ध्यानी राहणारा, मनी ठसणारा (नवा चित्रपट )

संतोष भिंगार्डे
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

अलीकडे मराठी नाटकांचे रूपांतर चित्रपटात करण्याची परंपरा समृद्ध होऊ पाहातेय. मराठी नाटक आधीपासूनच सक्षक्त होतेच; मात्र त्याचे रूपांतर चित्रपटात करणे आणि त्याला यश मिळणे हा गेल्या दोनेक वर्षांतील इतिहास. त्यापूर्वीही काही मराठी नाटकांची कथा सिनेमासाठी वापरली गेली आहेच. 

अलीकडे मराठी नाटकांचे रूपांतर चित्रपटात करण्याची परंपरा समृद्ध होऊ पाहातेय. मराठी नाटक आधीपासूनच सक्षक्त होतेच; मात्र त्याचे रूपांतर चित्रपटात करणे आणि त्याला यश मिळणे हा गेल्या दोनेक वर्षांतील इतिहास. त्यापूर्वीही काही मराठी नाटकांची कथा सिनेमासाठी वापरली गेली आहेच. 
गेल्या दोनेक वर्षांत "कट्यार काळजात घुसली', "नटसम्राट' या मराठी रसिकांच्या मनात ठसलेल्या लोकप्रिय नाटकांवर चित्रपट आले आणि अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांनी त्यांचे चांगलेच स्वागत केले. याच रांगेतील चित्रपट आहे "ध्यानीमनी.' एकेकाळी खूप लोकप्रिय ठरलेल्या "ध्यानीमनी' याच नावाच्या नाटकावर तो आधारित आहे. नीना कुलकर्णी आणि शिवाजी साटम यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. त्यातील क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट असलेल्या तरुणाची भूमिका काही प्रयोगात महेश मांजरेकरांनी केली होती. आज त्यांचा रोल बदललाय... 
द ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट आणि जी. बी. एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मात्र "ओरीजिनल' दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनीच केलेय. पटकथा व संवाद अर्थातच मूळ नाटककार प्रशांत दळवी यांचेच आहेत. त्यांना या नव्या सिनेअवतारात महेश मांजरेकर, अश्‍विनी भावे, अभिजित खांडकेकर, मृण्मयी देशपांडे या कलाकारांची समर्थ साथ लाभलीय. नाटकावर आधारित चित्रपट बनविणे, त्यातही गाजलेल्या नाटकाचे रूपांतर चित्रपटात करणे हे आव्हानच असते. "चंकु' म्हणजेच चंद्रकांत कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने हे आव्हान चांगलेच पेललेय. नाटक पहिलेल्या रसिकाला यातील महत्त्वाचे रहस्य आधीच माहीत असले तरी त्याला बांधून ठेवेल असा चित्रपट तयार करण्यात "चंकु'नी यश मिळवलेय हे नक्की. पहिल्यांदाच ही कथा सिनेमाच्या पडद्यावर पाहणाऱ्यांना तर या चित्रपटाचे रहस्य गुंतवून ठेवेल आणि धक्काही देईल! 
सदानंद पाठक (महेश मांजरेकर) आणि शालिनी पाठक (अश्‍विनी भावे) या दाम्पत्याची ही कथा. कोकणातील एका फार्म हाऊसमध्ये ते राहत असतात. लग्नाला बरीच वर्षे झालेल्या या मध्यमवयीन जोडप्याच्या घरी त्यांच्या मास्तराचा मुलगा समीर करंदीकर (अभिजित खांडकेकर) आपल्या पत्नीला, अपर्णा (मृण्मयी देशपांडे)ला घेऊन रोह्याला काही दिवस त्यांच्या फार्म हाऊसवर राहायला येतो. तो क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट असतो. तो येथे आल्यानंतर त्याला ते काही समजते किंवा तो जे काही पाहतो त्याचा त्याला धक्का बसतो. त्याला आणि प्रेक्षकांनाही... एका विशिष्ट टप्प्यावर आश्‍चर्याचा धक्का देणारी ही कथा आईची मुलाबद्दलची ओढ आणि मुलाविषयी तिला असलेले अतूट प्रेम दाखवते. हे सारे प्रसंग दिग्दर्शकाने छान टिपले आहेत. 
महेश मांजरेकर आणि अश्‍विनी भावे या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाबद्दल काय सांगायचे? दोघांनीही या चित्रपटात "फुल ऑन बॅटिंग' केलीय. मुलाबद्दलची असलेली ओढ... त्याच्यासाठी तिची होणारी घालमेल... त्याच्या प्रकृतीची तिला असलेली काळजी आणि आपले मूल बिघडले आहे, असे कळल्यानंतर तिच्यातील जागृत होणारी आई... असे भूमिकेचे विविध कंगोरे अश्‍विनीने पडद्यावर छान मांडलेत. महेश मांजरेकरांचे डोळ्यांतून बोलणे खासच. मृण्मयी आणि अभिजित यांचेही काम खुमारी वाढवणारे. 
प्रशांत दळवी यांचे संवाद छान आहेत, असे वेगळे सांगायला नकोच. अजित रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफीही उत्तम. चित्रपटाचा पूर्वार्ध लागलीच पकड घेत नाही; पण उत्तरार्ध उत्तम. तो खिळवून ठेवतो. फक्त शालूला मूल न होण्याचे जे कारण डॉक्‍टर सांगतात, ते आजच्या युगात मनाला अजिबात पटत नाही. नाटक ज्या काळात आले होते त्यामुळे ते तसेच राहून गेले असावे. तरीही शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा हा सायकॉलॉजिकल थ्रिलर नक्कीच ध्यानीमनी राहावा असाच आहे.