गाण्यातून व्यक्तिमत्त्व दिसलं पाहिजे...

गाण्यातून व्यक्तिमत्त्व दिसलं पाहिजे...

‘अंबरसरिया, बहारा, मुझे क्‍या बेचेगा रुपय्या, दिल आज कल, नैना, ‘जिया लागे ना’ अशा एकापेक्षा एक मधुर गाण्यांनी सर्वांना भुरळ पाडणारी गायिका सोना मोहापात्रा आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतेय. ‘घाट’ या चित्रपटात तिनं ‘माऊली’ हा अभंग गायलाय. त्यानिमित्ताने केलेली बातचीत...
 

संगीत क्षेत्रातील प्रवास...
मी  संगीत क्षेत्रात येण्याचा असा काही विचार केला नव्हता. मुंबईत कामाच्या निमित्तानं आले होते. माझ्या जीवनात संगीताला नेहमीच प्राधान्य राहिलंय. मी हिंदुस्थानी क्‍लासिकलमध्ये प्रशिक्षण घेतलंय आणि शाळा-महाविद्यालयात शिकत असताना स्टेज परफॉर्मन्स करायचे. माझं स्वप्न होतं, की मुंबईत यावं आणि स्वतःचा अल्बम बनवावा. माझा मानस हा होता की, मी गायलेल्या गाण्यात मी दिसले पाहिजे. माझं पार्श्‍वगायिका बनण्याचं अजिबात स्वप्न नव्हतं; पण मुंबईत आल्यावर समजलं, की चित्रपटातील गाण्यांतून सहज प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं. मग मला वाटलं की, सिनेमात जर चांगलं गाणं गाण्याची संधी मिळाली तर बरं होईल. सुरुवातीला मला माझा आवाज भारी आहे म्हणून ही आयटम साँग गाऊ शकेल, असं म्हणायचे. माझीही आयटम साँग गाण्यासाठी ना नव्हती; पण जर एकदा आयटम साँग गायलं असतं; तर तशाच पद्धतीची गाणी मिळाली असती. ‘मुझे क्‍या बैचेगा रुपय्या’, ‘अंबरसरिया’, ‘जिया लागे ना’ ही गाणी माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी होती. त्यामुळे त्या वेळी मी प्रतीक्षा केली आणि अल्बमसाठी गाणं गायले. त्यात माझ्या पद्धतीची गाणी गायले. त्यानंतरही मला काम मिळत नव्हतं. त्यामुळे नैराश्‍य येऊ नये म्हणून मी नोकरी केली.

त्यानंतर मला काम मिळालं आणि आता मला संगीत क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झाली. सिनेइंडस्ट्रीतल्या करियरच्या बाबतीत मी खूपच समाधानी आहे. दर्जात्मक काम करण्याकडे माझा जास्त कल असतो. माझ्या गाण्यातून फक्त मनोरंजनच नाही; तर सांस्कृतिक प्रभावही पडला पाहिजे, असा माझा हेतू असतो. 

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण...
‘घाट’ चित्रपटात मी ‘माऊली’ हा अभंग गायलाय. माझ्यासाठी हा आशीर्वाद आहे. ‘घाट’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी गाणी ऐकली होती आणि त्यांना ती भावली. त्यांनी माझा मॅनेजर अमित ठोसरशी संपर्क केला. त्या वेळी मी कॉन्सर्टसाठी टूरवर होते. मी मराठीत जिंगल्स गायलेत; पण मराठी गाणी गाताना उच्चार करताना अडचणी येतात. इतर प्रादेशिक भाषेत गाऊ शकते. टूरवर असल्यामुळे रियाज करायला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे अभंग गाण्यासाठी ही योग्य वेळ नाही असं वाटतं होतं. कारण अभंग गाणं सोप्पं नाही. मी त्यांना नकार देण्याच्याच विचारात होते. पण सुदैवानं अमित महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्याने मला मराठी चित्रपटासाठी गाणं गाण्यासाठी नाही म्हणू नका, असं सांगितलं. मी त्याची खरोखरच आभारी आहे. कारण जेव्हा मी ते गाणं ऐकलं, तेव्हा ते मला खूपच आवडलं. रोहित नागभिडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय आणि वैभव देशमुख यांनी लिहिलंय.  

अभंगानुभव...
‘माऊली’ अभंगाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी संपूर्ण टीम उपस्थित होती. माझ्यासाठी हा खूपच वेगळा अनुभव होता. सगळ्यांनी छान आदरातिथ्य केलं. त्यामुळे कलाकार म्हणून मला मनापासून गाणं गावंसं वाटलं. हिंदी चित्रपटसृष्टीत एक गाणं दहा लोक गातात आणि त्यातून मग एकाची निवड होते. मराठी चित्रपटसृष्टी खूप वेगळी आहे. इथे कलाकारांना खूप आदर मिळतो. ज्या पद्धतीचे चित्रपट मराठीत बनताहेत त्यावरून त्यांच्या कामातील प्रामाणिकपणा दिसून येतो. वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. 

मराठी चित्रपट आणि गाण्यांबद्दल...
‘नटरंग’ चित्रपटाचं संगीत मला खूप आवडलं होतं. खूपच प्रेरणादायी होतं. ‘सैराट’चं संगीतही खूपच छान होतं. मला आठवतंय, मी एकटीनं थिएटरमध्ये जाऊन ‘किल्ला’ सिनेमा पाहिला होता. माझी बरीचशी मित्रमंडळी मराठी इंडस्ट्रीत काम करत आहेत. पण मला आतापर्यंत मराठीत काम करण्याची संधी मिळाली नव्हती. ती ‘घाट’च्या निमित्तानं मिळाली. त्यामुळे मी खूप खूश आहे. वर्षाच्या अखेरीस चांगली सुरुवात झालीय. त्यामुळे नवीन वर्षात मराठी चित्रपटात गाणी गाण्याची आणखीन संधी मिळेल, अशी आशा करते.आणि मला खरोखर मराठी शिकायचंय. अमितनं मला प्रॉमिस केलंय, की तो मला मराठी शिकवणार आहे.

सोशल व्यासपीठ...
सोशल मीडिया मला स्वातंत्र्य असणारं व्यासपीठ वाटतं. माझी कोणतीही पीआर एजन्सी वा डिजिटल एजन्सी नाहीय. मला जे मनापासून वाटतं ते मी या माध्यमाचा वापर करून लिहिते. माझा चाहता वर्ग आणि प्रेक्षक गेल्या दहा वर्षांपासून माझ्याशी जोडलेला आहे. त्यांना माहिती आहे की, मी माझं मत सोशल मीडियावर ठामपणे मांडते. इथे कधीकधी विरोध होतो, भांडणं होतात; तर कधीकधी प्रेमही मिळतं. त्यामुळे सोशल मीडिया माझा सर्वात चांगला फ्रेंड आहे. 

गाण्यांच्या रिमेकबद्दल...
क्रिएटिव्ह लोकांसाठी आणि क्रिएटिव्हिटीसाठी हा खूपच कठीण काळ आहे. ज्या निर्मात्यांना नवीन गाणी बनवून रिस्क घ्यावीशी नाही वाटत, ते गाण्यांचे रिमेक बनवतात. ‘दंगल’सारख्या ब्लॉकब्लास्टर चित्रपटांनी ओरिजनल गाणी बनवली आहेत. पण मला वाटतं, घाबरून जुनी गाणी नव्यानं रिक्रिएट केली जातात. ही गाणी प्रेक्षकांना आवडतात असं मला वाटत नाही. ही खूप वाईट बाब आहे. कदाचित हा ट्रेंड काही काळानंतर जाईल, असं वाटतं. 

- तेजल गावडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com