मड्डा (गुलाब बिसेन)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

''कायलं एवळी चिंता करता? ज्यायची कास्तकारी नसे ते का उपाशी रायतेत? ठलव्यायचा बी तं पोट भरतेच ना! होयल या साली तरास. आपली सुरेखा शिकून नौकरीले लागली का आपले बी दिवस बदलतीन. दिवस कायी बसून रायतेत?'' सरस्वता नवऱ्यालं धीर देत होती. 

रामदास आज झुंझुरकालेच उठला. खाटखालतच्या गळव्यातला गिलासभर पाणी घटाघटा पिऊन तो कोठ्यात गेला. कोठ्यात गायी उठावच्या तयारीतच होत्या, म्हणून दूधपित्या वासरायले बाजूला बांधून गायीयच्या मांगचा शेण काळूण तो टोपलीत भरू लागला. 

रामदास आपल्याच तंद्रीत होता. तो रातभर झोपला नोहता. दिवसभर धुऱ्यायचा गवत कापून त्याचा आंग ना आंग दुकत होता, पर झोप त्याच्या जवळ कायी आलीच नायी. त्यालं एकच चिंता सारकी सतावत होती. त्याचा च्यार एकराचा धान निसवला होता. धान भरावले पाणी पायजे होता, पर उनाऱ्यासारक्‍या कळक तपनीना बांध्या कड्ड्या पळत होत्या. थोळा ओल होता, तो च्यार-आट दिवस कसातरी ढकलल. पाण्याची कोणतीच आशा दिसत नोहती. येत्या च्यार-आट दिवसात धानाले पाणी नायी भेटला तं यासाली मड्‌डाच कापावा लागंल, असा त्याले वाटत होता. 

गेल्या सालीच त्याना थोरल्या पोरीच्या लग्नाले 'नवतरीत धान देयीन' असा सांगून तिरोड्याच्या कटरे दलालाकडून तीस हजार रुपये आंगावर घेतलं होतन. 

गावच्या तऱ्याले लागूनच त्याच्या बांध्या होत्या. रस्त्यावर इंजिन लावलनका पाणी सीदा त्याच्या बांधीत पळत होता. त्याच्याना इंजिन लावाचा विचार करतच तो शेणाचा टोपला धरून बांध्यायकळ निंगाला. रामदास आपल्या विचारातच चालला होता. एवळ्यात पाटलाचा लहान पोरगा यशवन बैलायले तऱ्यावर धुवाले नेताना दिसला. ''काकाजी, रामराम'' या यशवनच्या हाकाना रामदास भानावर आला. ''राम राम'' म्हणत त्याच्यासंगा चालू लागला. ''इंजिन खाली आये का तुमचा?'' चालता चालताच रामदासना विचारलन. ''इंजिनतं खाली आये काकाजी, कालच ढोडीलं लावून घरी आणलो. कोणाकळं लावता इंजिन?'' यशवन म्हणाला. 

''बड्ड्यावर लावाचा होता.'' रामदासनं सांगतलन 

''पर तऱ्यालंतं सरपंच इंजिन लावाले नायी मनते,'' यशवनना अळचण सांगतलन. यशवनच्या या वाक्‍याना तो जास्तच चिंतेत पळला. रामदास याच्यावर कायीच बोलला नायी. त्याले का बोलावा कायी सुचलाच नायी. आता का करावा? असा प्रश्‍न आता रामदासले पळला. एवढ्यात रामदासचा उरकुळा आला. रामदासना डोस्क्‍यावरची शेणाची टोपली उरकुळ्यात फेकलन ना तो यशवनच्या मांगं मांगं तऱ्यावर आला. तऱ्यात रपट्यावरी पाणी भरला होता. थोडा वेळ तो तऱ्यातल्या पाण्याकळंच पायत उभा रायला. तऱ्याजवळच्या बांदीत तो शिरला. दोनी पायाना धान बाजूले करत तो बांदीच्या बिचात उबा रायला. त्याना एकदम आपला उजवा पाय मातीत दाबलन. तसा त्याचा पाय सपकन मातीत धसला. बांदीत अजून ओल होता. 'च्यार-पाच दिवस अजून ढकलतील' तो एकटाच बळबळला. 

एका बांदीतून दुसरी बांदी करत त्याना सर्व बांद्यायचा ओल पायलन. मांगच्या हप्त्यात त्याना जवस-लाखोरी बांद्यायीत फेकलं होतन तेव्हा बांद्यायीत चापळचिपळ पाणी होता. लाखोरी-जवस आता वापावले लागली होती. बांदीतून धुऱ्यावर येऊन त्याना पुरा बांधान न्याहारलनं. धान पायटच्या ठंड्या वाऱ्याना हालत होता. तसा रामदासचा चेहरा फुलला. जसा सकारी सकारी फुललेल्या जास्वंदासारका! पर पाण्याच्या चिंतेना लवकरच त्याचा चेहरा उतरला. 

पाण्याच्या विचारातच रामदास घराकळं निंगाला. रस्त्याच्या बाभरीचा मूठभर पाला तोंडात गुपून चावत चावतच घरी आला. लायनांगच्या टाक्‍यावरच्या डब्यात पाणी धरून तो तोंड धुवाले बसला. रामदास घरी आल्याचा पाऊन सुरेखाना चाय चुलीवर ठेवलंन. सुरेखा रामदासची धाकली पोरगी. यंदा अकरावीले होती. नवेझरीच्या शाळेत ती शिकत होती. दहावीत चौऱ्याहत्तर पर्सेंट घेऊन पास झाली होती. अभ्यासात हुशार असल्याना शिक्षकांनी तिले सायन्स घेवाले लावला होता. ते मोठी मेयनती होती. तशी थोरली शोभा बी हुशार होती. तिना बी बारावीत सत्तर पर्सेंट घेतलं होतंन, पर त्या साली फसल-पाणी नायी म्हणून शिक्षकायनी सांगून बी रामदासना तिले नायी शिकवलंन! सर्व सोंग घेता येतेत पर पैशाचा सोंग घेता येत नायी. घरी बसून का करंल म्हणून तो शोभाचा लगन करून मोकरा झाला, पर आता सुरेखाले शिकवून इंजिनिअर करावचा त्याचा विचार होता. त्याना दोनयी पोरीच असूनबी पोराचा हट कायी धरलन नायी. देवाच्या देल्यावर तो खूश होता. तो नेहमी म्हणे : ''पोरायपेक्षा माह्या पोरीच हुशार आयेत.'' 

रामदासचा तोंड धुऊन होताच सुरेखा चहाचा कप त्याच्या समोर करत म्हणली : ''बाबूजी, मी कॉलेजलं जातो. आई सपरी सारवून रायली. कायी लागला तं आईले मांगा.'' असी म्हणत सुरेखा चहा देऊन निंगून गेली. गरम गरम चाय पीतच रामदासना सरस्वताले आवाज देलंन. 

''आयकतेस का ओ...'' 

''का म्हणता?'' सरस्वता सारवतच म्हणाली. ''मी बांद्यायवरून आलो. बांद्यायीत चांगला ओल आये. कठाण बी चांगला वापला, पर च्यार-पाच दिवसांत बांद्या रठ येतील. धान आता निसवला आये. त्यालं भरावलं पाणी पायजे. मी सरपंचाकळ जाऊन 'तऱ्यालं इंजिन लावू देते का' तं इचारून येतो,'' रामदास चहाचा घूट घेतच बोलला. सरस्वताना बी 'हो' म्हणत त्यालं दुजोरा देलंन. 

रामदास हातातला कप धळीवर ठेवत उठला. लायन्यांगून मोठ्यांगी आला. पायात चपला टाकून सरपंचाच्या घराकळ निंगाला. रस्त्याना भेटंल त्याच्यासंगा रामरूमाई घेते तो सरपंचाच्या डयलंत पोचला. सरपंच घरीच बसला होता. सरपंचाना त्यालं बसावलं खुर्ची देलन. तिच्यावर बसतच त्याना सरपंचालं सारी हकीकत सांगतलन. सरपंचाना बी त्याची अळचण आयकून घेतलन. एवळ्यात सरपंचाच्या पोराना दोन कप चहा आणलन. दोघानी बी चहाचा कप हातात घेतला. चहा पीतच सरपंच म्हणाला : ''रामदासभाऊ, तुमाले एकाले इंजिन लावू देवाले मायी कायी हरकत नसे, पर तुमी इंजिन लावल्यावर बाकी कास्तकारबी कुदतील इंजिन लावाले. या साली कमी बरसातीना तऱ्यालं पाणी कमी आये. त्याच्याना तुमाले इंजिन लावाची परवानगी मी तरी कसी देऊ?'' सरपंचाना आपली अळचण सांगतलंन, तसा रामदास का समजावचा तो समजून गेला. 

''आता जो कायी होवाचा तो होयल. देवाले पिकवाचा असल तं पिकवल, नायी तं मारल. खाऊ चटणी-भाकर, काळून कसे बी दिवस,'' चहाचा कप खालता ठेवत तो सोताशीच बळबळला अना सरपंचाला 'राम राम' म्हणत तो तेतून उठला. 

घरी आल्यावर रामदासचा उतरला चेहरा पाऊन सरस्वता सरपंचाच्या घरी का झाला असंल ते समजून गेली. त्याच्याना ते बी त्याच्या संगा कायीच नायी बोलली. रामदासच्या येतवरी तिना सैपाक करून ठेवलं होतन. तिना येताबरोबर रामदासले जेवाले सांगलन. सारवल्या सपरीवर तिना पट्टी मांडलन. ताटी वाळून एका गिलासीत पाणी ठेवलन. रामदास टाक्‍यावरून हात धुऊन येत पट्टीवर बसला. सरस्वता भात वाळत त्याला म्हणली : ''कायलं एवळी चिंता करता? ज्यायची कास्तकारी नसे ते का उपाशी रायतेत? ठलव्यायचा बी तं पोट भरतेच ना! होयल या साली तरास. आपली सुरेखा शिकून नौकरीले लागली का आपले बी दिवस बदलतीन. दिवस कायी बसून रायतेत?'' सरस्वता नवऱ्यालं धीर देत होती. रामदास ताटीतला भात बिनचावताच गटागटा गिळत होता. सरस्वताच्या बोलण्याकळ त्याचा लक्ष नोहता. 

अन्नाचा शीत त्याले गोळ लागत नोहता. त्याच्या मनात पाण्याच्या चिंतेना बजार मांडलं होतन. तो सारका म्हणत होता : ''माया धान एका पाण्याना मार खावून रायला.'' 

पायता पायता च्यार-पाच दिवस निंगून गेले. वर आकाशात ढगायचा कोणताच पत्ता दिसत नोहता. उनाऱ्यासारकी तपन तपत होती. तसा रामदासचा जीव धानाच्या लोंबायसारका टुटत होता. तो बांद्यायवर जाऊन धुऱ्यावर परसाच्या सावलीत बसून आकाशाकळं एकटक पायत राये. पर याच्या पायल्याना पाणी थोळाच येणार होता! पायता पायता चांगले पंधरा दिवस उलटून गेले. पाण्याना चांगलीच दळी मारलंन. गावातले लहान-मोठे सर्वच कास्तकार पाण्याचीच वाट पायत होते. गावच्या ढोड्या, तरे, खदानी इंजिन लावून लावून आटल्या होत्या. गावखारी, बड्‌डा, कणार, मोवऱ्यान, कामत सर्वायची एकच गत होती. खदानीतल्या, तऱ्यातल्या मासऱ्या डोबऱ्यात जमा होऊन पाण्याना तळफळत होत्या. बगळे त्यांच्यावर ताव मारत होते, पर त्यायला बी पिवाले पाणी शिल्लक नोहता. बंदरायचे करप पाण्यासाठी गावात शिरून घरावरच्या कवलायचा चकनाचूर करत होते. 

रामदास अजूनबी परसाच्या खालतंच बसला होता. धुऱ्यालं गवत वाळला होता. तुरीत कचरा खूब झाला होता. गवताना धुऱ्यायची तूर टिसटिस करत होती. धुरे चोखारावले आले होते, पर रामदासचा मन कोणत्याच कामात लागत नोहता. तशाच इचारात घरी जावाचा म्हणून तो झाळाखालून उठला अना गाईसाठी दोन पेंड्या गवत नेवाचा मणून तो सरयीच्या धुऱ्याले गवत तोळावले बसला. एवळ्यात अचानक ढगायचा गर्जन-घुमरन चालू झाला. त्या अचानक झालेल्या आवाजाना रामदासची तंद्री तुटली. करडीच्या बाजूना आभाळात कारे कारे ढग डाटून आले. ढगायचा एकमेकायच्या समोर समोर जाण्याचा खेळ सुरू झाला. थोळ्या वेळातच रामदासच्या डोस्क्‍यावरच्या तपनीना आपली कूस बदलवलन. आता बांधानभर कारा कारा अंदार पळू लागला. तपनीच्या मांगं मांगं सावली धावू लागली. तपन अना अंधाराचा पाठशिवीचा खेळ सुरू झाला. तपन पुळा पुळा अना सावली मांगं मांगं! रामदास जरा सावरला. अचानक पुऱ्या बांधानभर कोणीना लाईट पेटवावी तशी लाईट पेटली अना गळाऽऽ गळाऽऽ आवाज झाला. आतावरी शांत पडलेला बांधान या आवाजाना जागा झाला. धुंदीना झाळायचे खांदे जोराना हालू लागले. धुऱ्यावरच्या तुरी बांदीत वाकू लागल्या. धानाचा तं बांधानभर नाचच चालू झाला. निसवल्या धानाच्या लोंब्या आनंदाना एकमेकायले चिपकू लागल्या. पाण्याचे बारीक बारीक थेंब रामदासच्या आंगावर पळू लागले. रामदास या पाण्याच्या स्पर्शासाठी चातकासारकी वाट पायत होता. एवळ्यात गर्जनासंगा विजायचा एकच उजेळ झाला. पाण्याचा मोठा सिरवा चालू झाला. पाण्याचे मोठे मोठे थेंब धानावर पळू लागले. या मुसळधार सिरव्याना बांदीत घळीभरातच घुटकाभर पाणी संगरला. पाण्यालं आसुसलेली जमीन घटाघटा पाणी पिऊ लागली. पाणी आल्याच्या आनंदात रामदासले झाळाखालतं जावाची बी शुद रायली नायी. तो पावसाच्या पाण्याना पुरा ओला झाला. त्याले ओला होवाची चिंताच नोहती. वारला बांदान घटाघटा पाणी पीत होता, तशी रामदासची आत्मा शांत होत होती. त्याच्या संसाराचा मड्‌डाच होणार होता; पर या पाण्यामुळं तो होता होता वाचला. 

ही कथा पूर्वविदर्भात बोलल्या जाणाऱ्या झाडीबोलीत लिहिलेली असून, 
या कथेत आलेल्या त्या बोलीतल्या शब्दांचे अर्थ : मड्डा = पाण्याअभावी करपलेलं भाताचं पीक (ज्यातून काही उत्पन्न मिळत नाही)/धुरे, धुरा = शेताचा बांध /निसवणे= लोंबीतून भात बाहेर पडणं/उनारा=उन्हाळा/तपन = ऊन्ह/ बांधा = शेतातले वाफे, शेतीचे बांध घालून तयार केलेले छोटे छोटे तुकडे/कड्डा = कठीण/नवतरी = सुगी/तरी =तलाव//ढोडी = छोटा ओढा/बड्डा = विशिष्ट माती असलेल्या शेताचं नाव/उरकुळा = उकिरडा/रपट्या = तलावाचा सांडवा, ओव्हरफ्लो/लाखोरी=डाळवर्गीय कडधान्य/ पायट = पहाट/बाभरी=बाभूळ/गुपून=गडबडीत एखादी वस्तू तोंडात कोंबणं/लायनांग=घराची मागची बाजू/सपरी =ओसरी/कठाण=रब्बी हंगामात शेतात घेतलं जाणारे सर्व कडधान्य/वापणे=उगवणे/रठ=कठीण/ डयल=जनावरांचा गोठा(पूर्व विदर्भात याची विशिष्ट रचना असते. हा गोठा रस्त्यानंतर लगेच बांधलेला असतो. त्याच्यामागं घर असते. या गोठ्यातूनच घरी जाण्यासाठी वाट असते)/ पट्टी=जमिनीवर बसताना अंथरायचं बस्कर/ताटी=जेवणाचं ताट/ठलवा = भूमिहीन शेतकरी/ दळी=एकदा पाऊस येऊन गेल्यावर बरेच दिवस पाऊस न येणे, दडी/ खदान=खाण/गावखारी=गावालगतची सुपीक शेतजमीन/कणार=मातीच्या प्रकारावरून पडलेलं शेताचं एक नाव/मोवऱ्यान=मोह या झाडांची दाट झाडी( आंब्याच्या झाडांची जशी आमराई तसं मोहाच्या झाडांचं मोवऱ्यान किंवा मोवरान)/कामत=एका शेताचं नाव/चोखारावणे=शेताच्या बांधावर लावलेल्या पिकातलं तण काढणं (उदाहरणार्थ : तूर, तीळ ही पिकं पूर्व विदर्भात भाताच्या शेताच्या बांधावर घेतली जातात. त्यांतलं तण काढणं)/धुंदीना = सोसाट्याचा वारा, वादळ/ वारला = वाळलेला/ (बड्डा, कणार, कामत आणि गावखारी ही शेतांची नावं जमिनीची सुपीकता आणि मातीचे प्रकार यावरून तयार झाली आहेत). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com