फेणेच्या अचाट कामगिरीची स्मार्ट गोष्ट

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

चित्रपटाच्या सर्वच विभागांनी चोख काम केलंय. छायांकन, पार्श्वसंगीत, अभिनय, कलादिग्दर्शन आदींनी योग्य योगदान दिल्याने तांत्रिक बाजू भक्कम झाल्या आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो अमेय वाघचा. कारण प्रत्येकाच्या मनात फास्टर फेणे आहे. आता वयाने मोठा झालेला फास्टर फेणे वठवणे हे तसं आव्हान होतं, पण  अमेय वाघचं काम अफलातून झालंय. गिरीश कुलकर्णी यांचा व्हीलनही स्टाईलबाज झालाय. या चित्रपटाची भट्टी उत्तम जमलीय. अबालवृद्धांनी पाहावा असा हा चित्रपट बनला आहे. म्हणूनच ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स. 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून फास्टर फेणेची उत्सुकता होती. भा.रा. भागवत यांच्या फेणेने अनेक पिढ्यांचं मनोरंजन केलं. पण अलिकडच्या पिढ्यांना मात्र तो फारसा माहीत नाही आदित्य सरपोतदार दिग्दर्शित फास्टर फेणेमुळे या फेणेला पुन्हा ग्लॅमर येईल. हा फास्टर फेणे वयाने मोठा आहे. स्मार्ट आहे. आजच्या सर्व साधनांचा, इंटरनेटचा, मोबाईलचा योग्य वापर करुन ही गोष्ट गुंफण्यात आली आहे. ती थरारक तर आहेच. शिवाय अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हा फेणे जाता जाता स्पर्श करून जातो. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत 4 चीअर्स. 

फास्टर फेणेचा लाईव्ह रिव्ह्यू.. 

आदित्य सरपोतदारने यापूर्वी बनवलेल्या नारबाची वाडी या चित्रपटाचीही जोरदार चर्चा होती. त्यानंतर हा दिग्दर्शक नवं काय घेऊन येतो याकडे लोकांचं लक्ष लागलं होतं. भा.रा.भागवतांची जन्माला घातलेल्या फास्टर फेणेला त्याने पडद्यावर आणायचं ठरवलं. त्याला साथ दिली ती लेखक क्षितीज पटवर्धनने. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद त्याचे आहेत. फेणेला पडद्यावर आणायचं तर त्यासाठी आवश्यक असणारी थरारक गोष्ट हा त्याचा यूएसपी आहे. तो लक्षात घेऊन मेडिकलच्या विश्वात होणाऱ्या काॅप्यांना आणि बोगस परीक्षार्थींना समोर ठेवून गोष्ट रचण्यात आली. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर ते सहज लक्षात येतं. फास्टर फेणे अर्थात बनेश भिडे हा मेडिकलची प्रवेश परीक्षा देतो आहे. त्यावेळी त्याला एक विद्यार्थी भेटतो. 200 पैकी त्याला 197 गुण पाडायचे आहेत. अन पेपर संपता संपता अचानक या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची बातमी पसरते. चाणाक्ष फेणेला यात काहीतरी काळंबेरं असल्याचं लक्षात येतं. मग पुढे तो या प्रकरणाचा कसा छडा लावतो त्याची ही गोष्ट आहे. 