सर्व काही गुरूच.. (मोहन दरेकर)

सर्व काही गुरूच.. (मोहन दरेकर)

मी मूळचा गणेशगाव (बेदरवाडी) या मराठवाड्यातल्या लहानशा खेड्यातला.

भजन-कीर्तनाची पार्श्वभूमी लाभलेला एका शेतकऱ्याचा मुलगा. लहानपणी मी सतत भजन, कीर्तन आणि रेडिओ ऐकण्यात रंगून जात असे. अनेक संतांचे अभंग, कीर्तनकथा, ज्ञानेश्वरी, 

भजनी मालिका आदींचं वाचन-पठण मी करायचो. संगीतभजनांमध्ये रात्र रात्र जागून अभंग गायचो, कधी पेटी तर कधी तबला-पखवाजही वाजवायचो. हे नेहमीचंच असल्यामुळं पंचक्रोशीत माझं चांगलंच नाव झालं होतं. कौतुकही होत असे. 

त्या वेळी मी थोडे थोडे पैसे साठवून एक लहानसा रेडिओ विकत घेतला होता. शाळेचा वेळ सोडला तर दिवस-रात्र रेडिओ माझ्याजवळ असायचा. सर्व प्रकारची गाणी मी ऐकायचो. मात्र, रागदारी ऐकण्याचं मात्र मी टाळायचो! कारण, त्यातलं मला अजिबात काही समजायचं नाही. एके दिवशी घराकडं येत असताना ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ हे गाणं मी रेडिओवर ऐकलं आणि मला अश्रू अनावर झाले. अश्रू न पुसताच मी घरात शिरलो. 

वडिलांनी मला विचारलं : ‘‘काय झालं? तुला कुणी मारलं काय? कुणी काही टाकून बोललं काय?’’

मी मनात विचार केला, ‘आता यांना काय सांगावं? बरं, सांगितलं तर त्यांचा विश्वास बसेल का? रेडिओवर लागलेलं गाणं ऐकून कुणी रडू शकतो!’

मी खरं काय ते सांगितलं. म्हणालो :  ‘‘गाणं ऐकून मला रडायला आलं.’’ यावर वडील म्हणाले : ‘‘असं होऊ शकतं. गायक जर परिणामकारक गात असेल तर रडायला येऊ शकतं.’’ त्या वेळी वडिलांना बरंही वाटलं. कारण, त्यांना माझ्यातली संगीतकलेविषयीची ओढ समजली. त्या वेळी मी जेमतेम सात-आठ वर्षांचा असेन. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या शब्दांचा अर्थही मला त्या वेळी अर्थातच कळत नव्हता. मात्र, अभिषेकीबुवांच्या (कविवर्य कुसुमाग्रज यांची ही रचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायिलेली आहे) आर्त व भक्तिपूर्ण आवाजानं माझं काळीज पिळवटून टाकलं. त्या लहान वयात मी अभिषेकीबुवांच्या गाण्याचा भक्त झालो तो अगदी या क्षणापर्यंत.

सन १९८१  मध्ये दहावीनंतर मी बीड शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेलो. तिथं कलाक्षेत्रातल्या अनेक लोकांशी माझा परिचय झाला. दरम्यान, अभिषेकीबुवांच्या सर्व कॅसेट्‌स, रेकॉर्डस मी जमवल्या आणि प्रत्येक रचना हुबेहूब त्यांच्याप्रमाणे आवाज काढून त्यांची नक्कल करू लागलो.  माझं गाणं ऐकून सगळेजण मला ‘प्रतिजितेंद्र अभिषेकी’ म्हणू लागले!

यानंतर ‘शास्त्रीय संगीत शिक,’ असं काही मित्रांनी मला सुचवलं. त्यानुसार मी विष्णुपंत धुतेकर गुरुजी व अनिल हम्प्रस या गुरूंकडं काही वर्षं रागदारीचं रीतसर शिक्षण घेतलं. त्यांच्याकडून ‘यमन’, ‘भूप’, ‘बिहाग’ असे २० ते २२ राग शिकलो. बीड शहरात व आसपास माझे लहान-मोठे कार्यक्रमही होऊ लागले. दरवर्षी पलुस्कर पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमात माझं गाणं व्हायचं. ते लोकांना फार आवडायचं.

‘गायक होण्यासाठीचे सर्व गुण तुझ्यात आहेत, तर तू पुण्याला किंवा मुंबईला जा आणि मोठ्या गुरूंकडं शिक,’ असं मला काही जणांनी सुचवलं; पण मला तर फक्त आणि फक्त अभिषेकीबुवांकडंच शिकायचं होतं. त्या दिशेनं मी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आलं. बारावी झाल्यावर ‘गाणं हेच जीवन आणि जीवन हेच गाणं’ असं ठरवून मी अभिषेकीबुवांच्या घरी पोचलो. बीडमधले प्रख्यात वकील मधुकरराव गोडसे (गुरुमाता अभिषेकीवहिनींचे काका) यांचं पत्र अभिषेकीबुवांना दाखवलं. ते वाचून त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. ही घटना माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. गुरुसेवा आणि अविरत कष्ट करून मी संगीतशिक्षण घेतलं. पहाटे चार वाजता रियाज सुरू होत असे. सुरवातीला स्वरसाधना, त्यानंतर राग भैरवमध्ये खर्जापासून ते तार षड्‌जापर्यंत पलटे करायचो. त्यानंतर बंदिशींची उजळणी. मग अभिषेकीबुवा शिकवत. दुपारनंतर हा रियाज व तालीम चालत असे. गाण्याशिवाय दुसरा विषय नसे. माझ्याबरोबर इतरही शिष्य असायचे. शौनक, तसंच सुधाकर देवळे, हेमंत पेंडसे, चंद्रकांत नाईक, रघुनाथ फडके आदी. अभिषेकीबुवांनी मला पुत्रवत्‌ प्रेम दिलं. भरभरून गाणं शिकवलं. माझ्यासारख्या ढ विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन इंग्लिश शिकवणारी मुन्नी (मेखला) ही अभिषेकीबुवांची कन्या माझी टीचर व्हायची, तर शास्त्रीय संगीताबरोबरच इतरही गायनप्रकार यावेत म्हणून हातात छडी घेऊन गझल बसवून घेणारा शौनक, ॲकॅडमिक शिक्षणाला प्रोत्साहन देऊन पीएच. डीपर्यंत पोचवणाऱ्या गुरुमाता अभिषेकीवाहिनी या सगळ्यांनी माझं व्यक्तिमत्त्व अधिकाधिक विकसित केलं.

अभिषेकीबुवा खूप तळमळीनं शिकवायचे. त्यांना वाटे, आपला प्रत्येक शिष्य हा मैफलीचा गायक व्हावा. एकदा मला राग बिलासखानी तोडी उचलता येत नव्हता, तरीही न रागावता ते म्हणाले : ‘‘जसं जमेल तसं शिकून घ्या. १० वर्षांनी जमेल, त्यासाठी आणखी कुणाकडं हात पसरायला नकोत.’’ कोण गुरू एवढ्या तळमळीनं शिकवेल? अभिषेकीबुवा नेहमी हुशार शिष्यांची वाट पाहत असत. समोर जर गाणं उचलणारा शिष्य असेल तर सहा ते सात तास अखंड तालीम चालायची. शेवटी वहिनींना सांगावं लागे : ‘जेवणाची वेळ होऊन गेली आहे!’  

अभिषेकीबुवांकडं येणारे-जाणारे मोठमोठे कलाकार - उदाहरणार्थ : लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, तसंच अनेक कवी, नाटककार, संगीतकार, गायक इत्यादी मला जवळून बघायला मिळाले.  सन १९८७ मध्ये अभिषेकीबुवा पुण्यात स्थायिक झाले; परंतु त्यांच्या बंगल्याचं काम तेव्हा पूर्ण झालेलं नसल्यानं त्यांनी मला घरी पाठवलं आणि काही महिन्यांनी यायला सांगितलं. मी गावी गेलो;  पण गुरूंशिवाय चैन पडेना. काही दिवसांनी पुण्याला परत आलो. अभिषेकीबुवांनी मला पुन्हा परत जायला सांगितलं; पण मी गावी न जाता माझे बीडमधले गुरू डॉ. उमानाथ पेंढारकर यांच्या मुलाकडं पेंढारकरवाड्यात काही महिने राहिलो.

त्या काळात जिथं मिळेल तिथं थोडंफार खायचो. जवळ पैसे नसायचे. रियाज करायला जागा नव्हती. त्या काळात पेंढारकरवहिनींनी माझी काळजी घेतली. ‘काळी चार’च्या तंबोऱ्याला ‘काळी एक’च्या तारा जोडून रियाज करायचो. दरम्यान, शास्त्रीय गायक यादवराज फड यांची ओळख झाली. त्यांच्याबरोबर मी रियाज करायचो, नंतर अभिषेकीबुवांचे शिष्य वसंत मराठे यांची ओळख झाली. ते सदाशिव पेठेत राहतात. त्यांना मी माझी व्यथा सांगितली. ते म्हणाले : ‘‘तुम्ही माझ्याकडं राहा. अभिषेकीबुवा हे माझं दैवत आहे. तुम्ही त्यांचे शिष्य आहात. हवा तेवढा रियाज करा. कशाचीही काळजी करू नका.’’ मराठे यांनी मला स्थैर्य दिलं. अशा मोठ्या मनाचा माणूस विरळाच. मी त्यांच्याकडं राहू लागलो. यादरम्यान  मी ‘संगीत-अलंकार’ केलं. बीए केलं. जर्मन भाषाही शिकलो. भारत सरकारची आणि गोवा सरकारची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. पुणे विद्यापीठातून संगीत घेऊन एमए केलं. दरम्यान, आकाशवाणीची ए ग्रेडही मिळाली. 

कलाक्षेत्रातल्या लोकांचा परिचय वाढत गेला. अभिषेकीबुवांची तालीमही परत सुरू झाली; परंतु उपजीविकेचं साधन काहीच नव्हतं म्हणून मग ‘होम ट्यूशन्स’ करू लागलो. लोकांच्या घरी जाऊन शिकवणं हे सुरवातीला थोडं अवघड गेलं; परंतु गाण्याच्या प्रेमापोटी मानापमान बाजूला ठेवून रोज आठ ते नऊ तास घरी जाऊन शिकवायचो. थोडा आर्थिक लाभ होऊ लागला. अभिषेकीबुवांच्या घराजवळ भाड्यानं खोली घेऊन राहू लागलो. सन १९८८ मध्ये अभिषेकीबुवांच्या हस्ते ‘नवसह्याद्री स्वरमंच, पुणे’  या संस्थेचं उद्‌घाटन झालं. याच संस्थेमध्ये मला  गायन सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक मैफली होत गेल्या. 

मला सुगम संगीताचीही फार आवड आहे. मात्र, शास्त्रीय संगीतातच करिअर करण्याचा निर्धार केला. रागदारी संगीतामध्ये आपण कुठंही कमी पडू नये म्हणून मी सन १९९३ पासून उस्ताद सईदुद्दीन डागर गुरुजींकडून धृपद-धमार शिकलो. सन २००१ मध्ये अप्रचलित रागांचा अभ्यास व्हावा म्हणून विकास कशाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अखिल भारतीय गंधर्व महामंडळा’ची ‘संगीताचार्य’ (पीएच.डी) ही पदवी मिळवली. गुरूंविषयी प्रेम व्यक्त व्हावं म्हणून अभिषेकीबुवांचं चरित्र मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये लिहिलं. 

महाराष्ट्रातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये माझ्या मैफली झाल्या. ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सवा’त दोन वेळा गायनाची संधी लाभली. याशिवाय, भारतातल्या व भारताबाहेरच्या अनेक नामांकित महोत्सवांमध्ये गायन सादर केलं. माझ्या गायनावर माझे गुरू अभिषेकीबुवा यांचा साहजिकच जास्त प्रभाव आहे. मात्र, कॅसेटच्या माध्यमातून इतर मोठ्या गायकांच्या गायकीचाही अभ्यास करून व त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आत्मसात करून स्वतःची स्वतंत्र गायनशैली निर्माण करण्याचा प्रयत्न मी केला आहे. सन १९९८ मध्ये अभिषेकीबुवांचं निधन झालं. मला हा सर्वात मोठा धक्का बसला.

‘दुसरा गुरू करायचा नाही,’ असं मी सुरवातीपासूनच ठरवलं होतं; परंतु अभिषेकीबुवांच्या निधनानंतर माझा आधारच गेला. मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. मी बराच काळ उदास उदास राहू लागलो. मध्ये काही वर्षं उलटली. नवी दिल्ली इथले ज्येष्ठ गायकबंधू पंडित राजन व साजन मिश्रा यांच्या मैफली आणि ध्वनिमुद्रिका मी अनेक वर्षं ऐकत होतो. यादरम्यान माझ्या गायनावर त्यांच्या गायकीचाही प्रभाव दिसू लागला. ‘मला शिकवावं,’ अशी विनंती मी मिश्राबंधूंना सन २००६ मध्ये माझे मित्र तबलावादक अरविंदकुमार आझाद यांच्या मध्यस्थीनं केली. मिश्राबंधूंनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं आणि परत मी गुरुतत्त्वाशी जोडला गेलो. गुरूंचा आधार मिळाला. बनारस घराण्याच्या अनेक बंदिशी, ठुमरी-दादरे, टप्पे आणि मुख्य म्हणजे बनारस-गायकी शिकायला मिळाली.

दरम्यान, आकाशवाणी-दूरदर्शनची टॉप ग्रेड मला प्राप्त झाली. राष्ट्रीय कार्यक्रमात कला सादर करण्याची संधी अनेक वेळा मिळाली. विविध रागांच्या नऊ कॅसेट्‌स प्रकाशित झाल्या. मैफलीचे अनेक शिष्यही तयार केले. याशिवाय अनेक बंदिशी, तराणे, बडे ख्याल यांच्या रचनाही मी केल्या. अनेक अभंग, विविध कवींच्या गीतरचना स्वरबद्ध केल्या. 

‘स्वरांजली’ या संस्थेची स्थापना करून गेली १५ वर्षं तिच्यामार्फत विविध कार्यक्रम आयोजिले. गायनकलेच्या प्रसारात व वृद्धीत आपला खारीचा वाटा आहे, याचं मला मनापासून समाधान वाटतं. मी हे सगळं करू शकलो ते केवळ पत्नी नूतन हिच्या २२ वर्षांच्या साथ-सोबतीमुळंच. माझे सर्व गुरुबंधू आणि मार्गदर्शक-सहकारी या सगळ्यांचं स्मरण मला सतत असतं.            

मी माझ्याबद्दल हे सगळं काही लिहिलं खरं; परंतु खरंच ’मी कोण आहे ?’ ’मी काय आहे?’ हे प्रश्न जेव्हा मनात येतात, तेव्हा मला असं दिसतं, की मी कुणीही नाही... मी काहीच नाही! मागं वळून पाहतो तेव्हा दिसतो गुरू-शिष्याचा एक जीवनपट. त्यात सर्व काही गुरूच आहे. कारण, तोच माझं अस्तित्व, तोच कृती, तोच विचार, तोच मन, तोच बुद्धी... सर्व काही गुरूच...मी फक्त शून्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com