मराठी चित्रपटाचे प्रमोशन चक्क समुद्राच्या पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

कोल्हापुर - मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रेमाय नमः या आगामी चित्रपटाचे प्रमोशन चक्क पाण्याखाली समुद्रात केले गेले. अदभुत असा सोहळा समुद्राच्या पाण्यात केला गेला. धाडसी आणि कल्पक असाच हा सोहळा म्हणावा लागेल.

कोल्हापुर - मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवेगळे प्रयोग होत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रेमाय नमः या आगामी चित्रपटाचे प्रमोशन चक्क पाण्याखाली समुद्रात केले गेले. अदभुत असा सोहळा समुद्राच्या पाण्यात केला गेला. धाडसी आणि कल्पक असाच हा सोहळा म्हणावा लागेल.

व्हाईट ओनियन एंटरटेन्मेंट प्रेझेंटस आणि उत्तम चोरडे यांची निर्मिती असलेला प्रेमाय नमः हा चित्रपट येत्या 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. एका अनोख्या प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात अभिनेता देवेंद्र, अभिनेत्री रूपाली कृष्णराव, प्राची, सुरेखा कुडची, मिलिंद ओक, भरत दैनी, बाळू देसाई आणि प्रकाश धोत्रे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जगदीश वाठारकर दिग्दर्शित या चित्रपटाचे संगीतकार के. संदीप व चंद्रशेखर जनवाडे आहेत. धनाजी यमकर कॅमेरामन आहेत. कला दिग्दर्शक सतीश बिडकर आहेत. प्रोडक्शन मॅनेजर महादेव शिंदे आहेत. रामोजी फिल्म सिटीबरोबर विविध लोकेशनवर याचे चित्रीकरण झाले आहे. 

दरम्यान, प्रेमाय नमः चित्रपटातील प्रत्येक घटकामध्ये, मग ते कथेपासून लोकेशन्स असो किंवा संगीतापासून सीन ट्रीटमेंटपर्यंत, प्रत्येक बाबतीत वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात अभिनेता देवेंद्रने सांगितले की, मराठी चित्रपटसृष्टीत आज वेगवगेळे प्रयोग होत आहेत. आपण कल्पकतेच्या बाबतीत कुठेही मागे नाही. मायबाप रसिक प्रेक्षकालाही नवे काहीतरी दिले तर तो त्या कलाकृतीचे भरभरून स्वागत करतो. त्याच्या अनुषंगानेच चित्रपटातील एक गाणे पाण्याखाली चित्रीत केले. त्यासाठी पूर्ण टीमने मेहनत घेतली आहे. त्यामुळे चित्रपटाचे प्रमोशनही वेगळ्या पद्धतीने करीत आम्ही रसिकांसमोर चित्रपट आणत आहोत. येत्या 24 फेब्रुवारीला चित्रपट पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.  

यावेळी अभिनेता देवेंद्र यांच्यासह रूपाली कृष्णराव, प्राची, दिग्दर्शक जगदीश वाठारकर, निर्माते उत्तम चोरडे आदी उपस्थित होते.