'बाहुबली' राष्ट्रीय पुरस्काराच्या स्तराचा नाही'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

'रूस्तम'साठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांवरही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. या वेळी अक्षयकुमार ऐवजी मनोज बाजपेयीला 'अलिगढ'मधील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे ते म्हणाले.

नागपूर : लहानपणी आपण 'चंदा मामा'तील कथा वाचायचो, त्याप्रमाणेच 'बाहुबली'ची कथा होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कितीही वापर असला, व्हीएफएक्‍सवर चित्रीकरण झाले असेल तरी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा एवढा सर्वोत्कृष्ट चित्रपट तो मुळीच नाही, असे मत 'कासव' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांनी व्यक्त केले. 

एलएडी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित 'सिने मोंटाज'च्या 39 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी 'मातीतील कुस्ती' या लघुपटासाठी फिल्मफेअर व राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणारा लेखक-दिग्दर्शक प्रांतीक देशमुख, सिने मोंटाजचे अध्यक्ष राम तायडे, एलएडी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्‍यामला नायर यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय पुरस्कारांचा प्रवास अतिशय उत्तम पद्धतीने सुरू होता; पण गेल्यावर्षी 'बाहुबली'ची निवड झाल्यामुळे निराशा झाली. त्यामुळेच 'कासव'ला हा पुरस्कार मिळेल, अशीही आशा नव्हती. सुदैवाने आम्हाला सुवर्ण कमळ मिळाले, असे सुनील सुकथनकर म्हणाले. 

मात्र, त्याचवेळी 'रूस्तम'साठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देणाऱ्या परीक्षकांवरही ते प्रश्‍नचिन्ह उपस्थित करतात. या वेळी अक्षयकुमार ऐवजी मनोज बाजपेयीला 'अलिगढ'मधील अभिनयासाठी हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे ते म्हणाले. 'सामाजिक' असे लेबल लावल्यामुळे अनेक चांगल्या चित्रपटांकडे प्रेक्षक वळत नाहीत; पण अशा चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळते, तेव्हा मात्र आनंद होतो, अशी भावनाही ते व्यक्त करतात. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. अनुप कुमार यांची प्रेक्षकांमध्ये उपस्थिती होती. 

प्रांतीक देशमुखचा विशेष सत्कार 
सहा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविणारे सुनील सुकथनकर यांच्यासह वयाच्या पंचविशीत पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटविणारा विदर्भाच्या मातीतील कलावंत प्रांतीक देशमुख याचाही विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी प्रांतीकचे आजोबा, वडील विवेक देशमुख आणि आई यांची उपस्थिती होती. फिल्मफेअर सोहळ्यात पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी अभिनेत्री विद्या बालनला नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो, तेव्हा ती दूर पळू लागली. त्याचवेळी शाहरुख, सलमान सारे लोक हसत होते. खाली वाकून नमस्कार करण्याची तिथे पद्धत नव्हती. पण मी विदर्भाचे संस्कार घेऊन गेलो होतो, असे प्रांतीक म्हणाला. माझे भाषण सोनम कपूर अतिशय उत्सुकतेने ऐकत होती, असेही तो म्हणाला. प्रांतीकचे अनुभव विभागीय आयुक्त मोबाईलच्या कॅमेरात टिपून घेत होते, हे विशेष.