'सुबक'च्या 'हर्बेरिअम 2'ची सुरूवात होणार 'पती गेले गं काठेवाडी' नाटकाने

टीम ई सकाळ
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

अभिनेता सुनील बर्वे यांनी काही वर्षांपूर्वी हर्बेरिअम ही संकल्पना आणली आणि तमाम नाट्यप्रेमींनी त्याला डोक्यावर घेतलं. जुनी नाटकं नव्याने सादर करताना मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकार घेऊन ते नाटक सादर केलं जायचं. सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, आंधळं दळतंय, हमीदाबाईची कोठी, झोपी गेलेला जागा झाला या पाच नाटकांचं सादरीकरण यात झालं. आता याच हर्बेरिअमचं दुसरं पर्व बर्वे आणत असून त्याची घोषणा आज संध्याकाळी होणार आहे.

पुणे: अभिनेता सुनील बर्वे यांनी काही वर्षांपूर्वी हर्बेरिअम ही संकल्पना आणली आणि तमाम नाट्यप्रेमींनी त्याला डोक्यावर घेतलं. जुनी नाटकं नव्याने सादर करताना मराठी मनोरंजनसृष्टीतील मान्यवर कलाकार घेऊन ते नाटक सादर केलं जायचं. सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, आंधळं दळतंय, हमीदाबाईची कोठी, झोपी गेलेला जागा झाला या पाच नाटकांचं सादरीकरण यात झालं. आता याच हर्बेरिअमचं दुसरं पर्व बर्वे आणत असून त्याची घोषणा आज संध्याकाळी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याची सुरूवात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे दिग्दर्शित करत असलेल्या नाटकाने होणार आहे. पती गेले गं काठेवाडी या नाटकाने या नव्या पर्वाची सुरुवात होईल. या पर्वातही पाच नाटकं असणार आहेत. मात्र ती टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असल्याची चर्चा सध्या नाट्यवर्तुळात आहे. 

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार या नाटकात नव्या दमाची कलाकारांची फळी काम करते आहे. यात ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले आणि जय मल्हारमधून घराघरांत पोचलेली बानू ईशा केसकर रंगमंचावर दिसणार आहेत. याबाबत अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे. 

हर्बेरिअमच्या पहिल्या पर्वात प्रतिमा कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, केदार शिंदे, मंगेश कदम या दिग्दर्शकांचा समावेश होता. सुरुवातीला यात दिग्दर्शक गिरीश जोशी हे नाटक बसवणार होते. परंतु पत्नी रसिका जोशी य़ांच्या अकाली निधनामुळे जी जबाबदारी केदार शिंदे यांनी स्वीकारली. त्यामुळे या दुसऱ्या पर्वात गिरीश जोशी आपलं आव़डतं नाटक सादर करतील अशी आशा केली जात आहे.