चला हवा येऊ द्या...नाबाद तीनशे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मराठी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यसृष्टीला उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून देणारा 'झी मराठी'वरील कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. सन 2014 मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला आहे आणि आता या कार्यक्रमाने तीनशे भागांचा टप्पा पार केला आहे.

मराठी चित्रपटसृष्टी तसेच नाट्यसृष्टीला उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून देणारा 'झी मराठी'वरील कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. सन 2014 मध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेला आहे आणि आता या कार्यक्रमाने तीनशे भागांचा टप्पा पार केला आहे.

नीलेश साबळेचे खुमासदार सूत्रसंचालन तसेच भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके या कलाकारांच्या सकस आणि कसदार अभिनयामुळे हा कार्यक्रम घरोघरी पोहोचलेला आहे. नीलेश साबळे या कार्यक्रमाचा दिग्दर्शक आहे. हा कार्यक्रम केवळ मनोरंजन करीत नाही तर अनेक सामाजिक प्रश्‍नांनाही त्याने हात घातलेला आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र आणि सागर कारंडेचा पोस्टमन ही या कार्यक्रमाची आणखीन एक जमेची बाजू आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक चित्रपट निर्मात्या व दिग्दर्शकांसह कलाकार आपल्या चित्रपटांच्या प्रमोशन्ससाठी सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. हा कार्यक्रम केवळ हसवीतच नाही तर कधी कधी डोळ्यात पाणीही आणतो. मराठीतील कलाकाराच यामध्ये सहभागी झाले असे काही नाही तर हिंदीतील अनेक कलाकारांना या कार्यक्रमाने भुरळ घातलेली आहे. आमीर खान, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह सलमान खान, शाहरूख खान, अजय देवगण, जॉन अब्राहम, रणबीर कपूर, गोविंदा, श्रीदेवी, अनिल कपूर, अर्जुन कपूर आदी कलाकारांनी यामध्ये हजेरी लावलेली आहे. खरंतर रितेश देशमुखच्या उपस्थितीत त्याच्या 'लय भारी' या चित्रपटाच्या प्रमोशनने या कार्यक्रमाची सुरूवात झाली. पण ही सुरूवात इतकी लय भारी झाली की त्याचा डंका हिंदीत जोरात वाजला. आणि बॉलीवूडवाल्यांना त्याने प्रेमात पाडले. हिंदीतील कपिल शर्माच्या शोमध्ये पहिल्यांदा सहभागी न होता बॉलीवूडचे सगळे कलाकार या मराठी कार्यक्रमाला प्राधान्य देत आहेत. आता हा कार्यक्रम चारशे भागांकडे वाटचाल करीत आहे.

याबद्दल 'झी मराठी'चे बिझनेस हेड नीलेश मयेकर म्हणाले, की आमचा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरलेला आहे त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आम्ही आभार मानतो. त्यांच्यामुळेच आम्ही एवढा मोठा पल्ला पार केला आहे. आता हा कार्यक्रम अधिकाधिक रंजक कसा होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आम्ही केवळ हिंदीच नाही तर मराठी चित्रपटांना आणि नाटकांनाही या शोमध्ये अधिक प्राधान्य देतो.