भावनिकरीत्या गुंतवून ठेवणारा चित्रपट

तेजल गावडे
रविवार, 13 ऑगस्ट 2017

कच्चा लिंबू

कच्चा लिंबू

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग पाहायला मिळत असताना आता अभिनेता प्रसाद ओकनं दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्ये बनवून एक वेगळीच ट्रीट प्रेक्षकांना दिली आहे. ही कथा आहे मोहन काटदरे (रवी जाधव) आणि त्यांची पत्नी शैला काटदरे (सोनाली कुलकर्णी) आणि त्यांचा स्पेशल मुलगा बच्चू (मनमीत पेम) यांची. काटदरे मुंबईत राहणारं मध्यमवर्गीय कुटुंब आहे. बच्चू हा स्पेशल असल्यानं मोहन आणि शैला यांचे जीवन खडतर झालं आहे. शैला एका ऑफिसात काम करीत असल्यानं दिवसा बच्चूजवळ कुणीतरी असावे म्हणून मोहन रात्रपाळीत काम करतात. साहजिकच मोहन व शैला यांनी त्यांच्या नात्यातील प्रेम व भावनांकडं दुर्लक्ष केलेलं असतं. श्रीकांत पंडित (सचिन खेडेकर) हा शैलाचा बॉस तिला सहानुभूती देत असतो. बच्चू वयानं वाढताना त्याच्या लैंगिक भावना जागृत व्हायला लागतात. एकीकडे या पती-पत्नीची बच्चूसाठी चाललेली तारेवरची कसरत आणि दुसरीकडं मन मारून जगत असताना ते त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण कसा शोधतात, हे चित्रपटात रेखाटण्यात आलं आहे. 

स्पेशल मुलांचं जगणं, त्यांना सांभाळताना आई-वडिलांची चाललेली तारेवरची कसरत या गोष्टी प्रसाद ओकनं छान टिपल्या आहेत. त्यांच्याकडं पाहण्याचा आपला दृष्टिकोनही बदलतो व प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतो. 

‘कच्चा लिंबू’ जयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर आधारित आहे. चिन्मय मांडलेकरनं पटकथा व संवाद लेखनाची जबाबदारी चोख पार पडली आहे. प्रसाद ओकचं दिग्दर्शन आणि मांडणी उत्तम. दिग्दर्शक म्हणून स्वत:ला सिद्ध केलेला रवी जाधवचा अभिनेता म्हणून हा पहिलाच चित्रपट. त्यानंदेखील आपली भूमिका सक्षमपणे साकारली आहे, तर सोनाली कुलकर्णीनं आपली भूमिका समरसून केली आहे. मनमीत पेमनं स्पेशल मुलाच्या आव्हानात्मक भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. त्याच्या मेहनतीला आणि कष्टाला दाद द्यायलाच हवी. सचिन खेडेकर यांनी भूमिकेला न्याय दिला आहे. इतर कलाकारांनी आपल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. अमलेंद्रू चौधरी यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम. चित्रपटात फक्त एकच गाणं असून, संदीप खरेच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला अवधूत गुप्तेनं स्वरसाज दिला आहे. राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं भावनाप्रधान झालं आहे. चित्रपट ब्लॅक अँड व्हाइटमध्ये बनविण्याचं कारण चित्रपट पाहिल्यानंतर मिळतं. बच्चू स्पेशल असल्यामुळं शैला व मोहन यांच्या जीवनातील रंग कसे बेरंग झाले आहेत हे ब्लॅक व्हाइटमध्ये दाखवण्यात आलं आहे आणि त्यांच्या जीवनातील सुखावह प्रसंग रंगीत दाखवण्यात आले आहेत. हा मेळ साधला गेल्यानं प्रसंग आणखीनच उठून दिसले आहेत. एकंदरीतच, विशेष मुलांना सोसाव्या लागणाऱ्या गोष्टी व त्याची भावनिक सफर अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहायला हवा.

निर्मिती - मंदार देवस्थळी
दिग्दर्शक - प्रसाद ओक
भूमिका - सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी,
रवी जाधव, मनमीत पेम

Web Title: manoranjan news kaccha limubu movie