कार्तिका नायरने मारली 30 फूट कड्य़ावरून उडी!

टीम ई सकाळ
सोमवार, 29 मे 2017

अलीकडेच मालिकेत द्रवीडांची सेनापती देवसेनेची भूमिका रंगविणारी कार्तिका नायर हिला एका कड्य़ावरून खाली नदीत उडी मारण्याचा प्रसंग साकारावयाचा होता. तिला हा प्रसंग करण्यास सांगण्याचे धाडस निर्मात्यांना होत नव्हते. परंतु कार्तिकाने बॉडीडबलचा वापर न करता स्वत:च हा प्रसंग उभा करण्याचा आग्रह धरला… आणि तो यशस्वीपणे पारही पाडला!

मुंबई : ‘स्टार प्लस’वरील ‘आरंभ’ या आगामी मालिकेतील कलाकारांनी ही ऐतिहासिक मालिका भव्य आणि दिमाखदार करण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली असून त्याद्वारे टीव्हीवरील मालिकांचे स्वरूपच बदलून टाकण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी हिंदी चित्रपट क्षेत्रातील काही सर्वात नामांकित कलाकार, तंत्रज्ञ, स्टंटदिग्दर्शक, कलादिग्दर्शक वगैरेंवर या मालिकेची जबाबदारी सोपविली आहे. केवळ तंत्रज्ञच नव्हे, तर अभिनेतेही या कामात सहकार्य करीत असून त्यांनीही आपल्याकडून कोणतेही प्रयत्न कमी पडणार नाहीत, याबद्दल ते दक्षता घेत आहे. अलीकडेच मालिकेत द्रवीडांची सेनापती देवसेनेची भूमिका रंगविणारी कार्तिका नायर हिला एका कड्य़ावरून खाली नदीत उडी मारण्याचा प्रसंग साकारावयाचा होता. तिला हा प्रसंग करण्यास सांगण्याचे धाडस निर्मात्यांना होत नव्हते. परंतु कार्तिकाने बॉडीडबलचा वापर न करता स्वत:च हा प्रसंग उभा करण्याचा आग्रह धरला… आणि तो यशस्वीपणे पारही पाडला!

या प्रसंगात कार्तिकाने फारसा विचार न करता तब्बल 30 फूट उंचावरून खाली नदीत उडी मारली. तिला तशी उडी मारताना पाहून तिच्या धाडसामुळे निर्माते काही क्षण स्तब्ध झाले! मालिकेतील कलाकारही इतकी कठोर मेहनत घेताना दिसत असल्याने ही मालिका नक्कीच प्रेक्षणीय होत असेल, यात शंका नाही!