सेन्सॉर बोर्डाच्या कामात ढवळाढवळ नाही : सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण 

शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले, 'चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तुम्हाला जर काही तक्रार असेल, तर तुम्ही चित्रपट प्रमाणपत्र विभागाकडे जा. सर्वोच्च न्यायालय हे काही सेन्साॅर बोर्ड नाही. चित्रपट प्रदर्शित करावा वा न करावा याबाबत अंतिम निर्णय सीबीएफसी बोर्डच घेईल. त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही.'

पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन रोखणाऱी याचिका फेटाळली 

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून पद्मावती या चित्रपटाबाबत वाद झडताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी याबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आपले सर्व दान सीबीएफसी अर्थात सेंट्रल बोर्ड फाॅर फिल्म सर्टिफिकेशन यांच्या पदरात टाकले आहे. चित्रपट प्रदर्शित करण्याचा वा न करण्याचा अंतिम निर्णय सेन्साॅर बोर्डाकडेच असेल. त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही असे थेट स्पष्टीकरण आज सर्वोच्च न्यायलयाने दिले. 

याची सुनावणी करताना न्यायालयाने याचिकाकर्त्याला सांगितले, 'चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत तुम्हाला जर काही तक्रार असेल, तर तुम्ही चित्रपट प्रमाणपत्र विभागाकडे जा. सर्वोच्च न्यायालय हे काही सेन्साॅर बोर्ड नाही. चित्रपट प्रदर्शित करावा वा न करावा याबाबत अंतिम निर्णय सीबीएफसी बोर्डच घेईल. त्यात आम्ही ढवळाढवळ करणार नाही.'

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन वाद निर्माण झाला होता. राणी पद्मिनी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. राणी पद्मिनी व्यक्ती होती की ती केवळ साहित्यातील एक दंतकथा याबाबत संभ्रम आहे. म्हणूनच या विषयावरून दोन गट तयार झालेले दिसतात. या चित्रपटात राणी पद्मिनी आणि शासक अल्लाउद्दीन खिलजी यांच्यात प्रेमसंबंध दाखवण्यात आल्याचे आरोपही होत आहेत. या चित्रपटाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण  करण्यात आले असून, सामान्यजनांच्या भावना दुखावल्याचा ठपकाही काही संस्थांनी ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायलयाने दिलेला हा निर्णय महत्वाचा मानलाा जातो. 

 

 

 

Web Title: padmavati movie hindi cbfc esakal news