फॉरेव्हर बाँड!

रविवार, 28 मे 2017

‘माय नेम इज बाँड...जेम्स बाँड’ हा डायलॉग कानात प्राण आणून ऐकला जायचा... ही खास, लकबशीर संवादफेक करणारे होते अर्थातच रॉजर मूर. जेम्स बाँडची भूमिका अनेक दिग्गज अभिनेत्यांनी साकारली...पण सत्तरीच्या दशकात एकच समीकरण बाँडपटरसिकांच्या मनात कायमचं ठसलं होतं व ते म्हणजे ‘जेम्स बाँड म्हणजे रॉजर मूर आणि रॉजर मूर म्हणजे जेम्स बाँड’. असा हा रुबाबदार, शैलीदार बाँड अर्थात रॉजर मूर अलीकडंच (२३ मे) काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्याविषयी...

तो  सत्तरीच्या दशकातला काळ होता. टीव्ही नुकताच येऊन खरखरू लागला होता. त्याला अद्याप रंगदेखील मिळालेले नव्हते. अभ्यासाच्या पुस्तकात बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक अशा महानुभावांचं साहित्य दडवून त्याचा रात्र रात्र अभ्यास करण्याचं ते वय होतं.

बाबूरावांचा ‘काळापहाड’ तसा सोईचा होता. पुस्तकात, गादीखाली निमूटपणे पडून राहणं त्याला जमायचं. ते बुटातून निघणारे चाकू, डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच हवेत त्यानं घेतलेली गिरकी आणि मागच्या मागं कोसळणारे खलनायकाचे पित्ते.

काळापहाड, झुंजार वगैरे मंडळींचे कारनामे रात्र रात्र चालत. त्यांना बेमालूम छपवणारं भौतिकशास्त्र किंवा अन्य कुठलंही शास्त्र त्यांच्या आड यायचं नाही. 

बाबूराव अर्नाळकर किंवा गुरुनाथ नाईक यांची पुस्तकं फडताळापेक्षा गादीखाली जास्त काळ राहिली असावीत. मराठी गुप्तचरांची ही दिलेरी रात्र रात्र जागवत असण्याच्या काळात फिरंगी जेम्स बाँडसुद्धा हाती लागला. हाती लागता लागताच पडद्यावर भेटलासुद्धा. वास्तविक ग्लॅमर लाभलेला गुप्तहेर ही कल्पनाच हास्यास्पद. गुप्तहेर आणि तोही सुप्रसिद्ध? नुसताच सुप्रसिद्ध नव्हे, तर जगप्रसिद्ध. त्याच्या बदफैलीपणालाही कौतुकाची झालर आहे. निळेशार डोळे. फॅशनेबल सूट. एका हातात ‘वाल्थर पीपीके’ मेकचं पिस्तूल, दुसऱ्या हातात कमनीय बांध्याची एखादी लावण्यखनी. माय नेम इज बाँड...जेम्स बाँड. हा त्याचा डायलॉग ऐकताना भान हरपायचं.

ब्रिटिश गुप्तचर संस्थेचा ‘एजंट ००७’ याने की जेम्स बाँड याला दुनिया की कोई भी ताकद रोखू शकत नव्हती आणि नाही. तो दिलेर आणि तितकाच रंगेल आहे. बाईबाजी आणि बाटलीबाजी यात तो माहीर आहे. अंतराळयानापासून ऑटो रिक्षापर्यंत त्याला कुठलंही वाहन आरामात चालवता येतं. त्याचे खलनायकसुद्धा कुठले गॅंगस्टरछाप गुंड नाहीत. मांजर किंवा कुत्रा कुरवाळत जग जिंकण्याचा इरादा बाळगणारे ते शक्‍तिमान लोक आहेत. अनेक देशांना वेठीला धरणारे हे खलनायक बाँडपुढं मात्र फिके ठरतात. त्यांचा खात्मा करतानासुद्धा बाँड हाती लागलेल्या ३० सेकंदांतले १२ सेकंद चुंबनात घालवतोच.

त्याचा चेहरा आणि मोहरा थेट रॉजर मूरसारखा आहे. सर रॉजर मूर.
* * *

टॅडा टॅडा ऽऽऽ...एक लाल रंगाचा प्रकाशगोल शोधक नजरेनं हिंडतो. दमदार पावलं टाकत एक कोटवाली मानवी आकृती त्या झोतात येते. झटकन गुडघ्यावर बसून तुमच्यावर गोळी झाडते...ढिचक्‍यांव.

खलास. तुम्ही खुर्चीतल्या खुर्चीत खलास. नो चान्स. तालबद्ध म्युझिक सुरूच राहतं. 
एक चित्र-विचित्र कॅमेऱ्याच्या ट्रिकांमधून आलेलं गाणं. त्यात एक तरी बाई असणं मस्ट. पिस्तूलं. बुलेट्‌स. इकडून तिकडं सूर मारणाऱ्या कमनीय कन्यकांच्या आकृत्या. पडद्यावर उमटणारी ‘आल्बर्ट आर ब्रोकोली प्रेझेंट्‌स’ या नावापासून सुरू झालेली दिलखेचक नामावळ. सगळं काही स्वप्न आणि वास्तवाच्या सरहद्दीवरचं.

कुठल्याही बाँडपटाची स्टोरीलाईन जवळपास एकच असते. फरक असतो तपशिलाचा.  
एक जबरदस्त खलनायक अमेरिका आणि ब्रिटिश साम्राज्याचा घास घेण्यासाठी टपलेला आहे. तो कुणीही पाहिलेला नाही; पण तो महाप्रबळ आहे. स्ट्रोम्बर्ग, मि. बिग, स्कारामांगा, ब्लोफेल्ड अशी त्याची नावं आहेत.  

मि. एम हे सद्‌गृहस्थ ब्रिटिश गुप्तचर संस्था, एमआय-५ चे प्रमुख आहेत. ते सुटीवरून येणाऱ्या बाँडला जोखमीची कामगिरी सोपवतात. या अमक्‍या ढमक्‍या खलनायकाला वठणीवर आणणं. बाँडला हे आधीच माहीत असतं. तो नुसता मुस्करतो. (मुस्करणं : हा मराठी शब्द बाबूरावांकडूनच तूर्त उसना घेतला आहे. कामगिरीनंतर परत करू). मि. एमची सेक्रेटरी मिस मनीपेनी (काय पण नाव, राव!) ही बाँडवर गेली अनेक दशकं डोरे डालतेय; पण या प्राण्याला बारा गावचं पाणी प्यायची सवय. कामगिरीवर जाण्यापूर्वी गुप्तचरांचे शस्त्रप्रमुख त्याला बॉम्ब छपवलेलं पेन, लोहचुंबक दडवलेलं घड्याळ, मिसाइल डागणारी मोटार किंवा चक्‍क गुप्त होणारी मोटार असली अफलातून संशोधनं दाखवतात. बाँड सज्ज होऊन निघतो. जिथं जातो ते हमखास एखादं भन्नाट लोकेशन असतं. लास वेगस, इस्तंबूल, हॅवाना, व्हेनिस...असं.

तिथं त्याला एखादी लावण्यखनी भेटते. तिची एंट्री अर्थातच पूर्ण कपड्यात होणं मंजूर नाही. तिनं समुद्र, तरणतलाव अशा पाणीदार ठिकाणीच एंट्री घेणं गरजेचं आहे. वो तो स्क्रिप्ट की डिमांड है. तसंच ती खलनायकाची चमची असणंही गरजेचं आहे; पण तरीही बाँड तिला पटवतो. तिच्या साथीनंच खलनायकाची घंटी वाजवतो. धी एंड. 
 

सगळा तपशील म्हणजे बाँडपट.
* * *

सर रॉजर जॉर्ज मूर यांचं स्वित्झर्लंडमधल्या त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. चित्रपटांमधल्या देदीप्यमान कारकीर्दीनंतर त्यांनी धर्मादाय आणि सामाजिक क्षेत्रात मनापासून काम केलं. ‘युनिसेफ’चे राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्याखातर ब्रिटिश सरकारनं त्यांना ‘नाइटहूड’चा किताब बहाल केला होता. गेली काही वर्षं ते कर्करोगाशी झगडत होते. मरणसमयी त्यांना यातना झाल्या नाहीत. शांतपणे त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला...

वरील आठ ओळींमध्ये एक पर्व सामावलेलं आहे. त्याला ‘बाँडपर्व’ म्हणता येईल. सत्तरीच्या दशकात ज्यांनी तारुण्यात पाऊल टाकलं, अशा पिढीला रॉजर मूर हे नाव अपरिचित नाही. कारण ‘जेम्स बाँड म्हटलं की रॉजर मूर’ हे समीकरण या पिढीच्या मनात असतं. इयन फ्लेमिंगचा सुप्रसिद्ध काल्पनिक गुप्तहेर नेमका कसा दिसत होता, असं या पिढीला विचारलं तर उत्तर येईल, अर्थात रॉजर मूरसारखा. 

वास्तविक जॉर्ज लेझनबी, शॉन कॉनरी, पिअर्स ब्रॉस्नन, टिमथी डाल्टन, डॅनियल क्रेग अशा इतर पाच-सहा सिताऱ्यांनी आपापल्या मगदुरानुसार बाँड साकारला. विख्यात ब्रिटिश अभिनेता डेव्हिड निवेननंही एका बाँडपटात (कसिनो रॉयल, १९६७) काम केलं होतं, अशी इतिहासात नोंद आहे. प्रत्येकाचे वेगळाले चाहते आहेत; पण सर्वाधिक बाँडपट केले ते रॉजर मूर यांनीच. म्हणून जेम्स बाँड या काल्पनिक गुप्तहेराचा चेहरा रॉजर मूर यांचाच आहे.

रॉजर मूर यांनी बाँडगिरीचा करार स्वीकारला, तेव्हा विख्यात अभिनेता शॉन कॉनरीचे पाचेक बाँडपट करून झाले होते आणि तो कंटाळलासुद्धा होता. त्यानं साकारलेला बाँड तगडा आणि रगेल होता. रॉजर मूर त्यामानानं शामळू (आपल्या राजेश खन्नाला कुठं सिक्‍स पॅक होते?); पण ती एक भिवई वर करून डायलॉग टाकण्याची लकब, निळे डोळे, प्रमाणबद्ध चेहरा आणि देह...मूरसाहेबांनी झटकन जम बसवला.

१९७३ मध्ये ‘लिव्ह अँड लेट डाय’ या बाँडपटात रॉजर मूर पहिल्यांदा दिसले आणि लोकांनी त्यांना ‘नवा बाँड’ म्हणून स्वीकारलं. मग पाठोपाठ ‘मॅन विथ द गोल्डन गन’, ‘द स्पाय हू लव्हड्‌ मी’, ‘मूनरेकर’, ‘फॉर युवर आइज्‌ ओन्ली’, ‘ऑक्‍टोपसी’, ‘अ व्ह्यू टू अ किल’ असे टप्प्याटप्प्यानं चित्रपट आले. ‘अ व्ह्यू टू अ किल’ आला १९८५ मध्ये, तोवर रॉजर मूर ५७ वर्षांचे झाले होते. बाँड याहून अधिक म्हातारा होऊ शकत नाही. 

बाँडचाहत्यांमध्ये दोन स्पष्ट प्रवाह आहेत. एक: शॉन कॉनरीवादी आणि दुसरे : रॉजर मूरवादी. ‘कॉनरी सगळ्यात बेष्ट बाँड होता,’ असं काही लोक म्हणतात. त्यांना डॅनियल क्रेगचा धसमुसळेपणाही चालतो. मूरवाद्यांना क्रेगच्या निर्दय मारामाऱ्या पसंत नाहीत. मूरवादी थोडे फॅशनवादी, ईहवादी असतात. सत्तरीच्या दशकात बाँडची ओळख झालेल्यांना रॉजर मूरच ‘आपला’ वाटतो. त्यांच्या दृष्टीनं शॉन कॉनरी कितीही सरस असला तरी शेवटी तो सावत्र बाँड आहे! मूरसाहेबांचे वनलायनर्स त्यांना नेहमीच आपलेसे वाटणार. 

खुद्द मूर यांनी शेवटचा चित्रपट अगदी कसाबसा पूर्ण केला. मुळात त्यांना बाँडगिरी पसंत नव्हती. निव्वळ पोटार्थापलीकडं काही भावनिक गुंतवणूक नव्हती. बाँडच्या कारनाम्यांची ते मजेदार चेष्टाही नेहमी करत असत. ‘सेटवरच्या फर्निचरला न अडखळता हातात पिस्तूल धरून पाठ केलेले डायलॉग म्हटले की बाँड आपोआप साकारला जातो’ असं गुपित त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

रॉजर मूर हे काही थोर अभिनेते नव्हते. शॉन कॉनरीला अभिनयाची वाईट खोड होती, ती मूर यांना नव्हती. पाच-दहा लकबींपलीकडं बाँडपटासाठी काही गरजेचंही नव्हतं. ते म्हणत: ‘‘मला फक्‍त तीन लकबी येतात. एक: डावी भुवई उडवणं. दोन : उजवी भुवई उडवणं आणि तीन : ‘जॉज’च्या तावडीत सापडल्यावर दोन्ही भुवया खाली करणं...’’ (‘जॉज’ हे बाँडपटातून दिसणारं एक सातफुटी पात्र आहे. तो खलनायकाचा मारेकरी आहे. त्याचे दात पोलादाचे आहेत).

मूर यांनी बाँडपटांपलीकडंही १२-१३ चित्रपटांमधून भूमिका केल्या. ‘गोल्ड’ (१९७४), ‘शाउट ॲट द डेव्हिल’ (१९७६ आणि ‘द वाइल्ड गीज’ (१९७८) हे तिन्ही चित्रपट दक्षिण आफ्रिकेतले होते. वर्णविद्वेषाच्या काळात दक्षिण आफ्रिकेला वाळीत टाकण्यात आलं होतं, तरीही मूरसाहेबांनी तिथं काम केलं. त्यासाठी त्यांना नावंही ठेवली गेली. ‘द कर्स ऑफ द पिंक पॅंथर’ हा पीटर सेलर्सच्या धमाल चित्रपटमालिकेतला एक चित्रपट; पण हा चित्रपट येण्याआधीच पीटर सेलर्सचं निधन झालं.

पिंक पॅंथर हा वास्तविक जेम्स बाँडचाच विडंबनपट होता. मूर्ख इन्स्पेक्‍टर क्‍लूसोच्या मजेदार कारनाम्यांनी पब्लिक हसून हसून मरायचं. ‘द कर्स...’ची कहाणी अशीच विणली गेली, की पिंक पॅंथर हिरा गायब झालाय आणि पाठोपाठ इन्स्पेक्‍टर क्‍लूसोसुद्धा. मात्र, त्यानं आता प्लास्टिक सर्जरी केली आहे. हिरा म्हणे त्यानंच चोरला! ...आणि या चित्रपटात पीटर सेलर्सच्या जागी चक्‍क रॉजर मूर दिसले. सिनेमा बरा चालला.

यानिमित्तानं मूरसाहेब विनोदाच्या क्षेत्रात चांगलं काम करू शकतात, हे सिद्ध झालं. बाकी ‘द सेंट’ या टीव्ही मालिकेतलं दमदार किरदार सोडलं, तर त्यांच्या खात्यात एरवी काहीही नव्हतं. मग सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:ला बऱ्याच प्रमाणात गुंतवलं. तरीही माणूस आंतर्बाह्य ‘साहेब’ होता. इंग्लंडमधल्या करचुकवेगिरीच्या भानगडीत त्यांनी शेवटी देशच सोडला. त्यांचं एक घर मोनॅकोत झालं, उरलेलं वास्तव्य स्वित्झर्लंडमधल्या मस्त घरकुलात. तिथंच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ‘इंग्लंडात मी जितके पैसे कमावले, त्याचा कर मी दिलेला आहे. मी कर चुकवणारा नाही,’ असं ते वारंवार सांगत; पण मायदेशात त्यांना शेवटपर्यंत जाता आलं नाही, हे सत्य आहे. त्यांना जंटलमन म्हणावं तर त्यांनी आयुष्यभरात चारेक लग्नं केली, त्यांना अनेक मैत्रिणीही होत्या, हा भाग वेगळा. ते बहुधा हॉलिवूडचं व्यवच्छेदक लक्षणच मानायला हवं. ‘ऑक्‍टोपसी’ या बाँडपटाच्या शूटिंगसाठी ते पहिल्यांदा भारतात आले. राजस्थानात राहिले.

‘ऑक्‍टोपसी’त तर त्यांनी ऑटो रिक्षा चालवत एक स्टंटही केला. इथं त्यांना गरिबीचं जवळून दर्शन झालं. दरिद्री लहान मुलांची परवड त्यांनी पाहिली. ते या मुलांसाठी काम करू लागले. बाँडपटाच्या शूटिंगसाठी ते जगभर ठिकठिकाणी जात. तिथं त्यांनी जमेल तितकं काम करायला सुरवात केली. यामागं अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नची प्रेरणा होती. ती स्वत: ‘युनिसेफ’चं खूप काम करत असे. शेवटी ‘युनिसेफ’नं मूर यांना राजदूत म्हणूनच नियुक्‍त केलं. ‘हे माझं खरं करिअर आहे’, असं ते म्हणत. कायम  उत्तमातले उत्तम सूट घालून वावरणारे सर रॉजर मूर यांना नेहमी उत्तम पोशाखासाठी दाद मिळत असे; किंबहुना त्यांनी फॅशनचे अनेक ट्रेंड्‌स आणले. उदाहरणार्थ ः बेल बॉटम. पायात घोळ असलेल्या या पाटलोणी सत्तरीच्या दशकात अचानक फॅशनीत आल्या. ३२ बॉटमची लफकणारी पॅंट घालून फिरणारी तरुण पोरं दिसू लागली. या पाठीमागं जेम्स बाँड उभा होता, हे कुणाला माहीत आहे? ‘द स्पाय हू लव्हड्‌ मी’ आणि ‘मूनरेकर’ या चित्रपटांमध्ये जेम्स बाँडनं बेल बॉटम घातली आणि अवघं जग पायघोळ झालं. विमानतळावरून बाहेर चालत येण्याची मूरसाहेबांची स्टाइल तर अनेकांना वेड लावून गेली. 

अभ्यासातल्या पुस्तकात, गादीखाली दडलेल्या बाबूराव अर्नाळकरांचं जे स्थान होतं, तेच रॉजर मूर यांचं होतं. बाँडपट सुरू राहतील... खोऱ्यानं पैसा ओढतील...नवनवी लोकेशन्स...ग्राफिक करामती...गरगरवून टाकणारे स्टंट्‌स...नवे तरणेबांड बाँड येतील; पण त्या सगळ्या बाँडच्या सावल्या. त्यांच्याकडं पाहून खरा जेम्स बाँड - म्हणजे आपले सर रॉजर मूर - फक्‍त मुस्करतील. एक भुवई उडवून म्हणतील ः आय लाइक इट शेकन...नॉट स्टर्ड.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करण्यासाठी क्लिक करा