बॉक्‍सिंगच्या राजकारणात फुललेली लव्ह स्टोरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जानेवारी 2018

मुक्काबाज 

मुक्काबाज 

विविध खेळांवर आधारित बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट आलेले आहेत. त्यातील काही चित्रपट यशस्वी ठरले आहेत; तर काही अपयशी. "मुक्काबाज' हा चित्रपट बॉक्‍सिंग या खेळाभोवतीच फिरणारा आहे. पण केवळ बॉक्‍सिंग एके बॉक्‍सिंग असे न दाखविता हा चित्रपट मनोरंजक कसा होईल, याचाही विचार दिग्दर्शक अनुराग कश्‍यपने केला आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात बरेलीतून होते. श्रवण सिंग (विनीतकुमार सिंग) हा आपल्या भावासह बरेलीतील एका छोट्या गल्लीत राहत असतो. बॉक्‍सिंगमध्ये नाव कमावण्याचे त्याचे स्वप्न असते. त्या दृष्टीने तो तयारी करत असतो. भगवानदास मिश्रा (जिमी शेरगिल) हे याच शहरातील एक बडे प्रस्थ. मूळचे ते बॉक्‍सर असतात आणि बरेलीतीतील बॉक्‍सिंग फेडरेशनची सर्व सूत्रे त्यांच्याकडेच असतात. श्रवण सिंग त्यांना भेटतो. परंतु ते खासगी कामात त्याला अधिक गुंतवून ठेवतात. 

श्रवणला ही गोष्ट अजिबात मान्य नसते. त्यावरून भगवानदास आणि श्रवण सिंग यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण होते. साहजिकच श्रवणला बरेलीचा नंबर वन बॉक्‍सर न बनवण्याचा ते निर्णय घेतात. त्यातच त्यांची भाची सुनयना (जोया हुसैन) आणि श्रवण सिंग यांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलतो. सुनयना ही मूकबधिर असते. तिचेही श्रवण सिंगवर प्रेम असते. 

मात्र भगवानदास तिचे लग्न दुसऱ्याच मुलाशी लावण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडत चित्रपट पुढे सरकत जातो. खरे तर श्रवण सिंग हा नंबर वनचाच बॉक्‍सर असतो. परंतु भगवानदादा त्याच्या मार्गात अडथळे आणत असतात. मग त्यावर तो कशी मात करतो... त्याचे प्रेम सफल होते का... वगैरे प्रश्‍नांची उत्तरे या चित्रपटात आहेत. विनीतने खूप मेहनत घेतली आणि त्याची ती मेहनत नक्कीच पडद्यावर जाणवते. बॉक्‍सर बनण्याचे स्वप्न आणि एक हळवा प्रेमी असे भूमिकेचे दुहेरी बेअरिंग त्याने छान पकडले आहे. जिमी शेरगिलने भगवानदास मिश्राच्या नकारात्मक भूमिकेत चांगलेच रंग भरले आहेत. त्याची आणि रवीकिशनची भूमिका ठसकेबाज आहे. जोयानेही छान भूमिका वठवली आहे. 

अनुराग कश्‍यपने जातीयवादावरही या चित्रपटात भाष्य केले आहे. अन्य कलाकारांनीही आपापल्या भूमिका चोख पार पाडलेल्या आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशातील बरेली, बनारस आणि अलीगड या शहरांची सफर घडवतो. सिनेमॅटोग्राफरने आपल्या कॅमेऱ्यात या शहरांतील छोट्या-छोट्या गोष्टी छान टिपल्या आहेत. मात्र चित्रपटाची लांबी खूप आहे. ती काही अंशी कमी करता आली असती. कारण काही दृश्‍ये अति ताणलेली आहेत. एडिटिंगच्या वेळी त्याचा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे उत्तरार्धात चित्रपट कंटाळवाणा वाटतो. विषय बॉक्‍सिंगचा असताना श्रवण आणि सुनयना यांच्या प्रेमकहाणीवर अधिक भर देण्यात आला आहे. खेळाडू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एखाद्या तरुणाला कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते... राजनैतिक गोष्टींचा कशा प्रकारे सामना करावा लागतो, हेच हा चित्रपट दर्शवतो. 

 

Web Title: Mukkabaaz Movie Review