ई सकाळ स्पेशल: छोट्या पडद्याचा प्राईम टाईम सरकतोय दुपारच्या दिशेने

टीम ई सकाळ
सोमवार, 24 जुलै 2017

टीव्ही वरचा प्राईम टाईम आता संध्याकाळकडून दुपारकडे सरकू लागला आहे. संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झालेला मालिकांचा सिलसिला 11 पर्यंत चालू असतो. आता त्यासह दुपाारीही नव्या मालिका येऊ लागल्या आहेत. 

पुणे: गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्याची गणिते सातत्याने बदलत असताना दिसत आहेत. मराठी, हिंदी चित्रपट, नाटक, क्रिकेट सामने यातून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न चालू असतात. त्यातलाच एक भाग म्हणून आता मराठी टिव्ही सृष्टीचा प्राईम टाईम संध्याकाळकडून पुन्हा दुपारकडे सरकू लागला आहे. झी मराठीने आता आपली नवी मालिका जाडूबाई जोरातची वेळ दुपारी 1 ची ठेवल्याने साधारण पंचवीस पर्षांपूर्वी असलेले दुपारच्या मालिकांचे युग पुन्हा अवतरणार असे दिसते आहे. 

फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी हिंदी मालिका लागायच्या यात शांती, स्वाभिमान अशा मालिकांचा समावेश होतो. याच मालिकेतून मंदिरा बेदी, यतिन कार्येकर, आशुतोष राणा, रोहित राॅय ही मंडळी आली. त्यानंतर मराठीतही दामिनी ही मालिका लागत होती. तिची वेळ दुपारी 4 च्या दरम्यान होती. त्यानंतर  संध्याकाळचा प्राईम टाईम सुरू झाला. संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून सुरू झालेल्या मालिका रात्री 11 पर्यंत चालू लागल्या. रात्रीस खेळ चाले या मालिकेने साडेदहाचा स्लाॅट ओपन केला. यानंतर झी मराठीने आता पुन्हा दुपारकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोबत स्टार प्लसनेही स्टार दोपहरच्या नावाखाली मालिका आणल्या आहेत. झी मराठीने दुपारचा स्लाॅट महिलावर्गाला डोळ्यासमोर ठेवून आणला आहे,यात शंका नाही. 

याबद्दल बोलताना चॅनलचा कार्यकाारी निर्माता म्हणाला, 'झी मराठीने नेहमीच रसिकांची पसंती ओळखून मालिका दिल्या. आता दुपारी घरी असणारा मोठा महिलावर्ग आहे. त्यांना डोळ्यासममोर ठेवून काहीतरी आणावे असे बरेच दिवस चालू होते. अखेर ही मालिका आम्ही आणली. महिलांनी ही मालिका नक्की आवडेल. इतकेच नव्हे, तर आता इतर चॅनल्सही दुपारी आपल्या मालिका आणतील.'

ही मालिका महिलावर्ग डोळ्यासमोर ठेवूनच

बऱ्याच दिवसांनी मी पुन्हा छोट्या पडद्यावर दिसते आहे. दुपारी घरी असलेल्या महिलांसाठी ही मालिका आहे. बऱ्याच दिवसांनी दुपारचा स्लाॅट पुन्हा सुरू झाला आहे. रसिकांना हा स्लाॅट आवडेल याची खात्री वाटते. : निर्मिती सावंत, अभिनेत्री