"हिंदी' प्लॉटला ऍक्‍शनचा तडका (नवा चित्रपट - फास्ट अँड फ्युरिअस 8) 

महेश बर्दापूरकर 
शनिवार, 15 एप्रिल 2017

दिग्दर्शक : एफ ग्रे ग्रे 
कलाकार : विन डिझेल, द रॉक, मिशेल रॉड्रिग्ज, जेसन स्टॅटहॅम आदी. 

श्रेणी : 3.5

"फास्ट ऍण्ड फ्युरिअस' ही चित्रपट मालिका आणि त्यातील ऍक्‍शननं प्रेक्षकांना वेड लावलं असून, या मालिकेतील आठवा भागही सर्व अपेक्षा पूर्ण करणारा आहे. नायकानं मोडकी कार पळवत जिंकलेली रेस, रशियाच्या मंत्र्याला जेरबंद करण्यासाठी झालेल्या पाठलागात गगनचुंबी इमारतींच्या वरच्या मजल्यांवरून रस्त्यावर कोसळणाऱ्या कार व शेवटी थेट आण्विक पाणबुडीबरोबरचा नायक व त्याच्या टीमचा सामना असा हा उत्तरोत्तर रंगत जाणारा ऍक्‍शन धमाका प्रेक्षकांना खूष करतो. मालिकेतील चित्रपटांचं कथासूत्र आता हरवत चाललं असलं, तरी काळानुरूप ऍक्‍शन अधिक धडाकेबाज होताना दिसते आहे. 

"फास्ट ऍण्ड फ्युरिअस'च्या या भागात डॉम (विन डिझेल) शांत आयुष्य (नेहमीप्रमाणं) जगत असतानाच सायबर अतिरेकी सायफर त्याला येऊन भेटते. रशियाचे एक अण्वस्त्र चोरण्याची जबाबदारी ती डॉमवर सोपवते. आपल्या टीमच्या विरोधात जात डॉम ही जबाबदारी स्वीकारतो. त्याच्या टीमला हा मोठा धक्का असतो. मात्र, सायफरनं डॉमची पूर्वीची प्रेयसी व मुलाला ओलीस ठेवल्यानं त्यानं ही जोखीम पत्करल्याचं त्यांच्या लक्षात येतं आणि ते डॉमच्या मदतीसाठी निघतात. ल्यूक हॉब्ज (द रॉक) या टीमचं नेतृत्व करीत सायफरच्या योजनांना काटशह देऊ लागतो. डॉम त्याचा पूर्वीचा शत्रू डेकार्डला (जेसन स्टॅटहॅम) आपल्या बाजूला वळवण्यात यशस्वी ठरतो व त्याला आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पाठवतो. मुलगा सुरक्षित असल्याचा निरोप मिळताच डॉम सायफरविरुद्ध युद्ध पुकारतो व आपल्या टीमच्या मदतीनं आण्विक पाणबुडीला रोखत सायफरला जेरबंद करतो. 

चित्रपटाच्या कथेचा जीव छोटा आहे आणि प्लॉट ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटांप्रमाणंच आहे! ओलीस ठेवलेल्या मुलासाठी खलनायकाच्या तालावर नाचणारा आणि संधी मिळताच त्याचा खातमा करणारा नायक, हे कथासूत्र भारतीयांच्या चांगलंच परिचयाचं आहे. मात्र, त्याला दिलेल्या थरारक प्रसंगांची जोड हेच चित्रपटाचं वैशिष्ट्य. भौतिकशास्त्र आणि गुरुत्वाकर्षणाचे सर्व नियम (पुन्हा एकदा) धाब्यावर बसवून उडणाऱ्या कार पाहणं, हेच चित्रपटाचं प्रमुख आकर्षण. या वेळी इमारतींच्या वरच्या मजल्यांवर रस्त्यावर कोसळणाऱ्या कारचा थरार हे वेगळेपण आहे आणि हा प्रसंग श्‍वास रोखून ठेवतो. क्षेपणास्त्र, ड्रोन, हेलिकॉप्टरमधून कारवर झालेले हल्ले याधीच्या भागांत प्रेक्षकांनी पाहिले आहेत, या भागात थेट आण्विक पाणबुडीच कारवर हल्ला करताना दाखविली आहे. हे सगळं मोठ्या पडद्यावर अनुभवणं हाच "पैसा वसूल' अनुभव ठरतो. 

या भागात विन डिझेल आणि द रॉकचे एकत्र प्रसंग खूपच कमी असल्यानं थोडी निराशा होते. एफ ग्रे ग्रे या चित्रपट मालिकेच्या नवा दिग्दर्शकानं केवळ ऍक्‍शनवरच लक्ष केंद्रित केल्यानं सातव्या भागाप्रमाणं हळव्या दृश्‍यांची कमतरता जाणवते. डॉम आपल्या मुलाचं नाव "ब्रायन' ठेवत पॉल वॉकरची आठवण ताजी करतो, हा प्रसंग ही उणीव भरून काढतो. 

 

Web Title: Fate of The Furious Movie Review 8

व्हिडीओ गॅलरी