संगीतात साधनाच गरजेची

संगीतात साधनाच गरजेची

‘सवाई’तील ‘अंतरंग’ची सुरेल सुरुवात कौशिकी चक्रवर्ती यांच्या संवादाने झाली. त्यानिमित्ताने त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा...

‘‘तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर त्यासाठी खोलवर जावे लागते, एखाद्या वृक्षाच्या मुळासारखे. लहान झाडे जास्त काळ उभी राहत नाहीत. संगीतातही तसेच आहे. तुम्हाला चांगला कलाकार व्हायचे असेल तर दहा-पंधरा वर्षे बंदघरात रियाज करावा लागतो. याला कुठलाही ‘शॉर्टकट’ नाही. ती साधना केलीत तर तुम्हाला खरी जागा मिळेल. ही खरी जागा दैनिकांच्या पानांत किंवा संगीताच्या मैफलीत नसते. ती स्वत:च्या आणि गुरूच्या नजरेत असते...’’ प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती तालमीचे महत्त्व सांगत होत्या.
शास्त्रीय संगीतात ‘कौशिकी चक्रवर्ती’ हे नाव चांगलेच चर्चेत आहे. श्रोत्यांना कौशिकी यांचे गाणे किती सुरेल आहे, हेच माहिती आहे; पण ते सुरेल होण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत फारशी माहिती नाही. या मेहनतीला त्यांनी सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवातील ‘अंतरंग’ या कार्यक्रमात उजाळा दिला. त्यांच्या सुरेल संवादानेच बुधवारी या कार्यक्रमाची सुरवात झाली. श्रीनिवास जोशी यांनी त्यांना विविध विषयांवर बोलते केले.

कौशिकी म्हणाल्या, ‘‘सुरवातीला आम्हाला खडतर संघर्ष करावा लागला. गरिबीमुळे विकत दूध घ्यावे, अशी परिस्थिती नव्हती. अंडीसुद्धा घेता यायचे नाही. त्यामुळे कोंबडीच घरात पाळली होती. एका चांगल्या नोकरीसाठी वडिलांना बॅंकेतून कॉल आला; पण आजोबांनी तो कागद फाडून टाकला. माझा मुलगा ‘कलावंत’च होईल, असे त्यांचे म्हणणे होते. एकीकडे गरिबीशी संघर्ष आणि दुसरीकडे संगीतावरील प्रेम... अशा स्थितीत वडील उभे राहिले. अनेक गुरूंकडून त्यांनी संगीताची विद्या ग्रहण केली.’’ 

‘दंगल’मधील ‘ती’ही मीच
‘‘वडिलांनी मला गाण्यात तयार केले. दिवसाची सुरवात त्यांचे गाणे ऐकतच व्हायची. त्या वेळी घर लहान होते. अनेक शिष्य घरी शिकायला यायचे. मग मला जागाच नसायची. अशावेळी तासन्‌तास बाथरूममध्ये बसून मी रियाज केला. त्यांनी फक्त गाणेच शिकवले असे नाही, संस्कारही दिले. ‘दंगल’ चित्रपटातील त्या मुलींच्या जागेत मी स्वत:ला पाहते. त्या वडिलांइतकेच कष्ट माझ्या वडिलांनी घेतले. गाताना डुलकी लागली की त्यांचा मारही बसला,’’ अशा आठवणीही कौशिकी यांनी सांगितल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com