नवा चित्रपट : 'एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी'

महेश बर्दापूरकर
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कप्तान व सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा जीवनपट मांडतो. क्रिकेट आणि धोनीच्या चाहत्यांसाठी या चित्रपटामध्ये अनेक साजऱ्या करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याचा प्रत्यय पहिल्या प्रसंगापासूनच येत राहतो. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी मोठे कष्ट घेऊन हा पट उभा केला आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीच्या भूमिकेत कमाल केली आहे. ‘भाग मिल्खा भाग‘ किंवा ‘मेरी कोम‘सारख्या बायोपिक्‍सइतकाच हा चित्रपट उजवा आहे.

‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कप्तान व सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा जीवनपट मांडतो. क्रिकेट आणि धोनीच्या चाहत्यांसाठी या चित्रपटामध्ये अनेक साजऱ्या करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि त्याचा प्रत्यय पहिल्या प्रसंगापासूनच येत राहतो. दिग्दर्शक नीरज पांडे यांनी मोठे कष्ट घेऊन हा पट उभा केला आहे. सुशांतसिंह राजपूतनं धोनीच्या भूमिकेत कमाल केली आहे. ‘भाग मिल्खा भाग‘ किंवा ‘मेरी कोम‘सारख्या बायोपिक्‍सइतकाच हा चित्रपट उजवा आहे. धोनीच्या आयुष्यातील काही अज्ञात प्रसंग, धडाकेबाज निर्णय घेण्याची त्याची वृत्ती, थंड डोक्‍यानं प्रसंगांना सामोरं जाण्याची कला या गोष्टी छान पोचतात. मात्र, तीन तासांपेक्षा अधिक लांबी, धोनीच्या क्रिकेटमधील अनेक महत्त्वाच्या घटनांना दिलेली बगल व याच काळातील इतर खेळाडूंचा त्याच्या यशातील अगदी तोकडा उल्लेख या गोष्टी खटकतात. 

‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ या चित्रपटाची सुरवात 2011 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या क्रिकेट विश्‍वकरंडकातील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या प्रसंगापासून होते. अनपेक्षित व धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता व ते निभावून नेण्याचे कौशल्य असलेल्या या खेळाडूच्या बालपणात कथा प्रवेश करते. रांचीसारख्या छोट्या शहरातील छोट्या महेंद्रसिंह धोनीचे वडील (अनुपम खेर) किरकोळ नोकरी करीत असतात. केवळ फुटबॉलमध्ये गोलकीपिंग करण्यात रस असलेल्या या मुलाला त्याचे शिक्षक (राजेश शर्मा) यष्टिरक्षण करायला सांगतात. धुवाधार फलंदाजीत रस असलेला महेंद्रसिंह (सुशांतसिंग राजपूत) हळूहळू जम बसवतो, गावातील नामवंत खेळाडू होतो. रेल्वेमध्ये टीसीची नोकरी करून पैसा कमावू लागतो. मात्र, यातून आपली प्रगती शक्‍य नाही हे त्याच्या लक्षात येतं. तो घरच्यांच्या विरोधात जात पूर्णवेळ क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतो आणि त्याचं आयुष्य बदलून जातं. भारतीय संघात झालेली निवड, त्याच्या नेतृत्वाखाली पटकावलेला टी-20 विश्‍वकरंडक, भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान व यावर कळस म्हणजे 2011 चा त्याच्या नेतृत्वाखाली पटकावला गेलेला विश्‍वकरंडक... हा प्रवास दिग्दर्शक विस्तारानं मांडतो. त्याचं पहिलं अयशस्वी प्रेम व साक्षीबरोबरचं प्रेम आणि विवाह ही उपकथानकंही कथेच्या ओघात येतात. विश्‍वकरंडकातील धोनीनं ठोकलेला प्रसिद्ध षटकार दाखवत सिनेमाचा शेवट होतो. 

ही ‘अनटोल्ड स्टोरी‘ दाखवताना धोनीच्या भारतीयांना माहिती असलेल्या अनेक गुणांकडं दिग्दर्शकाचं दुर्लक्ष झालेलं दिसतं. महत्त्वाच्या क्षणी थंड डोक्‍यानं त्यानं जिंकलेले अनेक सामने, यष्टिरक्षणातील कमाल, मैदानात व ड्रेसिंग रूममध्ये सहकाऱ्यांचं उंचावलेलं मनोधैर्य या गोष्टी कथेत दिसत नाहीत. सहकारी खेळाडूंचा धोनीच्या यशात असलेल्या वाट्याचाही उल्लेख दिसत नाही. युवराजसिंग सोडल्यास एकाही भारतीय खेळाडूला कथेत स्थान नाही. त्यामुळं धोनीचा वैयक्तिक संघर्ष समोर येताना हे महत्त्वाचे दुवे बाजूला पडतात व त्यामुळं कथा वरवरची ठरते. तरीही, धोनीच्या चाहत्यांना हवं ते सर्व चित्रपटात आहे व ते त्याचा पुरेपूर आनंद लुटतात. 

सुशांतसिंह राजपूतनं धोनी अगदी परफेक्‍ट उभा केला आहे. धोनीची खेळण्याची, चालण्याची, बोलण्याची, हसण्याची प्रत्येक लकब त्यांनी मस्त पकडली आहे. गंभीर, विनोदी व प्रेमाच्या प्रसंगांमध्येही त्याचा अभिनय छान झाला आहे. धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट‘सारखे फटके पडद्यावर दाखवण्यासाठी त्यानं घेतलेले कष्टही दाद देण्याजोगे. अनुपम खेर, राजेश शर्मा, भूमिका चावला यांनीही छान काम केलं आहे. धोनीच्या प्रेयसी आणि पत्नीच्या भूमिकेत दिशा पटाणी आणि किरारा अडवानी परफेक्‍ट. संगीत, छायाचित्रण या आघाड्यांवरही चित्रपट जमला आहे. एकंदरीतच धोनीच्या व क्रिकेटच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट पर्वणीच आहे. 

निर्मिती : अरुण पांडे 

दिग्दर्शक : नीरज पांडे 

भूमिका : सुशांतसिंह राजपूत, अनुपम खेर, राजेश शर्मा, भूमिका चावला, दिशा पटाणी, किरारा अडवानी आदी. 

श्रेणी : 3.5