3 चीअर्स; ई सकाळ Review #Live बंदूक्या: अस्वस्थ जगण्याचा उभा छेद

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

राहुल चौधरी यांनी पहिल्याच दिग्दर्शनात आपली चुणूक दाखवली आहे. वरवर ही त्रिकोणी प्रेमकथा वाटत असली तरी त्या कथेचा जीव तेवढ्यापुरता नाही. पालावर जगणाऱ्या समाजााचं जीणं, त्यांचे रोजच्या जगण्याचे प्रश्न इथे मांडलेले दिसतातच. पण त्या अडचणींना कवटाळून न बसता त्यातूनही जगण्याच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न या चित्रपटात सातत्याने दिसतो. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत थ्री चीअर्स. 

पुणे : शहरी किंवा ग्रामीण जगणं सातत्याने मराठी चित्रपटात मांडलं गेलं आहे. त्यानुसार त्या त्या भागातले लोकांचे प्रश्न, त्या लोकांच्या गरजा, त्यांची मानसिकता सिनेमातून दिसली आहे. पण आजही अशा अनेक जाती वा समाज आहेत, ज्यांचं जीणं आपल्या नजरेत नाही. किंबहुना त्यांना कोणत्याही प्रकारची मान्यताच नसल्याने त्यांचे अस्तित्वच आपल्याला दिसत नाही. अशाच पालावर जगणाऱ्या भटक्या समाजाचं अस्वस्थ जगणं घेऊन दिग्दर्शक राहुल चौधरी आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. बंदूक्या हा चित्रपट अशा समाजाचं जगणं दाखवतो. त्यांची मानसिकता मांडतो. पण त्याला कुरवाळत बसत नाही. तर त्यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकवून जातो. या प्रामाणिक प्रयत्नाला ई सकाळच्या लाईव्ह रिव्ह्यूने दिले 3 चीअर्स. 

बंदूक्या Review #Live

ही गोष्ट अवल्या, बंदूक्या आणि तोलक यांची आहे. अवल्या आणि तोलकचं एकमेकांवर प्रेम आहे. त्याचवेळी बंदूक्याचाही तोलकवर डोळा आहे. नेहमीच्या चोऱ्या माऱ्या करून न जगता कष्टाने पैसे कमावून जगण्याचं अवल्याचं स्वप्न आहे. तोलकलाही ते पटतं. अवल्याच्या आईने आग्रहाने तोलकच्या वडिलांना सांगून या दोघांचं लग्न लावून दिलं आहे. या लग्नात अवल्याच्या आईने तोलकच्या बापाला पाच हजार रूपये द्यायचे कबूल केले आहेत. पण अद्याप ते पैसे दिेलेले नाहीत. अशातच एका घटनेत अवल्याच्या आईचा मृत्यू होतो. पैसे देण्याची जबाबदारी अवल्यावर येते. पण आता तातडीने हे पैसे तोलकच्या बापाला हवेत. ते न दिल्याने त्याने जात पंचायत बोलावली आहे. बंदूक्याने तोलकला गहाण ठेवून अवल्याला पैसे द्यायचा निर्णय पंचायत सुनावते. आता तोलकला सोडवण्यासाठी अवल्याची धडपड सुरू होते. यात अवल्या तोलक आणि बंदूक्याभवती सिनेमा फिरत जातो. 

राहुल चौधरी यांचा हा पहिलाच चित्रपट. पण अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शशांक शेंडे आणि अतिषा नाईक हे कलाकार सोडले तर यात सर्व नवखे कलाकार आहेत. त्यांच्याकडूनही दिग्दर्शकाने चांगलं काम काढून घेतलं आहे. बंदूक्याची व्यक्तिरेखा साकारणारे या चित्रपटाचे पटकथालेखक नामदेव मुरकुटे यांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. यासह निलेश बोरसे यांनीही अवल्या चांगला साकारला आहे.

चांगली कथा, नेटके संवाद असल्यामुळे सिनेमावरची पकड सुटत नाही. परंतु, पटकथा अत्यंत हळूवार रितीने पुढे जात असल्यामुळे हा कधीमधी रेंगाळतो. यातले कलाकार नवे असल्यामुळे असेल कदाचित, पण कलाकारांच्या अॅक्शन रिअॅक्शनला प्रमाणापेक्षा जास्त लागणारा वेळ सिनेमाचा वेग आणखी कमी करतो.

तुलनेने संगीत, पार्श्वसंगीत, सिनेमेटोग्राफी, कालदिग्दर्शन आदी पातळ्यांवर घेतलेली नेटकी मेहनत दिसते. या प्रयत्नालाच ई सकाळने दिले 3 चीअर्स. भटकं जगणं नशिबी आलेल्या समाजाचं हे प्रतिबिंब एकदा पहायला हरकत नाही.   

Web Title: Review Live Bandookya by Soumitra Pote esakal