साचेबद्ध नृत्यातून बाहेर पडावे - रेमो डिसूझा

अरुण सुर्वे
सोमवार, 26 जून 2017

रिऍलिटी शोमुळे मुलांच्या कलागुणांना वाव

दिग्दर्शन केले; अभिनय राहिला
'एबीसीडी' या चित्रपट मालिकेतील 'एबीसीडी 3'मध्येही वेगळ्या प्रकारची नृत्ये असून, हा खूपच वेगळा चित्रपट आहे. खरेतर मी चित्रपटाचे दिग्दर्शन केले; मात्र अभिनय राहूनच गेला, अशी खंत रेमो डिसूझा याने व्यक्त केली; मात्र माझे हे 'कॅरॅक्‍टर' चांगले असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

पुणे : 'हल्लीच्या कलाकारांचा नृत्याचा साचा ठरलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ते कंटाळवाणे वाटतात. कलाकारांनी या साचेबद्धपणातून बाहेर पडावे. रिअॅलिटी शोमुळे नृत्याचे विविध प्रकार जन्माला येत असून, त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वावही मिळत आहे,'' असे नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा याने 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

रेमो सहा-सात वर्षांपासून नृत्याच्या रिअॅलिटी शोचे परीक्षण करत आहेत. धर्मेश येलंडे, पुनीत पाठक, शक्ती मोहन हे त्यांचे सहकारी आहेत. रिअॅलिटी शोमधून मुख्य विजेत्यांची निवड करणे मोठे आव्हान असल्याचे रेमो म्हणाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर नृत्य करणारे खूप कलाकार असून, प्रत्येकाची नृत्याची पद्धत वेगळी आहे. विशेष म्हणजे ज्या मुलांची नृत्याच्या रिअॅलिटी शोमध्ये निवड होते, त्यांच्यामध्ये वेगळी 'खासियत' असते. त्यामुळे या सर्वांमधून एका विजेत्याची निवड करणे, हे सुपरजज्ज म्हणून माझ्यासाठी कसरतच असते. कारण, यातून कोणावरही अन्याय होऊ नये, अशी माझ्यासह प्रेक्षकांचीही अपेक्षा असल्याचे रेमो याने सांगितले.

मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी पालकही त्यांना प्रोत्साहन देतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षाही बाळगतात, हे मात्र चुकीचे आहे. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे नृत्य आणि करिअर करू द्यावे, असेही रेमो म्हणाला. दरम्यान, नृत्याचे अनेक क्‍लासेस सुरू होत आहेत. एखाद्या शोमध्ये विजेता झालेला लगेचच नृत्याचे क्‍लासेस उघडतो. त्यातून व्यावसायिकीकरण सुरू होते; मात्र काळानुसार नृत्यातही बदल होतो, हे विसरून चालणार नसल्याचे त्याने सांगितले.

हिंदी चित्रपटांतील नृत्याविषयी रेमो म्हणाला, 'चित्रपटातील आशयाप्रमाणेच त्यातील संगीत आणि नृत्य असते. त्यामुळे कलाकारही त्याचेच अनुकरण करतात. काही कलाकारांचा नृत्य करण्याचा साचा ठरलेला असतो; मात्र काळानुसार तो बदलण्याची गरज आहे. साचेबद्ध नृत्य प्रेक्षकांना खटकते व त्यांना त्याचा कंटाळा येतो, याचाही विचार करण्याची गरज आहे.''

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांना घरबसल्या नृत्याचे विविध प्रकार पाहता आणि शिकताही येतात; मात्र आमच्या काळात या गोष्टी इतक्‍या सहजतेने मिळत नव्हत्या. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत असत. विशेष म्हणजे आजही शास्त्रीय नृत्य शिकणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, ती आनंदाची गोष्ट असल्याचे रेमो म्हणाला.
'डान्स प्लस सीझन- 3'बाबत रेमो म्हणाला, 'या शोमध्ये मी व माझे परीक्षक सहकारी सोडून इतर सर्व जण 'प्लस' आहोत. कारण, यात यंदा 'एक लेव्हल अप' केली आहे. यात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नृत्यकलाकार व दिग्दर्शकही सहभागी होणार आहेत. यात नृत्याचे विविध प्रकार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल.''