आळंदीच्या सांप्रदायिक 'बॉईज'चा झेंडा फडकला चित्रपटसृष्टीत

विलास काटे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

आता बॉईजच्या माध्यमातून आळंदीतील आणखी दोन कौस्तुभ आणि जनार्दन हे दोन संप्रदायिक बॉईज मराठी चित्रपटात चमकू लागले आहेत.

आळंदी : चित्रपट गृहातून सुरू असलेल्या बॉईज या मराठी चित्रपटातील आम्ही लग्नाळू हे गाणे सध्या जोरदार गाजत आहे. तरुणाईची पाऊले या गाण्यावर चित्रपटगृहात आणि कार्यक्रमांत थिरकताना पाहायला मिळत आहेत. मात्र हे गाणं कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंडाळकर या गायकांनी गायलं असून दोघेही वारकरी संप्रदायातील आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा आळंदीच्या सांप्रदायिक बॉईजचा झेंडा मराठी चित्रपटसृष्टीत फडकला आहे.

हॉस्टेलमध्ये राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित बॉईज हा मराठी चित्रपट सध्या गाजत आहे. यातील आम्ही लग्नाळू हे गाणे तर तुफान गाजत आहे. ऐन गणेशोत्सव काळात या गाण्याने सध्या धमाल केली. तरुणाईची पावले केवळ चित्रपटगृहातच नाहीत तर रस्त्यावरही थिरकू लागली. या गाण्याने अवघ्या तरुणाईला सध्या वेड लावले आहे. आळंदीतील सारेगम फेम महागायिका कार्तिकी गायकवाड हीचा भाउ कौस्तुभ आणि जनार्दन खंडाळकर या दोघांनी हे गाणे गायले आहे. यामुळे आळंदीतील वारकरी संप्रदायातील गायकवाड कुटूंब मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पुढे आले आहे. वडिल पंडित कल्याण गायकवाड आणि बहिण कार्तिकी हीचा वारसा सांभाळात कौस्तुभने गायन क्षेत्रात उडी घेतली. तो वडिलांकडेच गाणे शिकला.

यापूर्वी कौस्तुभने कलर्स मराठीवरिल २०१२ ला गौरव महाराष्ट्राचा या रिअॅलिटी शोमध्ये पहिला आला होता. अवघ्या सतरा वर्षिय कौस्तुभला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटासाठी गायनाची संधी बॉईज चित्रपटाच्या माध्यमातून दिली. खरे तर लोकगिताच्या ढंगावर आधारित या गाण्यासाठी अवधूतला सोळा वर्षाचाच गायक हवा होता आणि त्यांच्या नजरेसमोर कौस्तुभ आला. कौस्तुभसोबत आळंदीतील संप्रदायातील आणखी एक जनार्दन खंडाळकर यालाही या गाण्यात गाण्याची संधी मिळाली आहे. खंडाळकर हा पंडित रघूनाथ खंडाळकर यांचा पुतण्या असून सध्या आळंदीतच गायनाचे धडे घेत आहे.

कौस्तुभला बॉईज चित्रपटामुळे ओळख निर्माण झाली आहे. आता बॉईजच्या निमित्ताने ट्यूनिंग जुळल्याने अवधूत गुप्तेंच्याच आणखी एका शॉर्ट फिल्ममध्ये त्याला गायनाची संधी मिळाली आहे. आम्ही लग्नाळू या गाण्याबदद्ल बोलताना कौस्तुभ ने सांगितले की, या गाण्यातील शब्दरचना थोडी वेगळी आहे. संपूर्ण गाण्यामध्ये यमक जुळविताना तब्बल चौदा वेळा ळू हा शब्द वापरण्यात आला. सुरूवातील गाण्याचे बोल ऐकून हसायला आले. माझ्यासारख्या शाळकरी विद्यार्थ्यासाठी हे शब्द विचित्र आणि नवे होते. मात्र अवधूतदादा बरोबर काम करताना एकदम रिलॅस्क झालो. चित्रपटगृहातच तरुणाई गाण्यावर नाचताना पाहून आनंद वाटला. दरम्यान यापूर्वी आळंदीतील वारकरी संप्रदायातील गायकांना चित्रपटात गायनाची संधी मिळाली होती.

झेंडा चित्रपटात अवधूत गुप्तेंनी ज्ञानेश्वर मेश्रामला संधी दिली होती. तर कार्तिकी गायकवाडनेही जहर खाऊ नका आणि मैत्री या मराठी चित्रपटात गाणे गायले आहे. याशिवाय दोन मराठी नाटकातूनही पार्श्वगायन केले होते. टॉलिबूडमधिल प्रसिद्ध गायिका शुभा मुदगलने अवधूत गांधीला तिच्या अल्बमध्ये गायनाची संधी दिली होती. आता बॉईजच्या माध्यमातून आळंदीतील आणखी दोन कौस्तुभ आणि जनार्दन हे दोन संप्रदायिक बॉईज मराठी चित्रपटात चमकू लागले आहेत.

Web Title: pune marathi entertainment news boys songs kaustubh gaikwad