ऐसी "धाकड' है...(नवा चित्रपट : दंगल)

Dangal
Dangal

"दंगल' हा आमीर खानची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील आणखी एक मैलाच दगड ठरावा. अतिशय नेटकं कथानक, बांधीव पटकथा, दिग्दर्शक नीतेश तिवारी यांनी मांडणीसाठी घेतलेले कष्ट, संघर्षाला दिलेले अनेक आयाम, संगीत, छायाचित्रण आणि अभिनय या सर्व आघाड्यांवर चित्रपट एक नंबर आहे. कुस्तीसारख्या पुरुषी खेळात नाव कमावलेल्या मुलींचा संघर्ष मांडणारी ही कथा चित्रपटातील गाण्याप्रमाणेच जोरदार, "धाकड' आहे...


"दंगल' हा चित्रपट महावीर फोगाट (आमीर खान) या हरियानातील खेड्यात राहणाऱ्या व कुस्तीमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या खेळाडूची ही सत्यकथा मांडतो. महावीरला खंत आहे आपल्या कारकिर्दीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक न मिळवू शकल्याची. ही कमतरता त्याला आपल्या मुलांकडून पूर्ण करायची आहे. मात्र, सगळ्या मुलीच झाल्यानं तो निराश होतो. गीता (फातिमा साना शेख) व बबिता (सान्या मल्होत्रा) या आपल्या दोन मुलींमध्ये हे गुण असल्याचं त्याला "अपघातानंच' समजतं आणि सुरू होतो एक जबरदस्त "आखाडा'. मेहनतीच्या जोडीला अवहेलना, टवाळी, मानहानी स्वीकारत या मुली आणि त्यांचा जिद्दी बाप वाटचाल करीत राहतात. गीताला कुस्तीचा अनुभव मिळावा म्हणून महावीर तिला कुस्तीच्या दंगलीमध्ये मुलांविरुद्ध लढवतो. गीता वेगानं प्रगती करीत राष्ट्रीय स्तरावर चमकते व पदक मिळवते. मात्र, महावीरची इच्छा तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवावं अशी असते. त्यासाठी ती पतियाळामधील अकादमीमध्ये दाखल होते. गीताचा नवा प्रशिक्षक (गिरीश कुलकर्णी) तिच्या खेळण्यात आधुनिकता आणू पाहतो, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या वाट्याला अपयश येऊ लागतं. बबिताची प्रगती होत असली, तर गीताच्या अपयशानं महावीर खचतो आणि एक निर्णय घेतो...महावीरच्या प्रयत्नांना यश येतं का, नव्या प्रशिक्षकाशी त्याचा संघर्ष कोणतं स्वरूप धारण करतो, गीता पदक जिंकते का आदी प्रश्‍नांची उत्कंठावर्धक आणि हेलावून टाकणारी उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात.


सत्यघटनेवरून प्रेरित असलेली चित्रपटाची कथा अतिशय नेटकी असून, बांधीव पटकथेमुळं चित्रपट कुठंही रखडत नाही. दिग्दर्शकानं केलेली प्रसंगांची योग्य निवड व त्यांना दिलेला भावनेचा ओलावा यांमुळं प्रेक्षक गुंतून राहतो. कथेमध्ये संघर्षाचे अनेक पैलू असून, मुलीच्या जन्मापासून खेळाच्या प्रशिक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे कथेच्या ओघात येतात. हा संघर्ष दिग्दर्शकानं अत्यंत टोकदारपणे मांडला आहे. (यातील मुलगी आणि बापातील कुस्तीच्या तंत्राहून झालेल्या संघर्षाचा प्रसंग आजपर्यंत पाहिलेला सर्वाधिक हेलावून टाकणार प्रसंग ठरावा. हॅट्‌स ऑफ अर्थात आमीर.) प्रेक्षकांना कुस्तीतील थरार अनुभवता येण्यासाठी सर्व नियम अत्यंत सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्यात आले आहेत. सामन्याचं चित्रण व तांत्रिक गोष्टींवर विशेष कष्ट घेतल्याचं दिसून येतं. संवाद आणि संगीत याही चित्रपटाच्या जेमच्या बाजू आहेत. "ऐसी धाकड है' आणि "बापू सेहद के लिए तू तो हानिकारक है' ही गाणी ठेका धरायला लावतात. शेवटच्या भागात कथेत आलेला थोडा फिल्मीपणा ही त्रुटी सोडल्यास सर्वच गोष्टी जुळून आल्या आहेत.


कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची सर्वांत मोठी जमेची बाजू असून, आमीर खाननं महावीरच्या भूमिकेत कमाल केली आहे. वयाप्रमाणं बदलत जाणारी देहयष्टी आणि देहबोली केवळ हा कलाकारच साकारू शकतो! मुलींवर जिवापाड प्रेम करणारा मात्र आपलं स्वप्न साकार होऊ शकणार नाही म्हणून निराश झालेला बाप व नंतर मुलींमध्येच आपलं स्वप्न पाहात मेहनत घेणारा प्रशिक्षक त्यानं जबरदस्त साकारला आहे. महावीरचे तरुणपणातील कुस्तीचे प्रसंग (सिक्‍सपॅक ऍब्ज) ते उतारवयात वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट हा प्रवास साकारण्याचं मोठं आव्हान त्यानं लीलया पेललं आहे. भावुक प्रसंगांतील आमीरचा अभिनय केवळ वस्तुपाठच ठरवा. फातिमा साना शेखनं गीताच्या भूमिकेत कमाल केली आहे. कुस्तीच्या प्रसंगांतील तिचा जोश आणि वडिलांबरोबरच्या हळव्या प्रसंगातील अभिनय दाद घेऊन जातो. बबिताच्या भूमिकेत सान्या मल्होत्रानं छान काम केलं आहे. प्रशिक्षकाच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णी भाव खाऊन जातो, तर साक्षी तन्वीरचं मोठ्या पडद्यावरचं पदार्पण आश्‍वासक. इतर सर्वच कलाकारांनी छान साथ दिली आहे.


मिल्खा सिंग, मेरी कोम किंवा धोनी यांच्या चरित्रपटांप्रमाणंच हाही चित्रपट प्रेरणादायी, हेलावून टाकणारा आणि लक्षात राहणारा आहे, यात शंकाच नाही. कथा, अभिनय आणि मांडणीसाठी हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा...

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com