सिंधूच्या भूमिकेसाठी दीपिका पदुकोण? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

सोनू सूद सिंधूवरील चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तिच्या कहाणीपासून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास सोनू सूद यांनी व्यक्त केला. सिंधूचे आई-वडील व्हॉलिबॉल खेळाडू आहेत; पण गोपिचंद यांच्या यशाने प्रेरित होऊन सिंधू बॅडमिंटनकडे वळली.

मुंबई - रिओ ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूवरही आता चित्रपट येणार आहे. या चित्रपटात सिंधूची प्रमुख भूमिका दीपिका पदुकोण करण्याची दाट शक्‍यता आहे. 

सिंधूवरील चित्रपटाची पटकथा तयार आहे. तिच्या रोलसाठी दीपिका पदुकोणबरोबर सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आहे असे सांगितले जात आहे. दीपिका ही दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. पदुकोण हे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेले पहिले भारतीय आहेत. त्यांनी बॅडमिंटन जगतात भारताचा दबदबा निर्माण केला होता. दीपिकाही सुरवातीस बॅडमिंटन खेळत होती. अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही ती सहभागी झाली होती, पण त्यानंतर तिने मॉडेलिंग करीत चित्रपटात प्रवेश केला. 

सोनू सूद सिंधूवरील चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तिच्या कहाणीपासून अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्‍वास सोनू सूद यांनी व्यक्त केला. सिंधूचे आई-वडील व्हॉलिबॉल खेळाडू आहेत; पण गोपिचंद यांच्या यशाने प्रेरित होऊन सिंधू बॅडमिंटनकडे वळली. सिंधूही आपल्या चित्रपटाबाबत ऐकून खूष आहे. अनेक अडथळे पार करीत मी यश मिळवले आहे, त्यावरील चित्रपटाने तरुणांना देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा सिंधूने व्यक्त केली.