'पर्सनल अफेअर्स'ने जिंकली मने

इन्व्हर्जन चित्रपटातील दृश्‍य
इन्व्हर्जन चित्रपटातील दृश्‍य

पणजी ः आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) चौथ्या दिवशी कौटुंबिक चित्रपटांचाच बोलबाला होता. त्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील "पर्सनल अफेअर्स'ने प्रेक्षकांची मने जिंकली, तर इराणचा "इनव्हर्जन', अझरबैजानचा "इनर सिटी'ने अंतर्मुख केले. दरम्यान, महोत्सवातील वातावरण आता टिपेला पोचले असून, सर्व प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.


इफ्फीमध्ये आज चर्चा रंगली "पर्सनल अफेअर्स' या महा हज दिग्दर्शित इस्राईलच्या चित्रपटाची. एकत्रित कुटुंब विभक्त झाल्यानंतर नात्यांमध्ये आलेला तणाव व त्यातून बाहेर पडण्याची प्रत्येकाचीच धडपड चित्रपटात मांडण्यात आली आहे. कुटुंबाचे कर्ते पुरुष व त्यांच्या पत्नीत अनेक वर्षांच्या सहवासानंतर कटुता आली आहे. त्यांचा एक मुलगा घरापासून दूर राहतो आहे. त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याची प्रेयसी लग्नासाठी आग्रही आहे. वयस्कर दांपत्याची मुलगी गरोदर आहे, तर तिच्या गॅरेज चालविणाऱ्या पतीला चित्रपटात काम मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. प्रत्येक नात्याला पीळ बसला असून, काहींना त्यातून सुटायचे आहे, तर काहींना कायमचे जोडले जायचे आहे. ही कोंडी कशी फुटते, याचे चित्रण चित्रपटामध्ये ब्लॅक ह्युमरच्या आधारे करण्यात आले आहे. गंभीर विषयाची हलकी फुलकी मांडणी व खुमासदार संवादांमुळे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. "इनव्हर्जन' हा बेहनाम बहजादी दिग्दर्शित इराणचा चित्रपट याच विषयाला आणखी थोडे पुढे नेणारा ठरला. एकत्र कुटुंबामध्ये मुलीला तिचे करिअर व आयुष्याचे निर्णय घेण्याच्या बाबतीत गृहीत धरले जाते आणि त्याचा परिणाम मुलींच्या विकासावर होतो, हे सर्वत्र दिसणारे चित्र. तेहरानमध्ये राहणाऱ्या निलोफरला याचाच सामना करावा लागतो. मोठा भाऊ दिवंगत वडिलांचा व्यवसाय सांभाळत वेगळे राहत असल्याने आईची जबाबदारी निलोफरवर आली आहे. त्यातच शहरातील वाढलेल्या प्रदूषणाचा आईला त्रास होऊ लागतो व डॉक्‍टर त्यांना शहराबाहेर हलवण्यास सांगतात. भाऊ ही जबाबदारी टाळतो व त्यामुळे निलोफरवर करिअर, मित्र, आशा-आकांक्षा गुंडाळून ठेवत बाहेर पडण्याची वेळ येते. मात्र, एका महत्त्वाच्या क्षणी ती सर्व बंधने झुकारून देत संघर्षाचा पवित्रा घेते. निलोफरचे अतिशय ताकदीने उभे केलेले पात्र, तेहरानची प्रदूषित हवा दाखविणारे चित्रण व वेगवान मांडणीमुळे चित्रपटाने वाहवा मिळवली.

मांडवीच्या तीरावर धमाल-मस्ती
महोत्सवाच्या आयनॉक्‍स व गोवा कला अकादमी या दोन ठिकाणी यंदा खाद्यपदार्थांची रेलचेल कमी असली, तरी मांडवी नदीच्या तीरावर मोठी जत्राच भरली आहे. संगीत व नृत्याचे कार्यक्रम, विविध खेळ व त्याच्या जोडीला गोवा आणि महाराष्ट्राबरोबर जगभरातील विविध पदार्थांची चव चाखायला मिळत आहे. संध्याकाळी भरणाऱ्या या जत्रेत सहभागी होण्यासाठी सिनेरसिकांसह शहरातील नागरिक गर्दी करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com