करू, पण संहितेला धक्का लागता कामा नये. गेल्या वीस वर्षांचा दर्जा सांभाळूनच नाटक केले पाहिजे. "नथुराम' हे माझे 15 वे नाटक. 14 नाटकांत अगदी साध्या भूमिका केल्या. बॅरिस्टर नाटकामध्ये शांतू न्हाव्याच्या भूमिकेत हं म्हणण्याची सुद्धा मुभा नव्हती. प्रयोगमागे 60 रुपये मिळायचे. 125 रुपयांपर्यंत मजल मारली.

एका नाटकाच्या रंगीत तालमीत माझी साधी भूमिका असताना फोटोग्राफरने नुसताच फ्लॅश मारला व फोटो दिला नाही. मला तो अपमान वाटला. याच फोटोग्राफरला माझे बरेच फोटो काढावे लागतील असे मनात ठरवले आणि "नथुराम' वेळी माझेच सर्व फोटो त्या फोटोग्राफरला काढावे लागल्याचा किस्सा पोंक्षे यांनी सांगितला.

बेस्टने रंगभूमीला अनेक कलाकार दिले. प्र. ल. मयेकरांच्या "एका काळोखाच्या सावल्या' या प्रयोगानंतर मला प्रेक्षकांनी गराडा घातला. त्यानंतर प्रलंनी मला हा तुझा शेवटचा गराडा आहे, तुझ्याकडे कला नाही, असे सांगितले होते. मी त्यांना व्यावसायिक नाटकात असा गराडा दाखवेन, असे प्रत्युत्तर दिले. 2005 मध्ये रत्नागिरीतील "नथुराम'च्या प्रयोगात प्रलं मला पडलेला गराडा कौतुकाने पाहत होते. ते पाऊण तासाने मला भेटले.

विजया वाड लिखीत "तिची कहाणी'मधील दादूमियॉंची भूमिका मी मागून घेतली. कोकणी मुसलमानांची भाषा शिकण्यासाठी काकांच्या मित्रांच्या पत्नीकडून माहिती मिळवली. दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत दादूमियॉंची संहिता त्या भाषेत लिहून काढल्या. विक्रम गोखले, यशवंत दत्त, प्रभाकर पणशीकर, रिमा लागू अशा दिग्गज कलाकारांकडून बरेच काही शिकलो. रंगमंचावर संवाद विसरल्यानंतरही प्रेक्षकांना कोणतीही कल्पना न येता बेमालूमपणे कसे सांभाळून घ्यायचे, हे विक्रम गोखले यांच्याकडून शिकलो. पणशीकर कोणालाही बोलताना दुखवायचे नाहीत. त्यांची शिस्तही मी शिकलो.

सडेतोड व लेखकाच्या संवादात योग्य बदल करण्याचा अट्टहास यामुळे अनेकदा दिग्दर्शकांशी पटले नाही. असाच एक अनुभव "वादळवाट' मालिकेत आला. दुर्दैवाने माझ्या पात्राचा खून करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी मालिकेचा टीआरपी खाली आला. परिणामी मला जीवंत करावे लागले, असा किस्साही पोंक्षे यांनी खुमासदाररित्या मांडला.

बाळ कोल्हटकर हे आवडते लेखक. आंबव येथील आमच्या घरी सूर्यनारायणाच्या उत्सवात ते दरवर्षी यायचे. त्यामुळे पहिल्यापासून ओळख होतीच. वाहतो ही दुर्वांची जुडी, लहानपण देगा देवा या नाटकांत काम केल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com