β ऑल मेन आर नॉट सेम!

तन्मया पंचपोर
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

पिंक कायम मुलींशी निगडित असणारा रंग. कदाचित म्हणूनच सिनेमाचं नावही पिंक!! यात असा एक विषय आहे जो प्रत्येक मुलीने आयुष्यात एकदा तरी बघितला खरंतर अनुभवला आहे. शारीरिक, मानसिक, मौखिक किंवा केवळ नजरेने केलेला लैंगिक अत्याचार. 

पिंक कायम मुलींशी निगडित असणारा रंग. कदाचित म्हणूनच सिनेमाचं नावही पिंक!! यात असा एक विषय आहे जो प्रत्येक मुलीने आयुष्यात एकदा तरी बघितला खरंतर अनुभवला आहे. शारीरिक, मानसिक, मौखिक किंवा केवळ नजरेने केलेला लैंगिक अत्याचार. 

जी अजूनही यातून वाचली आहे ती प्रचंड भाग्यवान आहे किंवा या प्रकाराला लैंगिक अत्याचार म्हणतात हे तिला माहितच नाहीये. भाग्यवान मुलगी अशीच भाग्यवान राहूदे. मात्र जी अज्ञानी आहे तिने ते अज्ञान दूर करून घेतलं पाहिजे. कारण आज घराबाहेर पाऊल टाकलं कि स्वत्व जपायचं कि स्वतःला जपायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या मुलीला पाहिलं कि काही लोकांचे हात त्यांच्या पॅंटकडे जातात, नको तिथे खाज सुटते त्यांना अगदी तेव्हाच. मग ती मुलगी जवळून जाऊ लागली कि कोपरं बाहेर काढली जातात, मुद्दाम धक्का मारला जातो. त्या मुलीला नको तिथे हात लावला जातो.. अगदीच हलकट आणि प्रचंड घाणेरड्या वृत्तीची ती जनावरं चेन उघडून आपलं तथाकथित पौरुषत्व दाखवतात.. बसमधून जाताना अशा कोनात उभे राहतात हे लोक की स्पर्श झालाच पाहिजे. किळसवाणा स्पर्श. शेजारी येऊन बसणं, कोपर रुतवणं हे तर अगदीच सर्रास चालू असतं. 

रात्रीच्या वेळी चालत किंवा गाडीवरून जाणारी मुलगी म्हणजे "आज रात्रीची सोय झाली‘ असं वाटतं यांना. मग गाडीच्या काचा खाली करून "काय म्याडम येणार का?‘ असं गलिच्छ ऐकायला मिळतं. तिला बघताना आपापसात ते नीच लोक "ती बघ कलिंगडं..‘ असं म्हणत तिला न्याहाळतात.. शिट्टी वगैरे प्रकार फार जुने झाले म्हणे आता. एकटी मुलगी बाहेर दिसली कि "तुम्ही असं इथे एकटं राहणं सुरक्षित नाही, माझ्याबरोबर चला.. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात‘ असं म्हणणाऱ्या तोंडातून वासना टपकते. बहीण-भावाच्या नात्याची लक्तरं वेशीवर टांगली जातात आणि हे सगळं फक्त घराबाहेरच होतं असंही नाही. ज्या मुलींना स्वतःच्या घरात हे असलं सहन करावं लागतं त्यांच्यासारख्या बिचाऱ्या त्याच. 

एखादा चांगला मित्र आजकाल स्वतःहून सांगतो. "तुला सांगायला काही हरकत नाही.. बऱ्याचदा मुलींशी बोलताना काही मुलांच्या डोक्‍यात कुठे ना कुठे तरी हिच्याशी शय्यासोबत करायला मिळावी असाच विचार असतो.. त्यामुळं जपून..‘ अशावेळेस सगळ्या पुरुषजातीबद्दलच घृणा वाटायला लागते.. अशा लोकांमुळे जे पुरुष खरंच खूप चांगले आहेत.. आयुष्यभर चांगलंच वागत आले आहेत अशांवरही संशय घेतला जातो किंवा पटकन विश्वास टाकता येत नाही.. तेव्हा मात्र मुलींबद्दल वाईट तर वाटतच पण या चांगल्या पुरुषांबद्दलसुद्धा खूप वाईट वाटतं. 

हे सगळं उघडपणे लिहावंसं वाटलं कारण एक चांगला मित्र, काका, आजोबा, बॉस, शेजारी असणं किती महत्वाचं आहे हे माहित असूनसुद्धा अशा काही चिंधी लोकांमुळे माणुसकीवरचा विश्वास उडत चाललाय आणि एक गोष्ट वारंवार अधोरेखित होत चालली आहे, "We are not safe out here‘.. ‘My girls, my ladies, we are not safe out here!!‘ 

P.S. - माझेही खूप चांगले मित्र आहेत, अगदी सगळ्या वयोगटामधले.. त्यांच्यासोबत असताना मी मुलगी असल्याची मला भीती वाटत नाही.. किंवा कमीपणाही वाटत नाही!! ही पोस्ट अशा काही नराधमांबद्दल आहे ज्यांना अजूनही मुलगी, स्त्री केवळ उपभोग्य वस्तू वाटते.. बाकी, कोणत्याही सुज्ञ, विचारी, विवेकी पुरुषाने मनाला लावून घेऊ नये.. या बाबतीत ‘All men are not same‘ हे आम्हांला नक्की माहित आहे!!!