सिनेमातला उपेंद्र!

तेजल गावडे
गुरुवार, 23 मार्च 2017

हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि सिनेमातला हा उपेंद्र! कसा आहे त्याचा सिनेमा? 

हिंदी व मराठी चित्रपटांसह नाटक व मालिकांमध्ये सशक्‍त भूमिका साकारणारा अभिनेता उपेंद्र लिमये जश पिक्‍चर्स प्रस्तुत आणि शशिकांत चौधरी व जयश्री चौधरी निर्मित "नगरसेवक' चित्रपटात तडफदार तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिल्लीत नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि सिनेमातला हा उपेंद्र! कसा आहे त्याचा सिनेमा? 

"नगरसेवक' चित्रपटाबद्दल... 
"नगरसेवक' हा मनोरंजनाने परिपूर्ण असा चित्रपट आहे. माझा ऑफबीट किंवा प्रायोगिक चित्रपटांकडे जास्त कल असतो. मला वाटतं की मी व्यावसायिक अभिनेता आहे आणि सर्व प्रकारचे चित्रपट योग्य पद्धतीने करू शकतो. एकेदिवशी मला अभिनेता सयाजी शिंदेचा फोन आला. ते म्हणाले एक कमर्शियल चित्रपट आहे व मी त्यात काम करतो आहे. मला माहीत आहे की तू अशा प्रकारचे चित्रपट करत नाहीस. माझ्या अपोझिटच्या भूमिकेसाठी तू हवा आहेस. तर, आपण हा चित्रपट करूयात. मधल्या काळात "जोगवा', "धग' व "तुह्या धर्म कोंचा' अशा प्रकारचे मी चित्रपट केले. त्यातून मी अभिनेता कमी चळवळीतला माणूस जास्त वाटलो. "प्यारवाली लव्ह स्टोरी'सारखा कमर्शियल चित्रपट व हिंदी चित्रपट मी केले आहेत. "नगरसेवक' हा पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट आहे. दमदार गाणी, आयटम सॉंग, दमदार ऍक्‍शन, प्रेमकथा, उत्तम लोकेशन, कॉमेडी अशा सर्व गोष्टींचा समावेश असणारा हा चित्रपट आहे. 

"नगरसेवक'मधील भूमिका... 
"नगरसेवक'मध्ये मी मल्हार शिंदे या तडफदार तरुणाची भूमिका साकारतोय. त्याला अन्याय व अत्याचाराची प्रचंड चीड आहे. त्याविरोधात आवाज उठविणारा हा युवक आहे. व्यवस्थेतील चुकीच्या गोष्टींविरोधात लढताना तो दिसणार आहे. 

प्रेमकथा... 
या चित्रपटाचं नाव "नगरसेवक' असलं तरी लव्ह स्टोरीही पाहायला मिळणार आहे. ही लव्ह स्टोरी माझ्यात व अभिनेत्री नेहा पेंडसेमध्ये रंगताना दिसणार आहे. मी नेहासोबत पहिल्यांदाच काम केलं आहे. चित्रपटात आमची केमिस्ट्री उत्तम जुळली आहे. 

दमदार ऍक्‍शन... 
"नगरसेवक'मध्ये दाक्षिणात्य चित्रपटांसारखे ऍक्‍शन सीन पाहायला मिळणार आहेत. यात मी भरपूर ऍक्‍शन सीन्स केलेत. मराठी चित्रपटात मी पहिल्यांदाच अशा प्रकारे ऍक्‍शन केलीय. 

भूमिकेच्या तयारीबाबत... 
भूमिकेची तयारी करण्यासाठी आशय खूप महत्त्वाचा असतो. कलाकाराला योग्य दिशा दाखवण्याचं काम दिग्दर्शक करत असतो. नशिबाने मला हिंदी व मराठीत खूप चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मराठीत डॉ. जब्बार पटेल, अमोल पालेकर, राजीव पाटील, महेश लिमये आणि हिंदीत रामगोपाल वर्मा, मधुर भांडारकर या दिग्दर्शकांसोबत मी काम केलं; पण दर वेळेला मला चांगलेच दिग्दर्शक मिळतील असं नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत तो निर्माता होऊ शकतो. टेलिव्हिजनवर व्यावसायिकता आहे. चांगली प्रॉडक्‍शन टीम आहे. त्यामुळे मी साडेनऊ वर्षांनंतर स्टार प्रवाहवरील "नकुशी' मालिकेत काम करतो आहे. अव्यावसायिक लोकांबरोबर काम करणं खूपच कठीण जातं. त्यामुळे शक्‍यतो टाळतो; पण प्रत्येक वेळेस तसं होईलच असं नाही. मला वर्षाला बारा-तेरा चित्रपटांच्या ऑफर येत असतील तरी मी तीन-चार ऑफर स्वीकारतो. 

आव्हान स्वीकारण्याबाबत... 
मी गंभीर भूमिका खूप चांगल्याप्रकारे करत असेन तर मला मसालेदार चित्रपटातील रोलदेखील तितक्‍याच चांगल्याप्रकारे करता आला पाहिजे. हे कलाकार म्हणून आव्हान स्वीकारायला पाहिजे. मी स्वत:ला नशीबवान समजतो की, मी अशा प्रोफेशनमध्ये आहे जिथे नेहमी वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. ज्या क्षणी कलाकार म्हणून मला सगळं येतं असं म्हणेन त्याच क्षणी व्हीआरएस घ्यायला हरकत नाही असं मी म्हणेन. 

आगामी प्रोजेक्‍ट... 
विठाबाई नारायणगावकर यांच्यावरील चरित्रपट, यशराज फिल्म्सचा "बॅंकचोर', आदित्य क्रिपलानीने "टिकली ऍण्ड लक्ष्मी बॉम्ब' पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकावर तो चित्रपट करतो आहे. त्याचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. "शेंटिमेंटल' नावाचा मराठी चित्रपट करतो आहे. या चित्रपटात रघुवीर यादव, अशोक सराफ व मी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. "सूरसपाटा', "क्षितिज' हे माझे आगामी मराठी प्रोजेक्‍ट आहेत. त्याशिवाय काही हिंदी चित्रपटही करतो आहे. 

Web Title: upendra limaye interview