अपघातग्रस्त कुटुंबाच्या घरात चोरीचा प्रयत्न

राजकुमार थोरात
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

अपघाताची माहिती जंक्‍शन परिसरामध्ये पसरली, तेव्हा स्थानिक नागरिकांनी दुकाने बंद ठेवली. सय्यद कुटुंबाशी मोबाईलवर संपर्क साधून धीर देण्याचा प्रयत्न केला.

वालचंदनगर : जंक्‍शन (ता. इंदापूर) येथे अपघातग्रस्त कुटुंबाच्या घरी चोरी करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.
जंक्‍शन येथील फैजुद्दिन अजीज सय्यद या उद्योजकाच्या कुटुंबाच्या चारचाकी गाडीचा मंगळवारी तमिळनाडूतील मदुराई येथे अपघात झाला. अपघातात सय्यद यांचा मुलगा व पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.

यामध्ये फैजुद्दिन सय्यद यांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती जंक्‍शन परिसरामध्ये पसरली, तेव्हा स्थानिक नागरिकांनी दुकाने बंद ठेवली. सय्यद कुटुंबाशी मोबाईलवर संपर्क साधून धीर देण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी रात्री चोरट्यांनी सय्यद यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घराच्या आतील दरवाजाचे दुसरे कुलूप न तुटल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे सीसीटीव्हीमध्ये जेरबंद झाले आहेत. या घटनेची वालचंदनगर पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नाही; मात्र सय्यद कुटुंबातील सदस्यांमार्फत पोलिस ठाण्यात तक्रार देऊन चोरट्यांचा शोध लावण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :