साहो रे बाहुबली! 

prabhas
prabhas

मुन्ना, बिल्ला, डार्लिंग, मिस्टर परफेक्‍ट, यंग रिबेल स्टार, मिर्ची सिनेमातला जय आणि आता बाहुबली अशा विविध नावांनी ओळखला जाणारा लाडका प्रभास. काही वर्षांपूर्वी फक्त तेलुगू अभिनेता म्हणून चर्चेत होता; पण त्याच्या बाहुबली सिनेमाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. तो आता जागतिक स्तरावरचा अभिनेता म्हणून नावारूपास येतोय. त्याच्या 15 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत तो टप्प्याटप्प्याने यशाच्या शिखरावर पोहोचला. बाहुबली प्रभासचा अभिनय प्रवास कुणालाही थक्क करेल असाच आहे... 

लायब्ररीत पुस्तक आणायला गेले तेव्हा एक बाई ग्रंथपालांशी बोलत होत्या. मी बाहुबली सिनेमा तीन तीन वेळा पाहिला. फक्त प्रभासला बघण्यासाठी. त्यांचं ते बोलणं ऐकूण मलाही कुतूहल वाटलं. त्या दिवशी घरी आल्यानंतर प्रभास कोण आहे तरी कोण? असं म्हणून त्याची माहिती काढली. त्यानंतर त्याचे सात सिनेमे पाहिले. तेव्हा कळलं प्रभास या नावात काय जादू आहे ती. त्याचा एखादा सिनेमा जरी पाहिला तरी आपण त्याचे चाहतेच होऊन जातो. 

त्याची संवाद म्हणण्याची शैली, त्याचं हास्य, त्याचं मध्येच एखादा संवाद इंग्रजीत बोलणं, त्याचा डान्स, त्याची ऍक्‍शन, इतर सहकलाकारांसोबतचा वावर सारं काही प्रेमातच पाडतं आपल्याला. बाहुबलीचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाच्या आणि प्रभासवरच्या प्रेमापोटी अनेक चाहत्यांनी हा सिनेमा पाहण्यासाठी काय काय करामती केल्यात हे बातम्यातून येतंच आहे. बाहुबली सिनेमा हा भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं बोललं जातंय. जगभरातून या सिनेमाचं कौतुक होतंय. यामागे सर्व टीमची मेहनत आहे; पण खास करून आपलं सर्वस्व पणाला लावलं ते प्रभासने आणि त्याचाच परिणाम हा भव्य दिव्य स्वरूपात दिसून येतोय. त्याचे चाहते अक्षरशः वेडे झालेत. प्रभासचं किती आणि कसं कौतुक करावं यासाठी आता शब्दच सापडत नाहीत. अशी अवस्था आहे; पण प्रभास अजूनही तसाच आहे... नम्र! जसा तो पहिला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर होता. 2002 मध्ये प्रभासने आपल्या अभिनय कलेची सुरुवात केली. ईश्‍वर हा त्याचा पहिला सिनेमा. या सिनेमाने चांगली कमाई केली; पण प्रभासची खास ओळख झाली नाही. यानंतर आलेल्या वर्षम सिनेमाने त्याला तेलुगूमध्ये नाव मिळालं. मग 2005 मध्ये आलेला छत्रपती नावाचा सिनेमा एस. राजामौलींसोबतचा त्याचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर प्रभास यशाची पायरी वर वर चढतच राहिला; पण खास उल्लेख करावासा वाटतो ते 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या डार्लिंग या सिनेमाचा. डार्लिंगमुळे प्रभासला लोकप्रियता मिळाली. चाहत्यांचं प्रेम मिळालं आणि आणि सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही. प्रभास तेलुगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार झाला. 

प्रभास सिनेमामध्ये जे पात्र साकारतो तो तसाच आहे असं चाहत्यांना वाटतं आणि त्याचे चाहतेही त्याला त्याच नावाने ओळखू लागतात. डार्लिंग सिनेमानंतर प्रभास चाहत्यांना डार्लिंग म्हणू लागला आणि त्याचे चाहते त्याला डार्लिंग म्हणून लागले. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने चाहत्यांना प्रेमाने डार्लिंग असं संबोधलेल्या कित्येक पोस्ट सापडतील. डार्लिंग आणि मिस्टर परफेक्‍ट हे दोन सिनेमे रॉमॅन्टिक कॉमेडी प्रकारात मोडणारे होते आणि त्यात दाक्षिणात्य स्टाईल ऍक्‍शनही होती. या दोन्ही सिनेमांत त्याच्यासोबत काजल अग्रवाल ही नायिका होती. या सिनेमातली गाणी आणि काही संवाद खूप गाजले. प्रभास आणि काजलची जोडी खूपच छान दिसली. अनेकांना त्यांची जोडी खूप आवडली. काजल सिनेमात प्रभासला हाक मारते. त्यात खूप वेगळेपण आहे. ते एकमेकांना पाहून संवाद म्हणताना मान हलवतात. दोघांचं अचूक टायमिंग हे सारं काही प्रेक्षकांना खूप भावतं. दोघांची गाणीही हिट आहेत. त्यानंतर अनुष्का शेट्टीसोबत प्रभासचे चार सिनेमे झाले. तेही लोकप्रिय झाले. बाहुबलीच्या दोन भागांचं यश तर आपल्यासमोर आहे. या दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांनी तितकीच उचलून धरली. अनुष्काबरोबरचा मिर्ची हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर प्रभासने बाहुबलीचं कॉन्ट्रॅक्‍ट साईन केलं. मग सिनेमासाठी पाच वर्ष स्वतःला वाहून घेतलं. या वेळी त्याला अनेक निर्माते प्रलोभनं दाखवत होते. त्याच्या घरी फेऱ्या मारत होते. इतकंच कशाला त्याचं सिनेमाप्रती समर्पण इतकं की त्याने आपलं लग्नही पुढे ढकललं. आता दिग्दर्शक सुजीथ यांच्या साहो नावाच्या धम्माल ऍक्‍शपटात तो काम करतोय. त्याचा टिझर हिंदीसह सर्व दाक्षिणात्य भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदर्शित होईल. पहिल्याच सिनेमापासून प्रभासची माचो आणि चार्मिंग पर्सनॅलिटी बनली होती. त्यामुळे प्रभासचा सिनेमा बघायला जाताना चाहते काही प्रश्‍नांविषयी कुतूहल असतं. जसं की या सिनेमात त्याची एंट्री कशी असेल. त्याचे ऍक्‍शन सीन्स कसे असतील. गाण्यांमध्ये डान्स कसा असेल? त्याचा नायिकेसोबतचा पहिला सीन कसा असेल. तो नायिकेला कसं प्रपोज करेल. असे अनेक प्रश्‍न चाहत्यांना पडतात आणि ते पूर्ण सिनेमाभर त्याचा पडद्यावरील वावर पाहून थक्क होतात. प्रभास व्यक्तिशः लाजाळू स्वभावाचा आहे. त्याचं त्याच्या चाहत्यांवर विशेष प्रेम आहे. त्यांना तो कधीच नाराज करत नाही. त्यामुळे थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांच्या तोंडी साहो हाच शब्द उच्चारला जातो. सध्या बाहुबलीचा दुसरा भाग पाहताना प्रेक्षकांची प्रतिक्रियाही अशीच आहे, "साहो रे बाहुबली...' बाहुबली हे सिनेमाचं नाव असलं तरी ते आता प्रभासचंच दुसरं नाव होऊन गेलंय आणि "साहो रे बाहुबली' हे गाणं म्हणून नाही तर प्रेक्षकांच्या त्याच्याप्रती त्याच भावना आहेत. 

प्रभासच्या सिनेमातील नायिका.... 
प्रभासने आतापर्यंत त्रिषा, असिन, इलियाना डिक्रूज, कंगना राणावत, तापसी पन्नू, काजल अग्रवाल, अनुष्का शेट्टी, नयनतारा, तम्मनाह या नायिकांसोबत काम केलं आहे; पण त्याची लोकप्रिय जोडी ठरली ती अनुष्का आणि काजलसोबत. त्याच्या चाहत्यांना त्याला अनुष्का आणि काजलसोबत बघायला अधिक आवडतं. 

प्रभासविषयी थोडक्‍यात... 
व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं प्रभासचं पूर्ण नाव. भक्त कन्नप्पा, गीतांजली हे त्याचे आवडते तेलुगू सिनेमे. प्रभास राजकुमार हिरानीचा चाहता आहे. त्याने मुन्नाभाई एमबीबीएस आणि 3 इडियट्‌स हे सिनेमे जवळजवळ 20-25 वेळा पाहिले आहेत. रॉबर्ट डे निरो हा प्रभासचा आवडता हॉलीवूड कलाकार. प्रभास हा पहिला दाक्षिणात्य कलाकार आहे ज्याचा पुतळा वॅक्‍स म्युझियममध्ये उभारण्यात आला. प्रभासला वाचनाची खूप आवड आहे. त्याच्या घरातच एक लायब्ररी आहे. फाऊंटन हेड त्याचं आवडतं पुस्तक. त्याला खेळाचीही प्रचंड आवड आहे. खासकरून व्हॉलीबॉल खेळायला आवडतं. त्याच्या घराच्या जवळच त्याने व्हॉलीबॉल कोर्ट केलाय. मित्रांसोबत खेळण्यासाठी. त्याला वाटतं हा खेळ हाच उत्तम व्यायाम आहे. प्रभास निसर्गात रमतो. त्याला पक्ष्यांना पिंजऱ्यात ठेवणं आवडत नाही. म्हणूनच घरासमोर सुंदर बाग करून काही पक्ष्यांना त्याने बागेत ठेवलंय. चिकन बिर्याणी ही त्याची आवडती डिश. प्रभासला काळा रंग आवडतो आणि सूटही करतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com