बॉलीवूडमध्येही आहे हार्वे वेन्स्टाईन: प्रियांका चोप्रा

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

हार्वेने फक्त हॉलिवूडमधील अभिनेत्रींनाच लक्ष्य केले नाही तर त्याची वाईट नजर ऐश्वर्या रायवरही होती. त्याला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते.

मुंबई : हॉलीवूड निर्माता हार्वे वेन्स्टाइनवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून त्याच्या विरोधात हॉलीवूडमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नुकताच एका कार्यक्रमात अभिनेत्री प्रियांका चोप्राला भारतातही हार्वे वेन्स्टाइन आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, फक्त एकच हार्वे वेन्स्टाइन नाहीये. असे हार्वे सगळीकडेच आहेत. 

मला नाही वाटत भारतात फक्त एकच हार्वे आहे किंवा हॉलीवूडमध्ये फक्त हाच एक हार्वे आहे. प्रत्येक ठिकाणी अशी माणसं आहेत, जे महिलांकडून त्यांची शक्ती काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या क्षेत्रात पुरुषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल असे महिलांना वाटते किंवा यांना दुखावले तर ते आपल्याला वाळीत टाकतील अशी मनात भीती असते. आपण एकटे पडू यासाठी महिला घाबरतात. आतापर्यंत प्रियांका चोप्रासह अँजेलिना जोली, जेनिफर लॉरेन्स, रीझ विदरस्पून, ग्वेनेथ पॅल्ट्रो या अभिनेत्रींनीही हार्वे वेन्स्टाइनबद्दल आपले मत मांडले आहे. 

हार्वेने फक्त हॉलिवूडमधील अभिनेत्रींनाच लक्ष्य केले नाही तर त्याची वाईट नजर ऐश्वर्या रायवरही होती. त्याला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते. ऐश्वर्याची आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक सिमोन शेफील्ड म्हणाली, "प्राइड ऍण्ड प्रिज्युडाइस' या सिनेमाबाबत चर्चा करण्यासाठी हार्वेला ऐश्वर्याला एकांतात भेटायचे होते. तिला एकटं भेटण्यासाठी काय करता येईल, असा प्रश्नही त्याने विचारला. पण मी त्याला असे होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे बजावले होते. त्यानंतर ऐश्वर्या आणि हार्वे यांच्यात अनेक भेटी झाल्या. त्या प्रत्येक भेटीत तो तिला एकांतात भेटण्याचे शर्थीचे प्रयत्न करायचा.